बायबल एकाच वर्षात

१. मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले, तेव्हा पाहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता; मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती; तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता.
२. त्याने मला उत्तरद्वाराच्या वाटेने बाहेर नेले, व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे नेले, तेव्हा पाहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत होते.
३. मग तो पुरुष पूर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते. त्याने एक हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालण्यास सांगितले, तर तेथे पाणी घोट्यापर्यंत होते.
४. त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालण्यास सांगितले, तर तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालण्यास सांगितले, तर तेथे पाणी कंबरेपर्यंत होते.
५. त्याने आणखी हजार हात अंतर मापले तर त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाले; मला त्यातून पोहून जाता आले असते; उतरून जाता आले नसते, एवढी ती नदी झाली.
६. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहिलेस ना?” मग त्याने मला नदीतीराने माघारी नेले.
७. परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर बहुत झाडे असलेली मी पाहिली.
८. तो मला म्हणाला, “हे पाणी पूर्वप्रदेशांकडे वाहत जाते आणि तेथून अराबात उतरून समुद्राकडे जाते; ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते.
९. ही महानदी जाईल तेथे तेथे तिच्यात जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तिच्यात मासे विपुल होतील, कारण जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे तेथे सर्वकाही निरोगी होईल; जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत राहतील.
१०. तिच्या तीरी धीवर उभे राहून एन-गेदीपासून एन-इग्लाइमापर्यंत पाग टाकतील; महासागरातल्या माशांप्रमाणे त्या नदीत भिन्नभिन्न जातींचे विपुल मासे सापडतील.
११. त्यातील पाणथळे व दलदली ह्यांचे पाणी निर्दोष होणार नाही; ती खारटाणेच राहतील.
१२. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हरतर्‍हेची झाडे वाढतील; त्यांची पाने वाळणार नाहीत; त्यांच्या फळांचा लाग खुंटणार नाही; प्रतिमासी ती पक्‍व फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे; त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील.”
१३. प्रभू परमेश्वर म्हणतो: “तुम्ही हा देश इस्राएलाच्या बारा वंशांना वतन म्हणून वाटून द्याल तेव्हा त्यात योसेफाचे दोन वाटे धरून त्याच्या सीमा येणेप्रमाणे असाव्यात.
१४. ह्या देशाचे तुम्हांला सारखे वाटे मिळून तुम्ही येथील वतन पावाल कारण हा देश तुमच्या वडिलांना देईन अशी मी हात वर करून शपथ घेतली आहे; ह्या प्रकारे हा देश तुमचे वतन होईल.
१५. देशाच्या सीमा येणेप्रमाणे: उत्तरेस मोठ्या समुद्रा-पासून हेथलोनाच्या वाटेने सदादाच्या सरहद्दीपर्यंत;
१६. (दिमिष्काच्या व हमाथाच्या सरहद्दींमधील) हमाथ, बेरोथा, सिब्राईम व हौरानाच्या सीमेवरील हासेर-हत्तीकोनपर्यंत.
१७. समुद्रापासून ही सीमा म्हणजे दिमिष्काच्या सरहद्दीवरील गाव हसर-एनोन येथवर, उत्तरेस हमाथ ही सीमा. ही उत्तर बाजू झाली.
१८. पूर्वेस हौरान व दिमिष्क, गिलाद व इस्राएल देश ह्यांच्या दरम्यान असलेली यार्देन नदी; सरहद्दीपासून पूर्वसमुद्रापर्यंत मोजणी करा; ही पूर्व बाजू झाली.
१९. दक्षिण सीमा ही: तामारपासून मरीबोथ कादेशाच्या पाण्यापर्यंत, व तेथून मिसर देशाच्या नाल्याने थेट मोठ्या समुद्रापर्यंत; ही दक्षिण बाजू झाली.
२०. पश्‍चिम सीमा ही: दक्षिण सीमेपासून हमाथाच्या घाटापर्यंतचा मोठा समुद्र; ही पश्‍चिम बाजू झाली.
२१. ह्या प्रकारे तुम्ही हा देश आपसात इस्राएलाच्या वंशांप्रमाणे वाटून द्या.
२२. असे करा की तुम्ही आपल्या वतनासाठी आणि तुमच्यात वस्ती करणारे व तुमच्यात राहून संतती झालेले परराष्ट्रीय लोक ह्यांच्या वतनासाठी हा देश चिठ्ठ्या टाकून वाटून घ्या. हे पराष्ट्रीय लोक इस्राएल वंशजांमध्ये जन्मलेले आहेत असे धरून चाला; त्यांना तुमच्याबरोबर इस्राएलाच्या वंशांमध्ये वाटा मिळावा.
२३. इस्राएलाच्या ज्या विभागात कोणी परका राहत असेल त्यात त्याला वतन द्यावे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
१. आता वंशांची नावे ही: उत्तरेच्या सीमेपासून हेथलोनच्या रस्त्याकडील हमाथाच्या घाटाचा रस्ता, दिमिष्काच्या सरहद्दीवरले हसर-एनान, ह्या पूर्व-पश्‍चिम सीमा असलेला प्रदेश, हमाथाला लागून असलेला जो उत्तरेकडील प्रदेश तो दानाचा विभाग.
२. दानाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो आशेराचा विभाग.
३. आशेराच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो नफतालीचा विभाग.
४. नफतालीच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो मनश्शेचा विभाग.
५. मनश्शेच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो एफ्राइमाचा विभाग.
६. एफ्राइमाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो रऊबेनाचा विभाग.
७. रऊबेनाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो यहूदाचा विभाग.
८. यहूदाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश पंचवीस हजार हात१ रुंद व इतर वंशांच्या विभागांइतका पूर्वपश्‍चिम लांब तो समर्पित अंश म्हणून अर्पण कराल त्यामध्ये पवित्रस्थान असणार.
९. परमेश्वराला जो समर्पित अंश म्हणून अर्पण कराल तो पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद असावा.
१०. हा समर्पित अंश याजकांचा; हा उत्तरेस पंचवीस हजार हात लांब, पश्‍चिमेस दहा हजार हात रुंद, पूर्वेस दहा हजार हात रुंद, व दक्षिणेस पंचवीस हजार हात लांब असावा; परमेश्वराचे पवित्रस्थान ह्यामध्ये असणार.
११. याजकांपैकी जे सादोकवंशज पवित्र केले आहेत, ज्यांनी माझे नियम पाळले आहेत, व जे लेव्यांप्रमाणे इस्राएल वंशजांबरोबर बहकले नाहीत,
१२. त्यांना देशातील समर्पित अंशातला एक अंश, म्हणजे अर्थात लेव्यांच्या विभागांतला एक परमपवित्र विभाग द्यावा;
१३. आणि याजकांच्या विभागास लागून पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद असा विभाग लेव्यांना मिळावा; त्याची सबंध लांबी पंचवीस हजार हात व रुंदी दहा हजार हात असावी.
१४. त्यांनी त्यातला काही विकू नये व त्याची अदलाबदल करू नये; तसेच देशातील प्रथमफळे इतरांकडे जाऊ देऊ नयेत; कारण तो भाग परमेश्वराला पवित्र आहे.
१५. त्या पंचवीस हजार हात लांबीच्या प्रदेशापैकी जो पाच हजार हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी सार्वजनिक असून तो वस्तीसाठी व बखळीसाठी सोडावा; त्याच्यामध्ये नगर वसवावे.
१६. त्याचे माप असे असावे: उत्तर बाजू साडेचार हजार हात, दक्षिण बाजू साडेचार हजार हात, पूर्व बाजू साडेचार हजार हात व पश्‍चिम बाजू साडेचार हजार हात.
१७. नगराची बखळ उत्तरेस अडीचशे हात, दक्षिणेस अडीचशे हात, पूर्वेस अडीचशे हात, व पश्‍चिमेस अडीचशे हात असावी.
१८. ह्या समर्पित प्रदेशाला लागून उरलेला जो प्रदेश त्याच्या उत्पन्नाने नगरातील कामधंदा करणार्‍यांचे पोषण व्हावे
१९. इस्राएलच्या सर्व वंशांतील कामधंदा करणार्‍या नगरातल्या लोकांनी त्या भागाची मशागत करावी.
२०. सगळे समर्पित क्षेत्र पंचवीस हजार हात लांब व पंचवीस हजार हात रुंद असावे; ह्या पवित्र समर्पित अंशाचा चतुर्थांश नगराच्या वतनासाठी द्यावा.
२१. तो समर्पित भाग व नगराचे वतन ह्यांच्या अलीकडे-पलीकडे उरलेला भाग अधिपतीचा असावा; वंशाना दिलेल्या भागांना लागून पंचवीस हजार हात समर्पित जागेच्या पूर्व सीमेवर, तसेच पंचवीस हजार हात जागेच्या पश्‍चिम सीमेवर असलेले भाग अधिपतीचे असावेत; समर्पित भाग व मंदिराचे पवित्रस्थान हे त्या दोहो भागांच्या मध्ये असावेत.
२२. ह्या प्रकारे लेव्यांचे वतन व नगराचे वतन ही अधिपतीच्या वतनाच्यामध्ये आहेत; हे अधिपतीचे वतन यहूदा प्रांत व बन्यामीन प्रांत ह्यांच्या दरम्यान आहे; हा भाग अधिपतीचा होय.
२३. वरकड वंशांचा भाग पूर्वपश्‍चिम आहे; त्यांतला एक बन्यामिनाचा विभाग.
२४. बन्यामिनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्‍चिम प्रदेश तो शिमोनाचा विभाग.
२५. शिमोनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्‍चिम प्रदेश तो इस्साखाराचा विभाग.
२६. इस्साखाराच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्‍चिम प्रदेश तो जबुलूनाचा विभाग.
२७. जबुलूनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्‍चिम प्रदेश तो गादाचा विभाग.
२८. दक्षिणेस गादाची सरहद्द तामारपासून मरीबथ-कादेश येथील पाण्यापर्यंत व मिसर देशाच्या नाल्याच्या बाजूने थेट मोठ्या समुद्रापर्यंत.
२९. ही भूमी तुम्ही चिठ्ठ्या टाकून इस्राएलच्या वंशांना वतनासाठी वाटून द्यावी; हे त्यांचे विभाग आहेत, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
३०. उत्तर दिशेस नगराबाहेरील रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे.
३१. नगराच्या वेशी इस्राएल वंशांच्या नावांप्रमाणे असाव्यात: उत्तरेकडे तीन वेशी असाव्यात - रऊबेन वेस, यहूदा वेस व लेवी वेस.
३२. पूर्व दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे; तेथे तीन वेशी असाव्यात: योसेफ वेस, बन्यामीन वेस व दान वेस.
३३. दक्षिण दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे; तेथेही तीन वेशी असाव्यात: शिमोन वेस, इस्साखार वेस व जबुलून वेस.
३४. पश्‍चिम दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे; तेथेही तीन वेशी असाव्यात: गाद वेस, आशेर वेस व नफताली वेस.
३५. ह्या प्रकारे रहदारीचे एकंदर क्षेत्र अठरा हजार हात असावे; ह्या नगराचे नाव येथून पुढे याव्हे-शाम्मा (तेथे परमेश्वर आहे) असे पडेल.”
८. त्याने मिसर देशातील मनुष्यांचे व पशूंचेही प्रथमजन्मलेले मारून टाकले.
९. हे मिसर देशा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक ह्यांच्यावर चिन्हे व उत्पात पाठवले.
१०. त्याने अनेक राष्ट्रांचा मोड केला; बलवान राजे मारून टाकले;
११. अमोर्‍यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग ह्यांना मारून टाकले; कनान देशातील सर्व राज्यांचा मोड केला;
१२. आणि त्यांचा देश त्याने वतन करून दिला; आपले लोक इस्राएल ह्यांना वतन करून दिला.
१३. हे परमेश्वरा, तुझे नाव चिरकाल राहील; हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील.
१४. कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल.
९. सुज्ञाचा मूर्खाशी वाद असला तर मूर्ख रागावो किंवा हसो, त्याला स्वस्थता म्हणून नसतेच.
१. म्हणून आपल्यासाठी ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले तसेच तुम्हीही तेच मनोवृत्तिरूपी शस्त्र धारण करा; कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे;
२. ह्यासाठी की, तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे.
३. कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा ह्यांत चालण्यात जो काळ गेला तितका पुरे.
४. तुम्ही त्यांच्या बेतालपणात त्यांना सामील होत नाही ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात.
५. जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे त्याला ते हिशेब देतील.
६. कारण सुवार्ता मृतांनाही सांगण्यात आली होती, ह्यासाठी की, देहात त्यांचा न्यायनिवाडा मनुष्यांनुसार व्हावा, पण आत्म्यात त्यांनी देवानुसार जगावे.
७. सर्वांचा शेवट जवळ आला आहे; म्हणून मर्यादेने राहा, व प्रार्थना करण्यासाठी सावध असा;
८. मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा; कारण ‘प्रीती पापांची रास झाकून टाकते.’
९. कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा.
१०. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभार्‍यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा;
११. भाषण करणार्‍याने, आपण देवाची वचने बोलत आहोत, असे बोलावे; सेवा करणार्‍याने, ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठी की, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा; गौरव व पराक्रम हे युगानुयुग त्याचे आहेत. आमेन.
१२. प्रियजनहो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुमच्यावर आली आहे तिच्यामुळे आपणांस काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका.
१३. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा; म्हणजे त्याचा गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्लास व आनंद कराल.
१४. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन ‘राहिला आहे.’ [त्यांच्याकडून त्याची निंदा होते, पण तुमच्याकडून तो गौरविला जातो.]
१५. तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी, किंवा दुसर्‍याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये;
१६. ख्रिस्ती ह्या नात्याने कोणाला दु:ख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचा गौरव करावा.
१७. कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे; आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणार्‍यांचा शेवट काय होईल?
१८. “नीतिमान जर कष्टाने तरतो तर भक्तिहीन व पापी ह्याला ठिकाण कोठे मिळेल?”
१९. ह्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दु:ख भोगणार्‍यांनी सत्कृत्ये करत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावेत.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide