१. अगे बाबेलच्या कुमारिके, खाली उतरून धुळीत बस; खास्द्यांच्या कन्ये, सिंहासन सोडून भूमीवर बस, कारण तुला ह्यापुढे नाजूक व सुकुमार म्हणणार नाहीत.
२. जाते घेऊन धान्य दळ, आपला बुरखा मागे सार, वस्त्राचा घोळ उचलून धर, मांड्या उघड्या करून नदीनाल्यांतून पार चालत जा.
३. तुझी काया उघडी पडू दे; तुझी लज्जा दिसू दे; मी सूड घेईन, कोणाची गय करणार नाही.
४. आमच्या उद्धारकर्त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे आहे.
५. अगे खास्द्यांच्या कन्ये, गप्प बस, अंधारात जाऊन लप; कारण लोक ह्यापुढे तुला राज्यांची स्वामिनी म्हणणार नाहीत.
६. मी आपल्या लोकांवर रुष्ट झालो, मी आपले वतन अपवित्र केले; त्यांना तुझ्या हाती दिले. तू त्यांच्यावर किमपि दया केली नाहीस, वृद्धांवर तू आपले भारी जू लादलेस.
७. तू म्हणालीस, “मी सर्वकाळ स्वामिनी राहीन,” म्हणून तू ह्या गोष्टी ध्यानात धरल्या नाहीत, त्यांचा परिणाम लक्षात आणला नाही.
८. अगे विलासिनी, जी तू निश्चिंत बसतेस व मनात म्हणतेस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही, मी विधवा होणार नाही, अपत्यहीनतेचा अनुभव मला घडणार नाही,” ती तू हे ऐक:
९. अपत्यहीनता व वैधव्य ही दोन्ही एकाच दिवशी, एकाच क्षणी तुला प्राप्त होतील; तुझे बहुविध मंत्रतंत्र व तुझी विपुल चेटके ह्यांना न जुमानता ती तुझ्यावर पूर्णपणे गुदरतील.
१०. कारण तू आपल्या दुष्टतेवर भिस्त ठेवलीस; तू म्हणालीस, “कोणी मला पाहत नाही;” तुझे शहाणपण व तुझे ज्ञान ह्यांनी तुला बहकवले म्हणून तू आपल्या मनात म्हणालीस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही.”
११. ह्यामुळे मंत्रतंत्रांनी निवारता येणार नाही अशी विपत्ती तुझ्यावर येईल; खंडणी देऊन टाळता येणार नाही असे अरिष्ट तुझ्यावर येईल; तुझ्या ध्यानीमनी नाही असा नाश तुला एकाएकी गाठील.
१२. तर तुझे मंत्रतंत्र व बहुविध चेटके, ज्यांचा जप तू तरुणपणापासून करून थकलीस, ती आता चालव; कदाचित त्याचा तुला उपयोग होईल, त्यांनी कदाचित तुझा धाक बसेल.
१३. तू पुष्कळ मसलती करता करता थकलीस; तर तुझ्यावर काय काय येणार हे तुला दर चंद्रदर्शनाच्या वेळी कळवणारे ज्योतिषी व नक्षत्र पाहणारे पुढे येवोत; त्यांच्याने तुझा बचाव होईल तर ते करोत.
१४. पाहा, ते धसकटासारखे झाले आहेत, अग्नीने त्यांना भस्म केले आहे; ज्वालेच्या तडाख्यातून त्यांना स्वत:चा बचाव करता येईना. हा शेकत बसण्याचा विस्तव नव्हे, भोवती बसण्याच्या शेगडीचा अग्नी नव्हे.
१५. तू ज्यांच्यासाठी शिणलीस त्या तुझ्या लोकांची अशी गत झाली आहे; तुझ्या तारुण्यापासून तुझ्याबरोबर व्यापार करणारे भटकत भटकत आपापल्या स्थानी जात आहेत; तुझा बचाव करणारा कोणी नाही.
१. हे याकोबाच्या घराण्या, ऐक, तुला इस्राएल हे नाव आहे, तू यहूदाच्या झर्यातून निघाला आहेस; तू परमेश्वराच्या नामाची शपथ वाहतोस व इस्राएलाच्या देवाचे स्तवन करतोस, पण सत्याने व नीतिमत्तेने नव्हे.
२. ते तर आपणांस पवित्र नगराचे म्हणवतात व इस्राएलाच्या देवाचा आश्रय करतात; त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे.
३. “मी मागेच पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या, माझ्या मुखातून त्या निघाल्या, मी त्या कळवल्या; मी त्या अकस्मात करू लागलो, आणि त्या घडून आल्या.
४. तू हट्टी आहेस, तुझ्या मानेचे स्नायू जसे काय लोखंड व तुझे कपाळ जसे काय पितळ आहे हे मला ठाऊक होते.
५. म्हणून हे बहुत काळापूर्वीच तुला कळवले. ते घडण्यापूर्वीच तुला विदित केले; नाहीतर तू म्हणाला असतास की ‘माझ्या मूर्तीने ते केले; माझ्या कोरीव मूर्तीच्या आज्ञेने व माझ्या ओतीव मूर्तीच्या आज्ञेने ते झाले.’
६. तू हे ऐकले आहेस, हे सर्व पाहा, तुम्हांला हे कबूल करायला नको काय? आतापासून मी नव्या गोष्टी, गुप्त गोष्टी, तुला माहीत नाहीत अशा गोष्टी तुला ऐकवतो.
७. त्या आताच उद्भवल्या, फार मागे नाहीत; त्या तुला आजपर्यंत ठाऊक नव्हत्या, नाही तर तू म्हणतास, ‘पाहा, त्या मला आधीच ठाऊक होत्या.’
८. तू त्या ऐकल्या नव्हत्या, जाणल्या नव्हत्या; प्राचीन काळापासून तुझे कान उघडले नव्हते, कारण तू विश्वासघातकी आहेस; गर्भवासापासून तुला फितुरी हे नाव पडले आहे, हे मला ठाऊक होते.
९. माझ्या नामाप्रीत्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकला; तुझा उच्छेद करू नये म्हणून माझ्या प्रशंसेप्रीत्यर्थ मी स्वतःला आवरले.
१०. मी तुला गाळले आहे, पण रुप्याप्रमाणे नव्हे; मी दु:खरूप भट्टीत तुला कसोटीस लावले आहे.
११. माझ्या, केवळ माझ्याचप्रीत्यर्थ हे मी करतो; माझ्या नामाची अप्रतिष्ठा का व्हावी? माझा गौरव मी इतरांना देत नाही.
१२. हे याकोबा, मी बोलवलेल्या इस्राएला, माझे ऐक; मी तोच आहे; मी आदि आहे व अंतही आहे.
१३. माझ्याच हाताने पृथ्वीचा पाया घातला; माझ्या उजव्या हाताने आकाश विस्तारले; मी हाक मारताच ती माझ्यापुढे एकत्र उभी राहतात.
१४. तुम्ही सर्व जमा व्हा, ऐका; त्या मूर्तींपैकी कोणी ह्या गोष्टी कळवल्या? परमेश्वराला प्रिय असलेला मनुष्य आपल्या इच्छेप्रमाणे बाबेलचे करील; तो आपले भुजबल खास्द्यांवर चालवील.
१५. मी, केवळ मीच बोललो आहे; मी त्याला बोलावले आहे, त्याला आणले आहे. त्याचा आयुष्यक्रम सफल होईल.
१६. तुम्ही माझ्याजवळ या, हे ऐका; प्रारंभापासून मी गुप्तपणे बोललो नाही; ते होऊ लागल्यापासून तेथे मी आहेच.” आणि आता प्रभू परमेश्वराने मला व आपल्या आत्म्याला पाठवले आहे.
१७. परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू, म्हणतो: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.
१८. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांती नदीसारखी, तुझी नीतिमत्ता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती;
१९. तुझा वंश रेतीइतका, तुझ्या पोटचे संतान रेतीच्या कणांइतके असते; त्याचे नाव माझ्यासमोरून उच्छेद पावले नसते, ते नष्ट झाले नसते.”
२०. तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.”
२१. त्यांना त्याने रुक्ष भूमीवरून नेले, तेथे त्यांना तहान लागली नाही; त्यांच्यासाठी त्याने खडकातून पाणी वाहवले; त्याने खडक फोडला तो पाणी खळखळा वाहिले.
२२. परमेश्वर म्हणतो, “दुर्जनांना शांती नसते.”
७. त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य व न्याय आहेत; त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत.
८. ते सदासर्वकाळ अढळ असे आहेत. ते सत्याने व सरळपणाने नेमलेले आहेत.
९. त्याने आपल्या लोकांना उद्धारदान पाठवून दिले आहे; त्याने आपला करार सर्वकाळचा नेमला आहे. त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे.
१०. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांना सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्तवन सर्वकाळ चालते.
११. जो मूर्ख आपला मूर्खपणा पुनःपुन्हा करतो, तो आपल्या ओकीकडे परतणार्या कुत्र्यासारखा होय.
१२. आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगणारा इसम तुला दिसतो काय? अशा माणसापेक्षा मूर्खाची अधिक आशा आहे.
१. बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तूही परीक्षेत पडू नयेस म्हणून स्वतःकडे लक्ष दे.
२. एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.
३. कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो.
४. तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसर्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.
५. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.
६. ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणार्याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा.
७. फसू नका; देवाचा उपहास व्हायचा नाही; कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल.
८. जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावा-पासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.
९. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.
१०. तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.
११. पाहा, मी आपल्या हाताने केवढ्या मोठ्या अक्षरांनी तुम्हांला लिहीत आहे.
१२. जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वत:चा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हांला सुंता करून घेण्यास भाग पाडतात.
१३. कारण सुंता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तर तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी तुमची सुंता व्हावी अशी इच्छा बाळगतात.
१४. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; त्याच्या द्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व जगाला मी वधस्तंभावर खिळलेला आहे.
१५. कारण [ख्रिस्त येशूमध्ये]सुंता होण्यात किंवा न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती१ हीच काय ती होय.
१६. जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो.
१७. ह्यापुढे कोणी मला त्रास न देवो; कारण मी आपल्या शरीरावर प्रभू येशूच्या खुणा धारण करून आहे.