बायबल एकाच वर्षात

१. तुझा देव परमेश्वर ज्या राष्ट्रांचा देश तुला देत आहे त्यांचा त्याने संहार केल्यावर तू त्यांच्या देशाचा ताबा घेशील आणि त्यांच्या नगरांत व घरांत वस्ती करशील,
२. तेव्हा तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन करून देत आहे त्यात तुझ्यासाठी तीन नगरे राखून ठेव.
३. मनुष्यवध करणार्‍या कोणालाही तेथे पळून जाता यावे म्हणून रस्ते तयार कर, आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन करून देत आहे त्या देशाचे तीन भाग कर.
४. मनुष्यवध करणार्‍याने तेथे पळून जाऊन आपला प्राण वाचवण्याची केलेली सोय अशी: पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजार्‍याला ठार मारले, तर त्याने तेथे जावे.
५. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य आपल्या शेजार्‍याबरोबर लाकडे तोडायला रानात गेला आणि झाड तोडताना त्यावर त्याने कुर्‍हाडीचा घाव घातला व ती दांड्यातून निसटून त्याच्या शेजार्‍याला लागली व तो मेला तर त्या माणसाने त्यांतल्या एका नगरात पळून जाऊन आपला प्राण वाचवावा.
६. अशी नगरे नसली तर त्याला फार दूर जावे लागेल आणि रक्तपाताबद्दल सूड घेणारा रागाच्या भरात त्याला गाठून मारून टाकील. खरे पाहता तो प्राणदंडास पात्र नाही, कारण पूर्वी त्याचे त्याच्याशी वैर नव्हते.
७. म्हणून मी तुला आज्ञा करतो की, तू आपल्यासाठी तीन नगरे राखून ठेव.
८. तुझा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर आणि त्याच्या मार्गांनी निरंतर चाल, अशी आज्ञा मी आज तुला देत आहे. ती सर्व तू काळजीपूर्वक पाळली व तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती त्याप्रमाणे त्याने तुझी देशमर्यादा वाढवली, आणि तुझ्या पूर्वजांना देऊ केलेला सगळा देश तुला दिला, तर ह्या तीन नगरांशिवाय आणखी तीन नगरे तू राखून ठेव;
९.
१०. म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे त्यात निर्दोष मनुष्याचा रक्तपात होणार नाही आणि त्याच्या हत्येचा दोष तुला लागणार नाही.
११. तथापि कोणी आपल्या शेजार्‍याशी दावा धरून त्याच्या घातासाठी टपला आणि त्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला व तो मेला आणि मग त्यांतल्या एका नगरात पळून गेला,
१२. तर त्याच्या गावच्या वडीलवर्गाने माणसे पाठवून तेथून त्याला आणवावे आणि त्याला मारून टाकण्यासाठी रक्तपाताचा सूड घेणार्‍याच्या हाती द्यावे.
१३. त्याच्यावर दयादृष्टी करू नकोस, पण निरपराध माणसाच्या हत्येचा दोष इस्राएलातून काढून टाक, म्हणजे तुझे कल्याण होईल.
१४. तुला मिळणार्‍या वतनात, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे त्यात पूर्वीच्या लोकांनी ठरवलेली आपल्या शेजार्‍याच्या सीमेची खूण सरकवू नकोस.
१५. एखाद्याने काही गुन्हा किंवा अन्याय केला आणि त्याने केलेल्या त्या अपराधाबद्दल त्याच्याविरुद्ध एकच साक्षीदार पुढे आला तर चालणार नाही; दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या साक्षीनेच कोणताही आरोप शाबीत व्हावा.
१६. एखाद्या साक्षीदाराने पुढे येऊन अमुक एका मनुष्याने अनाचार केल्याची द्वेषबुद्धीने साक्ष दिली,
१७. तर ज्या दोघांमध्ये हा वाद उपस्थित झाला असेल त्यांना परमेश्वरापुढे म्हणजे त्या दिवसांत असणारे याजक व न्यायाधीश ह्यांच्यापुढे उभे करावे.
१८. मग न्यायाधीशांनी त्याबाबत कसून चौकशी करावी; आणि तो खोटा साक्षीदार असल्याचे व त्याने आपल्या बांधवाविरुद्ध खोटी साक्ष दिल्याचे आढळून आले,
१९. तर आपल्या बांधवाचे जे करण्याचे त्याने योजले असेल तेच तुम्ही त्याचे करावे; अशा रीतीने तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावेस.
२०. हे ऐकून इतर लोकांना भीती वाटेल आणि येथून पुढे तुमच्यामध्ये असले दुष्कृत्य ते करणार नाहीत.
२१. तू दयादृष्टी करू नयेस; जिवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात आणि पायाबद्दल पाय असा दंड करावा.
१. तू आपल्या शत्रूंशी युद्ध करायला जाशील तेव्हा घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठे सैन्य तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिऊ नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून आणले तो तुझ्याबरोबर आहे.
२. तुम्ही रणांगणावर जाल तेव्हा याजकाने लोकांकडे येऊन त्यांच्याशी बोलावे;
३. त्याने त्यांना म्हणावे, ‘इस्राएल लोकहो, ऐका; युद्ध करण्यास आज तुम्ही आपल्या शत्रूंच्या जवळ आला आहात; तुमचे मन कचरू देऊ नका, भिऊ नका, थरथर कापू नका, आणि त्यांना पाहून घाबरू नका;
४. कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करायला व तुमचा बचाव करायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’
५. मग अंमलदारांनी लोकांना म्हणावे, ‘ज्याने नवे घर बांधून त्यात प्रवेश केला नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील.
६. द्राक्षमळा लावून त्याचे प्रथमफळ खाल्ले नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी त्याचे फळ खाईल.
७. एखाद्या स्त्रीची मागणी करून तिच्याशी लग्न केले नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी तिच्याशी लग्न करील.’
८. अंमलदारांनी सैनिकांना आणखी म्हणावे की, ‘भित्रा व भ्याड मनाचा कोण आहे? त्याने घरी परत जावे, नाहीतर त्याच्या सोबत्याच्या हृदयांचेही त्याच्यासारखेच पाणीपाणी होईल.’
९. अंमलदारांचे लोकांशी हे बोलणे संपल्यावर त्यांनी लोकांवर सेनानायक नेमावेत.
१०. युद्ध करायला तू एखाद्या नगरावर स्वारी करशील तेव्हा त्याच्याशी तहाचे बोलणे करून पाहा.
११. त्या नगराने तहाचे बोलणे कबूल करून वेस उघडली तर त्या नगरात जे लोक सापडतील ते तुझे वेठबिगार करणारे व दास होतील.
१२. पण त्याने तह न करता ते तुमच्याशी लढू लागले तर त्या नगराला वेढा घालावा.
१३. तुझा देव परमेश्वर ते नगर तुझ्या हाती देईल तेव्हा त्यातल्या प्रत्येक पुरुषाला तलवारीने मारून टाकावे;
१४. पण त्या नगरातील स्त्रिया, मुले, जनावरे इत्यादी लूट आपल्यासाठी घ्यावी; तुझा देव परमेश्वर तुला तुझ्या शत्रूंकडील जी लूट देईल तिचा उपभोग घे.
१५. जी नगरे तुझ्यापासून फार दूर असून ह्या येथल्या राष्ट्रांची नसतील त्यांच्या बाबतीत असेच करावे;
१६. पण तुझा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांची जी नगरे तुला वतन म्हणून देत आहे त्यांतला कोणताही प्राणी जिवंत ठेवू नकोस.
१७. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांचा समूळ नाश कर.
१८. न केल्यास ते आपापल्या देवांची पूजा करताना जी अमंगल कृत्ये करतात त्यांसारखी करायला ते तुम्हांला शिकवतील आणि तेणेकडून तुमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध तुम्ही पाप कराल.
१९. युद्ध करीत असताना एखादे नगर काबीज करण्यासाठी तू बरेच दिवस वेढा घालून राहिलास तर त्या नगराच्या झाडांवर कुर्‍हाड चालवून त्यांचा नाश करू नकोस, त्यांची फळे तुला खायला मिळतील म्हणून ती तोडू नकोस. मैदानातल्या झाडांना वेढा द्यायला ती काय माणसे आहेत?
२०. जी झाडे खाद्य म्हणून उपयोगाची नाहीत तीच तोडून त्यांचा नाश करावा. जे नगर तुझ्याशी युद्ध करीत असेल ते पडेपर्यंत त्या झाडांचे मोर्चे बनवून त्यावर लावावे.
१. स्मरण देण्यासाठी दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस; संतापून मला शिक्षा करू नकोस.
२. तुझे बाण माझ्या देहात खोल रुतले आहेत; तुझ्या हाताच्या भाराने मी दबलो आहे.
३. तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही; माझ्या पापामुळे माझ्या अस्थींत स्वस्थता नाही;
४. कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत; जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत.
५. माझ्या मूर्खपणामुळे माझ्या जखमा सडून त्यांना दुर्गंधी सुटली आहे.
६. माझ्या अंगाला आळेपिळे येतात, मी अगदी वाकून गेलो आहे; दिवसभर मी सुतक्याच्या वेषाने फिरतो.
७. माझ्या कंबरेला दाह सुटला आहे; माझ्या अंगी आरोग्य अगदीच राहिले नाही.
८. माझे अंग बधिर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे; मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे.
२३. शहाणा मनुष्य ज्ञान लपवून ठेवतो; परंतु मूर्खाचे मन मूर्खपणाचा पुकारा करते.
२४. उद्योग्यांच्या हाती अधिकार येतो, पण जे आळशी आहेत त्यांना दास्य प्राप्त होते.
२५. मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो.
३१. तो गालीलातील कफर्णहूम गावी खाली आला. तो शब्बाथ दिवशी त्यांना शिक्षण देत असे.
३२. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते.
३३. तेव्हा अशुद्ध भुताच्या आत्म्याने पछाडलेला कोणीएक माणूस सभास्थानात होता; तो मोठ्याने ओरडून म्हणाला,
३४. “अरे येशू नासरेथकरा! ‘तू आमच्यामध्ये का पडतोस?’ तू आमचा नाश करण्यास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र (पुरुष) तो.”
३५. तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, “गप्प राहा व ह्याच्यातून नीघ.” मग भूत त्या मनुष्याला त्यांच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले.
३६. तेव्हा सर्व जण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात!”
३७. नंतर त्याच्याविषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली.
३८. मग तो सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू कडक तापाने पडली होती, तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली.
३९. तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले, तेव्हा तिचा ताप निघाला व लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली.
४०. मग सूर्यास्ताच्या वेळी, ज्या सर्वांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांना त्यांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यांना बरे केले.
४१. “तू ख्रिस्त, देवाचा पुत्र आहेस,” असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली; परंतु त्याने त्यांना धमकावले व बोलू दिले नाही; कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांना ठाऊक होते.
४२. मग दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आले, आणि आपल्यापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते.
४३. परंतु तो त्यांना म्हणाला, “मला इतर गावांनाही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.”
४४. मग तो गालीलाच्या सभास्थानांमध्ये उपदेश करत फिरला.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide