बायबल एकाच वर्षात

१. काही दिवसांनी सोरचा राजा हीराम ह्याने आपले सेवक शलमोनाकडे पाठवले; शलमोनाचा अभिषेक होऊन तो आपल्या बापाच्या जागी गादीवर बसल्याचे वर्तमान त्याने ऐकले होते; हीराम व दावीद ह्यांची अखंड मैत्री होती.
२. शलमोनाने हीरामास सांगून पाठवले की,
३. “माझे वडील दावीद ह्यांचे शत्रू परमेश्वर पादाक्रांत करीपर्यंत त्यांच्या सभोवार युद्ध चालले असल्यामुळे त्यांना आपला देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी मंदिर बांधता आले नाही हे आपल्याला ठाऊक आहे.
४. पण आता माझा देव परमेश्वर ह्याने मला चोहीकडे स्वास्थ्य दिले आहे; कोणी शत्रू अथवा अरिष्ट राहिले नाही.
५. पाहा, मी आपला देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी मंदिर बांधण्याचे योजले आहे; परमेश्वराने माझे वडील दावीद ह्यांना म्हटले होते की, “तुझ्या जागी तुझ्या गादीवर तुझा जो पुत्र मी बसवीन तोच माझ्या नामासाठी मंदिर बांधील.” त्याप्रमाणे मी करणार आहे.
६. तर आता माझ्यासाठी लबानोन पर्वतावरील गंधसरू कापण्याची आज्ञा द्या; माझे सेवक आपल्या लोकांबरोबर राहतील; जी काही मजुरी आपण ठरवाल ती मी आपल्या सेवकांना देईन; आपल्याला हे ठाऊक आहे की इमारतीसाठी लाकडे कापायचे कसब सीदोनी लोकांसारखे आमच्या लोकांपैकी कोणात नाही.”
७. शलमोनाचा हा निरोप ऐकून हीरामास फार आनंद झाला व तो म्हणाला, “ह्या थोर राष्ट्रावर राज्य करण्यासाठी दाविदाला असा शहाणा पुत्र ज्याने दिला आहे त्या परमेश्वराचा आज मी धन्यवाद करतो.”
८. हीरामाने शलमोनाला सांगून पाठवले की, “आपण पाठवलेला निरोप मी ऐकला; गंधसरूच्या व देवदारूच्या लाकडांविषयी जे आपले सांगणे आहे त्याप्रमाणे मी करतो.
९. माझे चाकर ती लाकडे लबानोनाहून समुद्रापर्यंत नेतील; तेथे त्याचे तराफे करून जे ठिकाण आपण मला नेमून द्याल तेथे जलमार्गाने ती मी पोचती करीन; तेथे ती मी सोडवून ठेवीन; मग तेथून ती आपण घेऊन जा; माझ्या घरच्या सेवकांना अन्नसामग्री पुरवली म्हणजे पुरे.”
१०. शलमोनाला लागली तेवढी गंधसरूची व देवदारूची लाकडे हीरामाने पुरवली.
११. शलमोनाने हीरामाच्या घरच्या सेवकांना निर्वाहासाठी वीस हजार कोर गहू आणि वीस मापे निर्भेळ तेल पुरवले; हा एवढा पुरवठा प्रतिवर्षी शलमोन हीरामास करीत असे.
१२. परमेश्वराने आपल्या वचनानुसार शलमोनाला शहाणपण दिले; हीराम व शलमोन ह्यांच्यामध्ये सख्य राहिले आणि त्या दोघांनी करारमदार केले.
१३. शलमोन राजाने सर्व इस्राएलातल्या लोकांवर बिगार बसवली, ही बिगार तीस हजार मनुष्यांची होती.
१४. लबानोन पर्वतावर दरमहा पाळीपाळीने दहा-दहा हजार बिगारी त्याने पाठवले; एक महिना ते लबानोन पर्वतावर राहत व दोन महिने घरी राहत; अदोनीराम हा बिगार्‍यांवर होता.
१५. शलमोनाचे सत्तर हजार ओझेकरी आणि पहाडांवर ऐंशी हजार पाथरवट होते.
१६. शलमोनाच्या कामावरील मुख्य अंमलदारांखेरीज आणखी तीन हजार तीनशे अंमलदार कामकरी लोकांचा बंदोबस्त करण्यास नेमले होते.
१७. मंदिराचा पाया घडीव चिर्‍यांचा घालावा म्हणून राजाज्ञेने मोठमोठे मोलवान पाषाण खोदून काढण्यात आले.
१८. शलमोनाचे व हीरामाचे कारागीर आणि गिबली लोक ह्यांनी ते घडवले; मंदिर बांधण्यासाठी लाकडे व चिरे त्यांनी तयार केले.
१. इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यापासून चारशे ऐंशीव्या वर्षी, इस्राएलावरील शलमोनाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, दुसर्‍या म्हणजे जिव नावाच्या महिन्यात शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली.
२. शलमोनाने परमेश्वरासाठी मंदिर बांधले, त्याची लांबी साठ हात, रुंदी वीस हात व उंची तीस हात होती.
३. मंदिराच्या पवित्रस्थानापुढील देवडीची लांबी वीस हात म्हणजे मंदिराच्या रुंदीएवढी होती, आणि मंदिरासमोर तिची रुंदी दहा हात होती.
४. त्याने मंदिरास खिडक्या केल्या, त्यांना जाळ्या कायम बसवल्या होत्या.
५. आणखी मंदिराच्या भिंतींना लागून सभोवार मजले केले; आणि तसेच मंदिराचे पवित्रस्थान आणि परमपवित्रस्थान ह्यांच्या भिंतींना लागून सभोवार मजले केले; आणि मंदिराच्या सभोवार कोठड्या केल्या;
६. सर्वांत खालच्या मजल्याची रुंदी पाच हात, मधल्या मजल्याची सहा हात व वरच्या मजल्याची सात हात होती; त्याने मंदिराच्या आसपासच्या भिंतींना बाहेरून तोडे ठेवले होते, ते अशासाठी की मंदिराच्या भिंतींत तुळया शिरू नयेत.
७. खाणीपाशीच घडलेले चिरे आयते आणून ते मंदिर बांधले; ते बांधत असताना हातोडा, कुर्‍हाड किंवा अशा कोणत्याही लोखंडी हत्याराचा आवाज मंदिरात ऐकू आला नाही.
८. बाहेरच्या कोठड्यांतील मजल्यांचे दार मंदिराच्या उजव्या बाजूस होते; लोक नागमोडी शिडी चढून मधल्या कोठड्यांत जात; आणि मधल्यांतून वरच्या कोठड्यांत जात.
९. ह्या प्रकारे त्याने मंदिर बांधून पुरे केले व त्याला त्याने गंधसरूच्या फळ्या व तुळया ह्यांचा कडीपाट केला.
१०. सर्व मंदिराला लागून जे मजले होते ते पाच-पाच हात उंच होते व ते गंधसरूच्या तुळयांनी मंदिराला भिडवले होते.
११. मग परमेश्वराचे हे वचन शलमोनाला प्राप्त झाले:
१२. “तू हे मंदिर बांधत आहेस, त्या अर्थी तू माझ्या नियमांप्रमाणे चाललास, माझे निर्णय पाळलेस व माझ्या सर्व आज्ञा मानून त्याप्रमाणे वागलास तर मी जे वचन तुझा बाप दावीद ह्याला दिले ते तुझ्याशी कायम करीन.
१३. मी इस्राएलामध्ये वस्ती करीन, आणि माझ्या इस्राएल प्रजेस मी टाकणार नाही.”
१४. शलमोनाने ते मंदिर बांधून पुरे केले.
१५. त्याने त्या मंदिराच्या भिंतींना आतल्या बाजूने गंधसरूंच्या तक्त्यांची मढवणी केली; जमिनीपासून कडीपाटापर्यंत आतून आणि मंदिराच्या जमिनीला त्याने देवदारूची तक्तपोशी केली.
१६. मंदिराच्या मागल्या भागी जमिनीपासून कडीपाटापर्यंत वीस हात गंधसरूच्या तक्त्यांची मढवणी केली; ह्या प्रकारे त्याने परमपवित्रस्थानासाठी मंदिराला एक गाभारा तयार केला.
१७. त्या गाभार्‍यासमोरील मंदिराची लांबी चाळीस हात होती.
१८. आतल्या भागी मंदिराच्या भिंती गंधसरूच्या तक्त्यांनी मढवल्या असून त्यांवर इंद्रावणे (रानकाकड्या) व फुललेली फुले कोरली होती; चोहीकडे गंधसरूच होता, दगड असा मुळीच दृष्टीला पडत नसे.
१९. मंदिराच्या आतल्या भागी परमेश्वराच्या कराराचा कोश ठेवण्यासाठी त्याने एक गाभारा तयार केला.
२०. त्या गाभार्‍याची लांबी, रुंदी व उंची प्रत्येकी वीस हात होती. त्याने तो शुद्ध सोन्याने मढवला होता; गंधसरूची केलेली वेदीही त्याने सोन्याने मढवली.
२१. शलमोनाने ते मंदिर आतून शुद्ध सोन्याने मढवले. परमपवित्रस्थानास त्याने सोन्याच्या साखळ्या आडव्या लावल्या व ते परमपवित्रस्थानही सोन्याने मढवले.
२२. त्याने सर्व मंदिर सोन्याने मढवून मंदिराचे काम समाप्त केले. तसेच त्याने परमपवित्रस्थानाला लागून असलेली वेदी सगळी सोन्याने मढवली.
२३. जैतून लाकडाचे दहा-दहा हात उंच असे दोन करूब करून त्याने गाभार्‍यात ठेवले.
२४. करूबाचा एक पंख पाच हात व दुसरा पंख पाच हात होता. एका पंखाच्या टोकापासून दुसर्‍या पंखाच्या टोकापर्यंत दहा हात अंतर होते.
२५. दुसरा करूबही दहा हात उंच होता; दोन्ही करूब एका मापाचे व एका आकाराचे होते.
२६. एका करूबाची उंची दहा हात होती, दुसर्‍या करूबाचीही तेवढीच होती.
२७. आतल्या गाभार्‍यात त्याने ते करूब ठेवले; करूबांचे पंख असे पसरले होते की एका करूबाचा एक पंख एका बाजूच्या भिंतीला व दुसर्‍या करूबाचा एक पंख दुसर्‍या बाजूच्या भिंतीला लागलेला होता; त्याचे दुसरे दोन पंख गाभार्‍याच्या मधोमध एकमेकांना लागलेले होते.
२८. त्याने ते करूब सोन्याने मढवले.
२९. त्या मंदिराच्या सर्व भिंतींवर सभोवार आतून व बाहेरून करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरली होती.
३०. त्या मंदिराची आतली व बाहेरली जमीन सोन्याने मढवली होती.
३१. गाभार्‍याच्या दारांना त्याने जैतून लाकडाची कवाडे लावली होती; कपाळपट्टी व दाराच्या बाह्या ह्यांनी भिंतीचा पाचवा भाग व्यापला होता.
३२. ती दोन्ही दारे जैतून लाकडाची असून त्याने त्यांवर करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरली असून ती सोन्याने मढवली होती; करूबांवर व खजुरीच्या झाडांवरही सोने लावले होते.
३३. त्याने मंदिराच्या दारासाठीही जैतून लाकडाची चौकट बनवली होती; तिने भिंतीचा चौथा भाग व्यापला होता.
३४. आणि त्याची दोन कवाडे देवदारूची होती; प्रत्येक कवाडाला दोन-दोन दुमटण्या होत्या.
३५. त्याने त्यांवरही करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरली होती, व हे खोदकाम सोन्याने मढवले होते.
३६. त्याने आतले अंगण बांधले होते त्याला चिर्‍यांच्या तीन रांगा व गंधसरूच्या तुळयांची एक रांग लावली होती.
३७. चौथ्या वर्षी जिव महिन्यात परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला;
३८. आणि अकराव्या वर्षी बूल महिन्यात म्हणजे आठव्या महिन्यात मंदिर आतल्या एकंदर उपकरणसाहित्यासहित नमुन्याप्रमाणे पुरे झाले. ह्याप्रमाणे ते मंदिर बांधण्यासाठी शलमोनाला सात वर्षे लागली.
२१. देव निश्‍चये आपल्या वैर्‍यांचे मस्तक फोडील, जो आपल्या दुष्टाईत निमग्न होऊन चालतो त्याचे केसाळ माथे फोडील.
२२. प्रभू म्हणाला, “बाशानापासून मी त्यांना परत आणीन, समुद्राच्या खोल डोहातून त्यांना परत आणीन;
२३. ह्यासाठी की तू आपला पाय रक्तात बुचकळावा. तुझे शत्रू तुझ्या कुत्र्यांच्या जिभांचे खाद्य व्हावे.”
२४. हे देवा, त्यांनी तुझ्या स्वार्‍या पाहिल्या आहेत, पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या स्वार्‍या त्यांनी पाहिल्या आहेत.
२५. खंजिर्‍या वाजवत जाणार्‍या कुमारींच्या मधून गाणारे पुढे व वाजवणारे मागे चालताना म्हणतात की
२६. “ज्यांचा उगम इस्राएलापासून आहे असे तुम्ही, प्रभू जो देव त्याचा जनसभांत धन्यवाद करा.”
२७. तेथे त्यांच्यावर प्रभुत्व करणारा कनिष्ठ बन्यामीन, यहूदाचे अधिपती, व त्यांच्याबरोबरचे समुदाय जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत.
१३. जो बर्‍याची फेड वाइटाने करतो, त्याच्या घरातून अरिष्ट जाणार नाही.
१४. कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.
१५. दुष्टाला निर्दोष ठरवणारा आणि नीतिमानाला दोषी ठरवणारा, ह्या दोघांचाही परमेश्वराला वीट येतो.
२४. तेव्हा यहूद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले, “तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असलात तर आम्हांला उघड सांगा.”
२५. येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही; जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात.
२६. तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.
२७. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात;
२८. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही.
२९. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे; आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही.
३०. मी आणि पिता एक आहोत.”
३१. तेव्हा यहूद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले.
३२. येशू त्यांना म्हणाला, “मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हांला दाखवली आहेत. त्यांतून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता?”
३३. यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, “चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हांला दगडमार करत नाही, तर दुर्भाषणासाठी; कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवता.”
३४. येशूने त्यांना म्हटले, “‘तुम्ही देव आहात असे मी म्हणालो’ हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय?”
३५. ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले, - आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही -
३६. तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला, ‘मी देवाचा पुत्र आहे’ असे म्हटल्यावरून ‘तुम्ही दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय?
३७. मी आपल्या पित्याची कृत्ये करत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका;
३८. परंतु जर मी ती करतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा; अशासाठी की, माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे.”
३९. ते त्याला पुन्हा धरायला पाहू लागले; परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला.
४०. मग तो पुन्हा यार्देनेच्या पलीकडे, योहान पहिल्याने बाप्तिस्मा करत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला.
४१. तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले; ते म्हणाले, “योहानाने काही चिन्ह केले नाही खरे; तरी योहानाने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.”
४२. तेथे पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide