१. सर्व इस्राएल लोक सीनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेले, परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून प्रवास करत रफीदीम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळ दिला; तेथे त्यांना प्यावयास पाणी नव्हते.
२. तेव्हा इस्राएल लोक मोशेविरुद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याविरुद्ध का उठला आहात? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहात आहात?”
३. परंतु लोक तहानेने कासावीस झाले होते म्हणून ते मोशेकडे कुरकुर करीतच राहिले; ते म्हणाले, “तू आम्हाला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुलेबाळे, गुरेढोरे यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून आम्हाला तू येथे आणलेस काय?”
४. तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला, “मी ह्या लोकांना काय करु? ते मला ठार मारावयास उठले आहेत.”
५. परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांपुढे जा. त्यांच्यापैकी काही वडीलधारी म्हणजे पुढारी माणसे तुजबरोबर घे. नाईल नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होतीस ती तू तुझ्याबरोबर घे.
६. होरेब डोंगरावरील एका खडकावर म्हणजे सिनाय डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन, त्या खडकावर ती आपट म्हणजे त्या खडकातून पाणी बाहेर येईल. मग लोकांनी ते प्यावे.” मोशेने हे सर्व केले आणि इस्राएल लोकांच्या वडिलधाऱ्या माणसांनी म्हणजे पुढाऱ्यांनी ते पाहिले.
७. मोशेने त्या ठिकाणाचे नांव मरीबा व मस्सा ठेवले; कारण या ठिकाणी इस्राएल लोकांनी परमेश्वराविरुद्ध बंड केले आणि त्यांनी त्याची परीक्षा पाहिली. परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे किंवा नाही हे त्यांना पाहावयाचे होते.
८. रफिदीम येथे अमालेकी लोक इस्राएल लोकांवर चालून आले आणि त्यांनी त्यांच्याशी लढाई केली.
९. तेव्हा मोशे यहोशवाला म्हणाला, “काही लोकांना निवड व त्यांना घेऊन उद्या अमालेकांशी लढाई कर; देवाने मला दिलेली काठी हातात धरून मी टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन.”
१०. यहोशवाने मोशेची आज्ञा मानली व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरुद्ध लढावयास गेला त्यावेळी मोशे,अहरोन व हूर हे टेकडीच्या माथ्यावर गेले.
११. जेव्हा मोशे हात वर करी तेव्हा लढाईत इस्राएलाची सरशी होई; परंतु जेव्हा तो हात खाली करी तेव्हा पिछेहाट होई.
१२. काही वेळाने मोशेचे हात थकून गेले. मोशे बरोबर असलेल्या लोकांना मोशेचे हात वर धरून ठेवण्यासाठी काही मार्ग शोधावयाचा होता. म्हणून त्यांनी मोशेला बसण्याकरिता मोठा दगड त्याच्या खाली ठेवला; नंतर एका बाजूने अहरोन व दुसऱ्या बाजूने हूर यांनी आधार देऊन मोशेचे हात सूर्य मावळेपर्यंत तसेच वर धरून ठेवले.
१३. तेव्हा यहोशवाने या लढाईत तलवारीच्या धारेने अमालेकांचा पराभव केला.
१४. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “लढाई विषयींच्या ह्या सर्व गोष्टी पुस्तकात लिहून ठेव म्हणजे येथे काय झाले त्याविषयी लोकांना आठवण राहील; आणि यहोशवाला सांग कारण मी अमालेकी लोकांना पृथ्वीतलावरून नक्की पूर्णपणे नष्ट करीन.”
१५. मग मोशेने एक वेदी बांधली व तिला “परमेश्वर माझे निशाण.” असे नांव दिले.
१६. आणि तो म्हणाला, “परमेश्वराच्या सिंहासानावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकांशी पिढ्यान्पिढ्या युध्द होईल.”
१. मोशेचा सासरा इथ्रो, मिद्यानाचा याजक होता. मोशे व इस्राएल लोक यांना देवाने अनेक मार्गानी मदत केली तसेच त्यांना त्याने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी इथ्रोने ऐकले;
२. तेव्हा तो देवाच्या पर्वताजवळ म्हणजे होरेब किंवा सीनाय पर्वताजवळ, जेथे मोशेने तळ दिला होता तेथे मोशेला भेटावयास गेला इथ्रोने मोशेची बायको सिप्पोरा हिलाही बरोबर आणले; (सिप्पोरा मोशे बरोबर नव्हती कारण त्याने तिला माहेरी पाठवले होते.)
३. इथ्रोने मोशेच्या दोन मुलांनाही बरोबर आणले. पहिल्या मुलाचे नांव गेर्षोम होते कारण त्याचा जन्म झाला त्यावेळी मोशे म्हणाला होता, “मी या देशात परका आहे.”
४. दुसऱ्या मुलाचे नांव एलीएजर असे होते, कारण तो जन्मला तेव्हा मोशे म्हणाला होता, “माझ्या वडिलांचा देव याने मला मदत केली व मला मिसरच्या राजाच्या हातातून वाचविले.”
५. तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ म्हणजे सीनाय पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे मोशेची बायको सिप्पोरा व त्याची दोन मुले यांना बरोबर घेऊन गेला.
६. इथ्रो ने मोशेला निरोप पाठवला, “मी तुझा सासरा, इथ्रो, तुझी बायको व तिची दोन मुले यांना घेऊन तुझ्याकडे आलो आहे.”
७. तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला भेटावयास सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्याला नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारली. नंतर ते अधिक बोलणे करावयास मोशेच्या तंबूत गेले.
८. परमेश्वराने इस्राएली लोकांसाठी जे जे केले ते सर्व मोशेने इथ्रोस सांगितले. मिसर देशाचा राजा फारो व त्याचे लोक ह्यांचे परमेश्वराने काय केले तसेच मिसरहून प्रवास करताना काय काय संकटे आली व कसा त्रास झाला आणि परमेश्वराने त्या सर्वांतून दरवेळी इस्राएल लोकांना कसे वाचवले ती सर्व हकीकत मोशेने इथ्रोस सांगितली.
९. परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या ऐकल्यावर आणि मिसरच्या लोकांपासून परमेश्वराने इस्राएल लोकांना स्वतंत्र केले म्हणून इथ्रोला फार आनंद झाला.
१०. तो म्हणाला, “परमेश्वराची स्तुती असो कारण त्याने फारोच्या तावडीतून व मिसरच्या लोकांपासून तुम्हाला स्वतंत्र केले आहे.
११. परमेश्वर सर्व देवांहून महान आहे हे आता मला कळाले, कारण इस्राएल लोकापेक्षा स्वत:ला चांगले मानीत असलेल्या इतर लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.”
१२. मग इथ्रोने देवाला यज्ञ व अर्पणे केली. नंतर अहरोन व इस्राएल लोकांमधील वडीलधारी माणसे म्हणजे पुढारी देवाची विशेष उपासना करावी म्हणून मोशेचा सासरा इथ्रो याच्याबरोबर जेवावयास आले.
१३. दुसऱ्या दिवशी मोशेला लोकांचा न्यायनिवाडा करण्याचे विशेष काम होते. लोक खूप असल्यामुळे त्यांना दिवसभर मोशेसमोर उभे रहावे लागले.
१४. मोशेला इस्राएल लोकांचा न्यायनिवाडा करताना इथ्रोने पाहिले तेव्हा त्याने त्याला विचारले, “तू असे का करीत आहेस? तू एकटाच न्यायनिवाडा का करीत आहेस? आणि लोक न्यायनिवाड्यासाठी दिवसभर तुझ्याकडे का येतात?”
१५. मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “आपल्या अडचणी व आपले प्रश्न या संबंधी देवाचा काय निर्णय आहे ते विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात.
१६. लोकांचा काही भांडणतंटा असेल तर ते माझ्याकडे येतात तेव्हा कोणत्या माणसाचे म्हणणे खरे आहे हे मी ठरवितो. ह्याप्रमाणे मी लोकांना दवाचे नियम व विधी यांचे शिक्षण देतो.”
१७. परंतु मोशेचा सासरा त्याला म्हणाला, “हे तू करतोस ते चांगले नाही.
१८. तुझ्या एकट्यासाठी हे काम फार आहे त्यामुळे तू थकून जातोस व लोकही थकून जातात हे काम तुला एकट्याला करवणार नाही.
१९. तू लोकांची गाऱ्हाणी ऐकत असावेस व त्याचबरोबर त्यांसंबंधी देवाकडे बोलतही रहावेस असा मी तुला सल्ला देतो, त्यात देव तुझ्याबरोबर असो अशी मी प्रार्थना करतो.
२०. तू लोकांना देवाचे नियम व विधी या संबंधी शिक्षण दे; आणि ते त्यांनी मोडू नयेत अशी ताकीद त्यांना दे; लोकांनी आपल्या जीवनात योग्य मार्गाने चालावे व त्यासाठी त्यांनी काय करावे याविषयी त्यांना तू समजावून सांग.
२१. तू लोकांमधून कर्तबगार देवाला भिणारे, व विश्वासू, पैसे खाऊन आपला निकाल बदलून अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकावर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम.
२२. ह्या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरिता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु साध्या प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वत: निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील.
२३. तू असे करशील व परमेश्वराची तशी इच्छा असेल तर तुझे काम करीत राहणे तुला शक्य होईल, आणि त्याचवेळी लोकांचे प्रश्न सुटून ते घरी जाऊ शकतील.”
२४. तेव्हा मोशेने इथ्रोच्या म्हणण्याप्रमाणे केले.
२५. त्याने इस्राएल लोकांतून चांगले लोक निवडले आणि त्यांना हजार हजार, शंभर शंभर पन्नास पन्नास व दहादहावर नायक म्हणून नेमले.
२६. ते लोकांवर न्यायाधीश झाले. लोक सतत नायकाकडे आपली गाऱ्हाणी आणू लागले व मोशेला फार महत्वाच्या प्रकणांबद्दलच निकाल देण्याचे काम करावे लागे.
२७. मग थोड्याच दिवसांनी मोशेने आपला सासरा इथ्रो याला निरोप दिला आणि इथ्रो माघारी आपल्या घरी गेला.
२८. परमेश्वरा, तू माझा दिवा लावतोस देव माझ्या भोवतालचा अंधार उजळतो.
२९. परमेश्वरा, तुझ्या मदतीने मी सैनिकांबरोबर पळू शकतो. देवाच्या मदतीने मी शत्रूच्या भिंतीवर चढू शकतो.
३०. देवाची शक्ती परिपूर्ण आहे. परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे. जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.
३१. परमेश्वराखेरीज इतर कुठलाही देव नाही. आपल्या देवाखेरीज इतर खडक इथे नाहीत.
३२. देव मला शक्ति देतो शुध्द जीवन जगण्यासाठी तो मला मदत करतो.
३३. देव मला हरणासारखे जोरात पळण्यासाठी मदत करतो. तो मला उंचावर स्थिर ठेवतो.
३४. देव मला युध्दाचे शिक्षण देतो. त्यामुळे माझे हात शक्तिशाली बाण सोडू शकतात.
३५. देवा, तू माझे रक्षण केलेस आणि मला जिंकायला मदत केलीस तू मला तुझ्या उजव्या हाताने आधार दिलास माझ्या शत्रूचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस.
३६. माझ्या पायांना आणि घोट्यांना तू शक्ती दिलीस. त्यामुळे मी न पडता चालू शकलो.
१६. परमेश्वर या सहा, नाही सात गोष्टींचा तिरस्कार करतो.
१७. डोळे, जे माणूस गर्विष्ठ आहे हे दाखवतात. जीभ, जी खोटे बोलते, हात, जे निरपराध्यांना ठार मारतात.
१८. ह्रदय जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते. पाय जे वाईट गोष्टी करायला धाव घेतात.
१९. माणूस जो खोटे बोलतो आणि कोर्टात खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतो. माणूस जो वादविवादाला सुरुवात करतो आणि दुसऱ्यांमध्ये भांडणे लावून देतो.
१. येशूने त्यांच्याशी बोलण्यास सूरुवात करून पुन्हा एकादा बोधकथेचा वापर केला. तो म्हणाला,
२. स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले.
३. त्याने त्याच्या नोकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते आशाना बोलाविण्यास सांगिले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला.
४. नंतर राजाने आणखी काही नोकरांना पाठवून दिले. राजा नोकरांना म्हणाला, मी त्या लोकांना अगोदरच आमंत्रण दिले आहे म्हणून आता जा आणि त्यांना सांगा, पाहा, मेजवानी तयार आहे. मी चांगल्यातील चांगले बैल आणि वासरे कापली आहेत आणी सगळे तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या!’
५. नोकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगतले, पण त्यांनी नोकरांच्याकडे लक्ष दिले नाही. ते आपापल्या कामास निघून गेले एक शेतात काम करायला गेला, तर दुसरा व्यापार करायला गेला.
६. काहींनी मालकाच्या उरलेल्या नोकरांना पकडून मार दिला व जिवे मारले.
७. राजा फार रागावला. त्याने त्याचे सैन्य पाठविले आणि त्यांनी त्या खुन्यांना ठार मारले. त्यांनी त्यांचे शहर जाळले.
८. “मग राजा त्याच्या नोकरांना म्हणाला, ‘मेजवानी तयार आहे, पण ज्यांना बोलाविले होते ते पात्र नव्हते,
९. म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यांवर जा आणि तेथे तुम्हांला जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.
१०. मग ते नोकर रस्त्यावर गेले. त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले. ज्या ठिकाणी लग्नाची मेजवानी तयार होती तेथे नोकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांना जमा केले आणि ती जागा भरून गेली.
११. “मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे आला. मेजवानीसाठी साजेल असा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला.
१२. राजा त्याला म्हणला, ‘मित्रा, तुला तेथे कोणी व कसे येऊ दिले? मेजवानीला साजेसे कपडे नसताना तू येथे कसा आलास?’ पण तो गप्प राहिला.
१३. तेव्हा राजाने नोकरांना सांगितले, या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि त्याला बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल.’
१४. “कारण बोलाविलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे.”
१५. मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले.
१६. परूशांनी येशूला फसविण्याच्या हेतूने काही माणसे त्याच्याकडे पाठविली. त्यांनी आपली काही माणसे (शिष्य) आणि हेरीदी गटाच्या काही लोकांना येशूकडे पाठविले. ते म्हणाले, गुरुजी, आम्हांला माहीत आहे की आपण सत्यवचनी आहात, आणि तुम्ही देवाचा मार्ग प्रामाणिकपणे शिकविता, व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही. तुम्ही सर्वाना समान मानता.
१७. म्हणून तुमचे मत आम्हांला सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”
१८. येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला. ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहेत?
१९. कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले.
२०. तेव्हा येशूने विचारले, या नाण्यावर कोणाचे चित्र आहे? आणि या नाण्यावर कोणाचे नाव लिहिलेले आहे?”
२१. त्या लोकांनी उत्तर दिले, त्यावर कैसराचे चित्र व नाव दिले आहे.” यावर येशू त्यांना म्हणाला, जे कैसराचे आहे ते कैसराला द्या. आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या!”
२२. येशू जे म्हाणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले.
Marathi Bible 2006
Marathi Bible: Easy-to-Read Version 2006 World Bible Translation Center