१. हायहाय! लोकांनी गजबजलेली नगरी कशी एकान्तात बसली आहे! राष्ट्रांमध्ये जी थोर तिला कसे वैधव्य आले आहे! परगण्यांमध्ये जी राणी ती कशी करभार देणारी झाली आहे!
२. ती रात्रभर रुदन करीत राहते, तिच्या गालांवर अश्रू आलेले आहेत; तिच्या सर्व वल्लभांपैकी तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिला दगा दिला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.
३. यहूदाची कन्या जुलमामुळे व बिकट दास्यामुळे बंदिवान होऊन गेली आहे; ती राष्ट्रांमध्ये राहत आहे, तिला चैन नाही; तिचा पाठलाग करणार्या सर्वांनी तिला संकटावस्थेत गाठले आहे.
४. पर्वणीस जाणारे कोणी नाहीत म्हणून सीयोनेचे मार्ग शोक करीत आहेत; तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत; तिचे याजक उसासे टाकत आहेत; तिच्या कुमारी खिन्न झाल्या आहेत; ती स्वतः कष्टी आहे.
५. तिच्या शत्रूंचे वर्चस्व झाले आहे; तिचा द्वेष करणारे चैनीत आहेत; कारण तिच्या बहुत अपराधांमुळे परमेश्वराने तिला पिडले आहे; वैर्यांपुढे तिची मुले बंदिवान होऊन गेली आहेत.
६. सीयोनकन्येचे सर्व तेज गेले आहे; तिचे सरदार चारा नसलेल्या हरिणांसारखे झाले आहेत; ते पाठलाग करणार्यापुढून हतबल होऊन पळाले आहेत.
७. यरुशलेम आपल्या क्लेशाच्या व भटकण्याच्या दिवसांत आपल्या सर्व प्राचीन रम्य वस्तूंचे स्मरण करते; जुलूम करणार्याच्या हाती तिचे लोक लागले तेव्हा तिला कोणी साहाय्यकर्ता नव्हता; तिच्या शत्रूंनी तिला पाहून ती उजाड झाली म्हणून तिची थट्टा मांडली.
८. यरुशलेमेने घोर पातक केले आहे; म्हणून ती किळसवाणी झाली आहे; जे तिचा आदर करीत ते सर्व तिला तुच्छ मानत आहेत, कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे; ती उसासे टाकते, तिने पाठ फिरवली आहे.
९. तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे; ती आपला अंतकाळ स्मरली नाही; म्हणून ती विलक्षण प्रकारे अधोगतीस गेली आहे; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे परमेश्वरा, माझी विपत्ती पाहा! वैरी तोरा मिरवत आहे.”
१०. वैर्याने तिच्या सर्व रम्य वस्तूंवर आपला हात फिरवला आहे. विदेशी तिच्या पवित्रस्थानात आले हे तिने पाहिले आहे; त्यांनी तुझ्या समाजात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस.
११. तिचे सर्व लोक उसासे टाकत आहेत, अन्नान्न करीत आहेत, आपला प्राण वाचवण्यास त्यांनी भाकरीच्या मोबदल्यात आपल्या रम्य वस्तू दिल्या आहेत. “हे परमेश्वरा, लक्ष लावून पाहा, मी कशी तुच्छ झाले आहे!”
१२. “येणार्याजाणार्यांनो, हे पाहून तुम्हांला काहीच वाटत नाही काय? परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दु:ख दिले; ह्या माझ्या दु:खासारखे दुसरे कोणतेही दु:ख आहे काय, हे लक्षपूर्वक पाहा.
१३. त्याने माझ्या हाडांना वरून अग्नी लावला, ती त्याने ग्रासून टाकली; त्याने माझ्या पायांसाठी पाश मांडला, त्याने मला मागे वळवले; त्याने मला उजाड, सदा कोमेजलेली असे केले आहे.
१४. माझ्या अपराधांचे जू त्याने आपल्या हातांनी जखडले आहे; माझे अपराध एकत्र गुंफले आहेत; ते माझ्या मानेला लागले आहेत; त्याने माझे बळ खचवले आहे; ज्यांच्यापुढे मला उठता येत नाही अशांच्या हाती प्रभूने मला दिले आहे.
१५. प्रभूने माझ्यामधले माझे सर्व वीर तुच्छ केले आहेत; माझ्या तरुणांना चिरडून टाकावे म्हणून त्याने माझ्याविरुद्ध प्रचंड समुदाय बोलावला आहे; यहूदाच्या कुवार कन्येला प्रभूने द्राक्षकुंडात तुडवले आहे.
१६. ह्या सर्वांमुळे मी रडत आहे; माझा डोळा, माझा डोळा अश्रू ढाळत आहे; कारण माझ्या जिवाचे समाधान व सांत्वन करणारा मला अंतरला आहे; माझी मुले नष्ट झाली आहेत, कारण शत्रू प्रबल झाला आहे.”
१७. सीयोनेने आपले हात पसरले, पण तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; परमेश्वराने याकोबासंबंधाने आज्ञा केल्यावरून त्याच्या वैर्यांनी त्याला घेरले आहे; यरुशलेम त्यांच्यामध्ये अशुचि झाली आहे.
१८. “परमेश्वर न्यायपरायण आहे, मी तर त्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आहे; अहो सर्व लोकहो, आता ऐका, माझे दुःख पाहा; माझ्या कुमारी व माझे तरुण बंदिवान होऊन गेले आहेत.
१९. मी आपल्या वल्लभांना बोलावले, पण त्यांनी मला दगा दिला आहे; आपला जीव वाचवावा म्हणून आपल्यासाठी अन्न शोधता शोधता माझे याजक व माझे वडील जन नगरात मेले.
२०. हे परमेश्वरा, पाहा, मी किती संकटात आहे! माझ्या आतड्यांना पीळ पडला आहे; माझ्या मनाची खळबळ झाली आहे, कारण मी फार बंडखोर झाले होते. बाहेर पाहावे तर तलवार मला निर्वंश करते, आत पाहावे तर मृत्यू आहे.
२१. त्यांनी ऐकले की मी उसासा टाकत आहे व मला सांत्वन देणारा कोणी नाही; माझ्या सर्व वैर्यांनी माझ्या विपत्तीविषयी ऐकले आहे; तू हे केले म्हणून त्यांना आनंद झाला आहे. तू नेमलेला दिवस आणला म्हणजे ते माझ्यासारखे होतील.
२२. त्यांची सर्व दुष्टता तुझ्यापुढे येवो; तू माझ्या सर्व अपराधांमुळे माझे जसे केले तसे त्यांचे कर; कारण माझे उसासे बहुत आहेत व माझे हृदय म्लान आहे.”
१. हायहाय! प्रभू सीयोनकन्येस क्रोधरूप अभ्राने कसा वेष्टत आहे! त्याने इस्राएलाचे वैभव आकाशातून पृथ्वीवर झुगारून दिले आहे; त्याने आपल्या संतापाच्या दिवशी आपल्या पादासनाचे स्मरण केले नाही.
२. प्रभूने याकोबाची सर्व वसतिस्थाने गिळून टाकली आहेत, गय केली नाही; त्याने आपल्या क्रोधाने यहूदाच्या कन्येचे दुर्ग मोडून टाकले आहेत; त्याने ते धुळीस मिळवले आहेत; त्याने राज्य व त्यातले सरदार ह्यांना भ्रष्ट केले आहे.
३. त्याने संतप्त क्रोधाने इस्राएलाचे हरएक शृंग छेदून टाकले आहे; शत्रू समोर असता त्याने आपला उजवा हात माघारी घेतला आहे; सभोवतालचे सर्वकाही चाटून जाणार्या ज्वालेसारखा त्याने याकोबात पेट घेतला आहे.
४. त्याने वैर्याप्रमाणे आपले धनुष्य वाकवले आहे, तो आपला उजवा हात उगारून शत्रूप्रमाणे उभा राहिला आहे; दृष्टीस रम्य असे सर्व त्याने मारून टाकले आहेत; त्याने सीयोनकन्येच्या तंबूवर अग्नीप्रमाणे आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे.
५. प्रभू वैर्यासारखा झाला आहे; त्याने इस्राएलास गिळून टाकले आहे; त्याने त्याचे सर्व महाल गिळून टाकले आहेत, त्याने त्याचे दुर्ग मोडून टाकले आहेत; त्याने यहूदाच्या कन्येचे कण्हणे व आक्रंदन बहुगुणित केले आहे.
६. बागेतला मांडव उद्ध्वस्त करावा त्याप्रमाणे त्याने आपला मांडव उद्ध्वस्त केला आहे; त्याने आपल्या सभास्थानाचा विध्वंस केला आहे; परमेश्वराने, सण व शब्बाथ ह्यांचा सीयोनेत विसर पाडला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाने राजा व याजक ह्यांचा धिक्कार केला आहे.
७. परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे, त्याला आपल्या पवित्रस्थानाचा वीट आला आहे; त्याने त्याच्या वाड्यांच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत; पर्वणीच्या दिवशी होतो तसा त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात गोंगाट केला आहे.
८. सीयोनकन्येचा तट नाहीसा करण्याचा परमेश्वराने संकल्प केला आहे; त्याने सूत्र ताणले आहे; तो पाडून टाकण्यापासून त्याने आपला हात माघारी घेतला नाही. त्याने कोट व नगराचा तट ह्यांना शोक करायला लावले आहे; ते दोन्ही म्लान झाले आहेत.
९. तिच्या वेशी जमिनीत खचल्या आहेत; त्याने तिचे अडसर मोडून नष्ट केले आहेत; तिचा राजा व तिचे सरदार नियमशास्त्र नसलेल्या राष्ट्रांत आहेत; तिच्या संदेष्ट्यांनाही परमेश्वरापासून काही दृष्टान्त होत नाही.
१०. सीयोनकन्येचे वडील जन जमिनीवर बसले आहेत, ते स्तब्ध आहेत; त्यांनी आपल्या डोक्यांवर धूळ उडवली आहे; त्यांनी गोणपाटाची वस्त्रे परिधान केली आहेत; यरुशलेमेच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववत आहेत.
११. माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत, माझ्या आतड्यांना पीळ पडत आहेत; माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून भूमीवर पडले आहे; कारण बालके व तान्ही नगराच्या आळ्यांत मूर्च्छित होऊन पडली आहेत.
१२. घायाळ झालेल्यांप्रमाणे नगराच्या आळ्यांत मूर्च्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्यांनी प्राण सोडला, तेव्हा ती आपल्या मातांना म्हणाली, “धान्य व द्राक्षारस कोठे आहेत?”
१३. मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू? हे यरुशलेमकन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? हे सीयोनेच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे; तुला कोण बरे करील?
१४. तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टान्त पाहिला; तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही; तर त्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टान्त पाहिले.
१५. येणारेजाणारे सर्व तुला पाहून टाळ्या वाजवतात; ते यरुशलेमकन्येकडे पाहून धुत्कारतात व डोके हलवून म्हणतात, “जिला सौंदर्याची खाण, सर्व पृथ्वीचे आनंदभुवन म्हणतात, ती हीच का नगरी?”
१६. तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्यावर आपले तोंड पसरले आहे; ते धुत्कारून दात खातात; ते म्हणतात, “आम्ही त्याला गिळून टाकले आहे; खरोखर ह्याच दिवसाची आम्ही अपेक्षा करीत होतो; आम्हांला हा दिवस लाभला, हा आम्ही पाहून चुकलो.”
१७. परमेश्वराने योजल्याप्रमाणे केले आहे; त्याने प्राचीन काळापासून दिलेली ताकीद अंमलात आणली आहे; त्याने मोडतोड केली, गय केली नाही; त्याने शत्रूस तुझ्यावर हर्षवले आहे, त्याने तुझ्या वैर्यांचा उत्कर्ष केला आहे.
१८. “त्यांचे हृदय प्रभूचा धावा करीत आहे; हे सीयोनकन्येच्या तटा, तू रात्रंदिवस जलप्रवाहाप्रमाणे अश्रू ढाळ, ते खळू देऊ नकोस; तुझ्या डोळ्याच्या बाहुलीला विसावा देऊ नकोस.
१९. ऊठ, रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर; प्रभूसमोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत; तुझी बालके हरएक गल्लीच्या चवाठ्यावर भुकेने व्याकूळ झाली आहेत, त्यांच्या प्राणरक्षणासाठी त्याच्याकडे हात पसर.
२०. हे परमेश्वरा, पाहा, हे तू कोणाला केले ह्याचा विचार कर! स्त्रियांनी आपल्या पोटचे फळ, हातावर खेळवलेली आपली बालके खावीत काय? याजक व संदेष्टा ह्यांना प्रभूच्या पवित्रस्थानात जिवे मारावे काय?
२१. तरुण व वृद्ध रस्त्यांत जमिनीवर पडले आहेत; माझ्या कुमारी व माझे तरुण तलवारीने पडले आहेत; तू आपल्या क्रोधदिनी त्यांचा वध केला आहे; तू त्यांना वधले, गय केली नाहीस.
२२. तू पर्वणीच्या दिवसाप्रमाणे दहशतीच्या बाबी माझ्याकडे चोहोकडून बोलावल्या; परमेश्वराच्या क्रोधदिनी कोणी पळून जाऊन किंवा निभावून राहिला नाही; ज्यांचे मी लालनपालन केले, त्यांचा माझ्या शत्रूने फडशा उडवला आहे.”
१३७. हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस; तुझे निर्णय सरळ आहेत.
१३८. तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत.
१३९. माझ्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, कारण माझे शत्रू तुझी वचने विसरले आहेत.
१४०. तुझे वचन अगदी शुद्ध आहे; ते तुझ्या दासाला प्रिय आहे;
१४१. मी क्षुद्र व तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही.
१४२. तुझे न्याय्यत्व हे सनातन न्याय्यत्व आहे, आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे.
१४३. संकट व क्लेश ह्यांनी मला घेरले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे.
१४४. तुझे निर्बंध निरंतर न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.
९. नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थनादेखील वीट आणणारी आहे.
१०. जो सरळांना बहकावून कुमार्गाला लावतो तो आपण खणलेल्या खाचेत स्वत: पडेल; पण सात्त्विक कल्याणरूप वतन पावतील.
१. त्यांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे;
२. कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना आठवण दे.
३. कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो;
४. परंतु जेव्हा आपला तारणारा देव ह्याची दया व मनुष्यांवरील प्रेम प्रकट झाले,
५. तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्या द्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले.
६. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे;
७. ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारस व्हावे.
८. हे वचन विश्वसनीय आहे, आणि तू ह्या गोष्टींविषयी खातरीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे; ह्यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करण्याचे मनावर घ्यावे. ह्या गोष्टी माणसांसाठी चांगल्या व हितकारक आहेत;
९. परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्रा-विषयीची भांडणे, ह्यांपासून दूर राहा. कारण ती निरुपयोगी व व्यर्थ आहेत.
१०. तट पाडणार्या माणसाला एकदा-दोनदा बोध करून मग त्याला वर्ज्य कर;
११. असला माणूस बिघडलेला आहे, आणि त्याने स्वत:च स्वत:ला दोषी ठरवले असून तो पाप करत राहतो, हे तुला ठाऊक आहे.
१२. मी अर्तमाला किंवा तुखिकाला तुझ्याकडे पाठवल्यावर होईल तितके करून माझ्याकडे निकपलिसास निघून ये, कारण तेथे हिवाळा घालवण्याचे मी ठरवले आहे.
१३. जेना शास्त्री व अपुल्लो ह्यांना काही उणे पडणार नाही अशा तयारीने त्यांना शक्य तितक्या लवकर रवाना कर.
१४. आपल्या लोकांनी आपल्या अगत्याच्या गरजा पुरवल्या जाव्यात म्हणून चांगली कृत्येही करण्यास शिकावे, म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत.
१५. माझ्याबरोबरचे सर्व जण तुला सलाम सांगतात. आमच्यावर प्रेम करणार्या सर्व विश्वासणार्यांना सलाम सांग. तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide