बायबल एकाच वर्षात

१. शलमोनाला आपला वाडा बांधून पूर्ण करण्यास तेरा वर्षे लागली.
२. त्याने लबानोनगृह नावाची इमारत बांधली होती; तिची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात होती; ती इमारत गंधसरू लाकडाच्या खांबांच्या चार रांगांवर उभी होती; त्या खांबांवर गंधसरूच्या तुळया ठेवल्या होत्या.
३. खांबांच्या वर एकेका मजल्यावर पंधरा-पंधरा अशा पंचेचाळीस कोठड्या त्याने केल्या होत्या; त्यांना गंधसरूचा कडीपाट होता.
४. तिन्ही मजल्यांवर तुळया असून तिन्ही मजल्यांवर समोरासमोर खिडक्या होत्या.
५. सर्व दारे व त्यांच्या चौकटी चौरस होत्या, तिन्ही मजल्यांवरील खिडक्या समोरासमोर होत्या.
६. आणखी त्याने खांबांची एक देवडी केली होती, तिची लांबी पन्नास हात व रूंदी तीस हात होती; त्या खांबांपुढे एक देवडी केली असून सर्वांपुढे एक ओटी होती; तिला खांब होते.
७. आणि सिंहासनावर बसून न्याय करण्यासाठी एक दिवाणखाना त्याने केला होता; हीच न्यायसभा होय; तिला खालपासून वरपर्यंत गंधसरूची तक्तपोशी केली होती.
८. त्या दिवाणखान्याच्या आतल्या बाजूच्या चौकात त्याचे राहायचे घर होते; तेही वरच्यासारखेच बनवले होते. शलमोनाने फारोच्या कन्येशी लग्न केले होते; तिच्यासाठी ह्या दिवाणखान्यासारखेच घर बांधले होते.
९. ह्या सगळ्या इमारतीस पायापासून मुंढेरीपर्यंत आतून बाहेरून मोलवान ताशीव चिरे लावले होते. ते चिरे मापून करवतींनी चिरून तयार केले होते; बाहेरच्या मोठ्या अंगणात ते लावले होते.
१०. त्यांचा पायाही दहा-दहा, आठ-आठ हात लांबीच्या मोठ्या व मोलवान पाषाणांचा घातला होता.
११. त्यांवर मापून तासलेले मोलवान पाषाण व गंधसरूची लाकडे ही होती.
१२. मोठ्या अंगणाच्या सभोवार तासलेल्या चिर्‍यांच्या तीन रांगा व गंधसरूच्या तुळयांची एक रांग होती. परमेश्वराच्या मंदिराचे आतले अंगण व त्या मंदिराची देवडी ह्यांच्याप्रमाणे ही रचना होती.
१३. मग शलमोन राजाने सोर येथून हीरामास बोलावून आणले.
१४. तो नफताली वंशातील एका विधवेचा पुत्र होता; त्याचा बाप सोरातला एक तांबट होता. पितळेचे सगळे काम करण्यास लागणारे शहाणपण, अक्कल व कौशल्य हे त्याच्या ठायी भरपूर होते; तो शलमोन राजाकडे येऊन त्याचे सर्व काम करू लागला.
१५. त्याने पितळेचे अठरा-अठरा हात उंच असे दोन खांब तयार केले; त्या प्रत्येकाला वेढायला बारा हात दोरी लागे.
१६. त्याने त्या खांबांच्या शेंड्यावर बसवण्यासाठी पितळेचे दोन ओतीव कळस केले. एकेका कळसाची उंची पाच-पाच हात होती.
१७. खांबांच्या शेंड्यावरील कळसांना बुट्टीदार जाळ्या आणि साखळीच्या माळा केल्या; एकाला सात व दुसर्‍याला सात.
१८. ह्या प्रकारे त्याने खांब तयार करून त्यांच्या शेंड्यांवर प्रत्येक कळसाला झाकण्यासाठी जाळ्यांच्या एका रांगेवर डाळिंबांच्या दोन रांगा केल्या.
१९. जे कळस देवडीच्या खांबांच्या शेंड्यांवर होते त्यांच्या चार हात जागेत कमळांचे काम केले होते.
२०. प्रत्येक खांबाच्या शेंड्यावर जाळीला लागून असलेल्या गोलाईच्या जवळ आणखी एक कळस केला होता; आणि प्रत्येक कळसावर ओळीने दोनशे डाळिंबांच्या रांगा काढल्या होत्या.
२१. हे खांब त्याने मंदिराच्या देवडीजवळ उभे केले होते; उजवीकडला खांब उभा केला त्याला याखीन (तो स्थापील) हे नाव दिले होते व डाव्या बाजूला खांब उभा केला त्याला बवाज (त्याच्या ठायी सामर्थ्य) हे नाव दिले होते.
२२. खांबांच्या शेंड्यावर कमळे काढलेली होती; खांबांचे काम अशा प्रकारे संपले.
२३. मग त्याने एक गंगाळसागर ओतवला होता; त्याचा काठाकडला व्यास दहा हात होता; त्याचा आकार गोल असून त्याची उंची पाच हात होती व त्याचा परीघ तीस हात होता.
२४. त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या अंतराने दहा-दहा इंद्रावणे कोरली होती, ती त्या सगळ्या गंगाळसागरासभोवती होती, हा गंगाळसागर ओतला तेव्हाच इंद्रावणांच्या ह्या दोन रांगा त्याच्या अंगच्याच ठेवल्या होत्या.
२५. हा गंगाळसागर बारा बैलांवर ठेवला होता; त्यांपैकी तीन उत्तराभिमुख, तीन पश्‍चिमाभिमुख, तीन दक्षिणाभिमुख, व तीन पूर्वाभिमुख होते; त्यांच्यावर तो गंगाळसागर ठेवला असून त्या सर्वांचे मागले भाग आतल्या अंगाला होते.
२६. त्याची जाडी वीतभर होती; त्याचा काठ कटोर्‍याच्या काठासारखा असून त्यावर कमलपुष्पे कोरली होती; त्यात दोन हजार बथ१ पाणी राहत असे.
२७. त्याने पितळेचे दहा चौरंग केले होते; प्रत्येक चौरंगाची लांबी चार हात, रुंदी चार हात व उंची तीन हात होती.
२८. चौरंगाची घडण येणेप्रमाणे होती; त्याला पत्रे लावले होते आणि ह्या पत्र्यांना सभोवार कंगोरे होते;
२९. कंगोर्‍यांमधल्या पत्र्यांवर सिंह, बैल व करूब ह्यांच्या आकृती कोरल्या होत्या; त्या कंगोर्‍यावर एक बैठक होती; आणि सिंहाच्या व बैलांच्या खाली लोंबत्या माळा कोरल्या होत्या.
३०. प्रत्येक चौरंगाला पितळेची चार-चार चाके व पितळेच्या धुर्‍या केल्या होत्या. प्रत्येकाच्या चार्‍ही पायांना लागून ओतीव खांदे होते; ते खांदे गंगाळ ठेवण्यासाठी वरच्या भागी ओतून जोडले होते; त्यांच्या बाजू माळांनी शृंगारल्या होत्या.
३१. कळसांच्या आतल्या बाजूपासून वरपर्यंत त्याचे तोंड एक हात उंच होते; हे तोंड बैठकीसारखे असून त्याचा व्यास दीड हात होता; त्याच्यावरही काही कोरीव काम होते; त्याच्या पट्ट्या गोल नसून चौकोनी होत्या.
३२. चार्‍ही चक्रे पट्ट्यांच्या खाली होती. आणि प्रत्येक चक्राच्या धुर्‍या तळाशी जोडल्या होत्या; त्या प्रत्येक चक्राची उंची दीड हात होती.
३३. चक्राची घडण रथचक्रासारखी होती; त्यांच्या धुर्‍या, पुठ्ठे, आरे आणि तुंबे हे सर्व ओतीव होते.
३४. प्रत्येक चौरंगाच्या चार्‍ही कोपर्‍यांना चार खांदे होते; हे खांदे व चौरंग दोन्ही अखंड होते.
३५. प्रत्येक चौरंगावर अर्धा हात उंच गोलाकार झाकण होते; आणि त्या झाकणाचे टेकावे व त्याच्या पट्ट्या चौरंगाशी अखंड होत्या.
३६. त्या टेकाव्यांच्या पृष्ठभागावर व पत्र्यांवर त्यांच्या-त्यांच्या परिमाणाप्रमाणे करूब, सिंह, व खजुरीची झाडे कोरली होती व सभोवार माळा दाखवल्या होत्या.
३७. ह्या प्रकारे त्यांनी ते दहा चौरंग केले; ते सर्व एकाच साच्याचे, एकाच मापाचे व एकाच आकाराचे होते.
३८. आणखी त्याने पितळेची दहा गंगाळे केली होती; एकेका गंगाळात चाळीस-चाळीस बथ पाणी राहत असे; त्या प्रत्येक गंगाळाचा व्यास चार हात होता; त्या दहा चौरंगांतील प्रत्येकावर एकेक गंगाळ होते.
३९. त्याने पाच गंगाळे मंदिराच्या दक्षिणेस व पाच गंगाळे उत्तरेस ठेवली होती; आणि गंगाळसागर मंदिराच्या उजवीकडे, आग्नेयेस ठेवला होता.
४०. तसेच हीरामाने गंगाळे, फावडी व कटोरी ही बनवली. ह्या प्रकारे हीरामाने शलमोन राजासाठी परमेश्वराच्या मंदिराचे जे काम करायचे होते ते संपवले ते असे:
४१. दोन खांब, त्या खांबांच्या शेंड्यांवरील कळसांचे प्याल्याच्या आकाराचे भाग व त्या दोन्ही खांबांच्या शेंड्यांवरील कळसाचे प्याल्याच्या आकाराचे भाग झाकण्यासाठी जाळ्या केल्या;
४२. त्या दोन जाळ्यांसाठी चारशे डाळिंबे केली; खांबांच्या शेंड्यांवरील प्याल्याच्या आकाराच्या कळसांचे भाग झाकायच्या जाळ्यांसाठी ह्या डाळिंबाच्या दोन-दोन रांगा होत्या;
४३. दहा चौरंग व त्यांच्यावरील दहा गंगाळे;
४४. आणि एक गंगाळसागर व त्याच्याखालचे बारा बैल.
४५. तशीच पात्रे, फावडी व कटोरे ही बनवली होती; परमेश्वराच्या मंदिरातील ही जी पात्रे हीरामाने शलमोन राजासाठी बनवली होती ती सर्व उजळ पितळेची होती.
४६. राजाने ती यार्देन खोर्‍यात सुक्कोथ व सारतान ह्यांच्यामधील प्रदेशातल्या चिकणमातीत ओतवली होती.
४७. ती पात्रे पुष्कळ असल्यामुळे शलमोनाने ती वजन केल्यावाचून ठेवली होती, पितळेचे वजन केले नव्हते;
४८. परमेश्वराच्या मंदिरात जितकी पात्रे होती तितकी सगळी शलमोनाने करवली ती ही: वेदी व समर्पित भाकरी ठेवण्याचे मेज ही सोन्याची केली होती;
४९. गाभार्‍यासमोरील उजवीकडल्या पाच व डावीकडल्या पाच समया शुद्ध सोन्याच्या करवल्या होत्या; त्यांचा पुष्पशृंगार, चाडी व चिमटे ही सोन्याची करवली होती;
५०. पेले, कातरी, कटोरे, चमचे व धुपाटणी ही शुद्ध सोन्याची करवली होती; तसेच मंदिराचा अंतर्भाग म्हणजे परमपवित्रस्थान ह्याच्या दारांची व मंदिराच्या म्हणजे पवित्रस्थानाच्या दारांची बिजागरे सोन्याची करवली होती.
५१. ह्या प्रकारे परमेश्वराच्या मंदिराचे जे जे काम शलमोन राजाने हाती घेतले ते समाप्त झाले. नंतर आपला बाप दावीद ह्याने समर्पित केलेले सोने, चांदी आणि पात्रे ही शलमोनाने आत आणून परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.
१. मग शलमोन राजाने परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरातून म्हणजे सीयोनातून वरती आणण्यासाठी इस्राएलाचे वडील जन, वंशांचे सर्व प्रमुख व सर्व पितृकुळांचे सरदार ह्यांना शलमोन राजाकडे यरुशलेमेत जमा केले.
२. सर्व इस्राएल पुरुष एथानीम महिन्यात म्हणजे सातव्या महिन्यातल्या सणाच्या दिवसांत शलमोन राजाजवळ जमा झाले.
३. इस्राएल लोकांचे सर्व वडील जन आले तेव्हा याजकांनी कोश उचलून घेतला.
४. परमेश्वराचा कोश, दर्शनमंडप आणि त्या मंडपातील सर्व पवित्र पात्रे ही सर्व याजक व लेवी ह्यांनी वरती वाहून नेली.
५. शलमोन राजा व त्याच्याजवळ जमलेली सर्व इस्राएल मंडळी ह्यांनी कोशापुढे शेरडामेंढरांचे व गुराढोरांचे बली इतके अर्पण केले की त्यांच्या संख्येची मोजदाद करता आली नाही.
६. मग याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिराच्या गाभार्‍यात, परमपवित्रस्थानात करूबांच्या पंखांखाली त्याच्या ठिकाणी नेऊन ठेवला.
७. कोशाच्या जागेवर करूबांचे पंख पसरले होते; तो कोश व त्याचे दांडे ह्यांच्यावर त्यांचे आच्छादन होते;
८. त्याचे दांडे एवढे लांब होते की त्यांची टोके गाभार्‍या-समोरल्या पवित्रस्थानातून दिसत; परंतु पवित्रस्थानाबाहेरून ती दिसत नसत; ते दांडे आजपर्यंत तेथेच आहेत.
९. इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबात मोशेने ह्या कोशात दोन दगडी पाट्या ठेवल्या होत्या; त्यांखेरीज त्यात दुसरे काही नव्हते.
१०. याजक पवित्रस्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.
११. त्या मेघामुळे याजकांना सेवाचाकरी करण्यास उभे राहवेना, कारण परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरून गेले.
१२. मग शलमोन राजा म्हणाला, “परमेश्वराने म्हटले आहे की मी निबिड अंधकारात वस्ती करीन.
१३. तुझ्यासाठी निवासस्थान, तुला युगानुयुग राहण्यासाठी मंदिर मी बांधले आहे.”
१४. मग राजाने मागे वळून इस्राएलाच्या सर्व मंडळीला आशीर्वाद दिला, तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहिली.
१५. तो म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर धन्य! त्याने माझा बाप दावीद ह्याला स्वमुखाने हे वचन दिले होते व त्याने स्वहस्ते हे पूर्ण केले; ते वचन असे:
१६. मी आपल्या इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून माझ्या नामाच्या निवासार्थ मंदिर बांधण्यासाठी कोणाही इस्राएल वंशाकडून मी कोणतेही नगर निवडून घेतले नाही, पण माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर दाविदाला मी निवडून नेमले आहे.
१७. माझा बाप दावीद ह्याचा मनोदय असा होता की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ एक मंदिर बांधावे.
१८. पण परमेश्वराने माझा बाप दावीद ह्याला सांगितले की परमेश्वराच्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधावे असा तू मनोदय धरला आहेस हे तू चांगले केले आहेस;
१९. पण तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझ्या पोटी जो पुत्र येईल तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील.
२०. परमेश्वर जे हे वचन बोलला ते त्याने पुरे केले; मी आपला बाप दावीद ह्याच्या जागी येऊन परमेश्वराच्या वचनानुसार इस्राएलाच्या गादीवर बसलो आहे; आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ मी हे मंदिर बांधले आहे.
२१. परमेश्वराने आमचे वाडवडील मिसर देशातून आणले तेव्हा त्यांच्याशी परमेश्वराचा जो करार झाला तो त्या कोशात आहे; त्यासाठी मी स्थान तयार केले आहे.”
२२. शलमोनाने इस्राएलाच्या सर्व मंडळीदेखत परमेश्वराच्या वेदीसमोर उभे राहून आकाशाकडे हात पसरले;
२३. तो म्हणाला, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, वर आकाशात अथवा खाली पृथ्वीवर तुझ्यासमान कोणी देव नाही; जे तुझे सेवक जिवेभावे तुझ्यासमोर वर्ततात त्यांच्याशी तू आपल्या करारानुसार व दयेने वर्ततोस;
२४. जे वचन तू आपला सेवक, माझा बाप दावीद, ह्याला दिले ते तू पाळले आहेस; जे तू आपल्या मुखाने बोललास ते तू आपल्या हाताने पुरे केले आहेस; अशी आज वस्तुस्थिती आहे.
२५. तर आता हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, तुझा सेवक, माझा बाप दावीद ह्याला तू असे वचन दिले होते की तू माझ्यासमोर वागत आलास त्याप्रमाणेच तुझे वंशज आपली चालचलणूक ठेवण्याची खबरदारी घेतील तर माझ्यासमक्ष इस्राएलाच्या राजासनावर बसणार्‍या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा कधीही खुंटायची नाही; त्याला दिलेले हे वचनही तू पुरे कर.
२६. तर आता हे इस्राएलाच्या देवा, तू जे वचन तुझा सेवक, माझा बाप दावीद, ह्याला दिले होते ते प्रतीतीस येऊ दे.
२७. देव ह्या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ ह्यांत तुझा समावेश होणे नाही; तर हे मंदिर मी बांधले आहे ह्यात तो कसा व्हावा?
२८. तरी हे माझ्या देवा, परमेश्वरा, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे, विनंतीकडे लक्ष दे; आज तुझा सेवक तुझा धावा करीत आहे व तुझ्यापुढे प्रार्थना करीत आहे, तिच्याकडे कान दे;
२९. माझ्या नामाचा निवास येथे होईल असे ज्या स्थलाविषयी तू म्हटलेस त्या ह्या स्थलाकडे, ह्या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो; जी प्रार्थना तुझा सेवक ह्या स्थानाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक.
३०. तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्राएल ह्या स्थलाकडे तोंड करून तुझी विनवणी करतील तिच्याकडे तू कान दे; स्वर्गातील तुझ्या निवासस्थानी तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर.
३१. एखाद्याने आपल्या शेजार्‍याचा अपराध केल्यामुळे त्याला शपथ घ्यायला लावली, आणि ती ह्या मंदिरात तुझ्या वेदीसमोर त्याने घेतली,
३२. तर तू स्वर्गलोकातून ती श्रवण कर, आणि त्याप्रमाणे घडवून आण; आपल्या सेवकांचा न्याय करून दुष्टांना दुष्ट ठरव आणि ज्याचे कर्म त्याच्या माथी येऊ दे; निर्दोष्यास निर्दोषी ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्याला फळ दे.
३३. तुझे लोक इस्राएल ह्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे शत्रूंपुढे त्यांचा मोड झाल्यावर ते पुन्हा तुझ्याकडे वळतील आणि तुझ्या नामाचा स्वीकार करून ह्या मंदिरात तुझी प्रार्थना व विनवणी करतील,
३४. तेव्हा तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक, तुझे लोक इस्राएल ह्यांच्या पापाची क्षमा कर आणि जो देश तू त्यांच्या पूर्वजांना दिला त्यात त्यांना परत आण.
३५. त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे आकाशकपाटे बंद झाली आणि पर्जन्यवृष्टी खुंटली असता त्यांनी ह्या स्थानाकडे तोंड करून प्रार्थना केली, तुझ्या नामाचा स्वीकार केला व तू त्यांना दीन केल्यामुळे ते तुझ्याकडे वळले,
३६. तर तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक. इस्राएल तुझी प्रजा, तुझे सेवक, ह्यांच्या पापांची क्षमा कर, कारण ज्या सन्मार्गाने त्यांनी चालले पाहिजे तो तू त्यांना शिकवत आहेस; हा जो देश तू आपल्या लोकांना वतन करून दिला आहेस त्यावर पर्जन्यवृष्टी कर.
३७. ह्या देशावर दुष्काळ, मरी, शेते करपवून टाकणारा वारा अथवा भेरड, टोळ अथवा नाकतोडे हे आले, अथवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, कोणतीही आपत्ती अथवा रोग त्यांच्यावर आला,
३८. आणि इस्राएलातील एखादा माणूस किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपल्या जिवाला होणारा क्लेश ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी ह्या मंदिराकडे आपले हात पसरून करतील,
३९. ती तू स्वर्गातील आपल्या निवासस्थानातून ऐक, त्यांना क्षमा कर, त्याप्रमाणे घडवून आण, प्रत्येकाचे मन ओळखून त्याच्या सर्व वर्तनानुसार त्याला फळ दे; कारण सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस;
४०. म्हणजे जो देश तू आमच्या पूर्वजांना दिला त्यात ते राहतील तितके दिवस ते तुझे भय बाळगतील.
४१. तुझ्या इस्राएल लोकांतला नव्हे असा कोणी परदेशीय तुझ्या नामास्तव परदेशाहून आला,
४२. (कारण तुझे मोठे नाम, बलिष्ठ हात व पुढे केलेला बाहू हे सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच,) आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली,
४३. तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील त्याप्रमाणे कर; म्हणजे ह्या भूतलावरील सर्व देशांचे लोक तुझे नाम ओळखून तुझ्या इस्राएल लोकांप्रमाणे तुझे भय बाळगतील आणि मी जे हे मंदिर बांधले आहे त्यावर तुझे नाम आहे हे त्यांना कळून येईल.
४४. तुझे लोक तू पाठवशील तिकडे आपल्या शत्रूंशी सामना करण्यासाठी जातील आणि तू निवडलेल्या ह्या नगराकडे व तुझ्या नामासाठी मी बांधलेल्या ह्या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील,
४५. तर तू स्वर्गातून त्यांची ती प्रार्थना व विनवणी ऐक व त्यांना न्याय दे.
४६. त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केले, (कारण पाप करत नाही असा कोणीच नाही) व तू त्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांना जवळच्या अथवा दूरच्या देशात पाडाव करून नेले,
४७. तर ज्या देशात त्यांना पाडाव करून नेले तेथे ते विचार करतील आणि आपल्याला पाडाव करून नेणार्‍या लोकांच्या देशांत तुझ्याकडे वळून तुझी विनवणी करून म्हणतील, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही कुटिलतेने वागलो आहोत, आम्ही दुराचरण केले आहे’;
४८. आणि ज्यांनी त्यांना पाडाव करून नेले त्या त्यांच्या शत्रूंच्या देशात ते तुझ्याकडे जिवेभावे वळून, त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, तू निवडलेल्या नगराकडे, तुझ्या नामासाठी मी बांधलेल्या ह्या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील,
४९. तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक व त्यांना न्याय दे;
५०. तुझ्या लोकांनी जे पाप तुझ्याविरुद्ध केले असेल व जे काही अपराध तुझ्याविरुद्ध केले असतील त्या सर्वांची त्यांना क्षमा करून, त्यांचा पाडाव करणार्‍यांच्या मनात दया उत्पन्न कर म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील;
५१. कारण, ज्यांना तू मिसर देशातून, लोखंडाच्या भट्टीतून काढले तेच हे तुझे लोक, तुझे वतन होत;
५२. तर तुझे नेत्र तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे व तुझ्या इस्राएल लोकांच्या विनवणीकडे उघडे राख; ते तुझा धावा करतील; त्यांच्याकडे कान दे.
५३. कारण हे प्रभू देवा, तू आमच्या वडिलांना मिसर देशातून काढले त्या वेळी तुझा सेवक मोशे ह्याच्या द्वारे तू वचन दिलेस, त्यानुसार हे लोक तुझे वतन व्हावे म्हणून भूतलावरल्या सर्व राष्ट्रांपासून तू त्यांना वेगळे केले आहेस.”
५४. शलमोनाने आकाशाकडे हात पसरून व परमेश्वराच्या वेदीसमोर गुडघे टेकून ही सर्व प्रार्थना व विनवणी परमेश्वराला करण्याचे संपवल्यावर तो तेथून उठला.
५५. त्याने उभे राहून सर्व इस्राएल मंडळीस उच्च स्वराने आशीर्वाद दिला; तो म्हणाला,
५६. “ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्राएल लोकांना विसावा दिला तो धन्य! तो आपला सेवक मोशे ह्याच्या द्वारे जे वचन बोलला त्यातला एक शब्दही व्यर्थ गेला नाही.
५७. आपला देव परमेश्वर जसा आपल्या पूर्वजांबरोबर राहत असे तसाच तो आपल्याबरोबर राहो; तो आम्हांला न सोडो, तो आम्हांला न टाको;
५८. आम्ही त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याने आमच्या पूर्वजांना दिलेल्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळावेत म्हणून तो आमची मने आपल्याकडे लावो.
५९. ज्या शब्दांनी मी परमेश्वरापुढे विनंती केली आहे ते आपला देव परमेश्वर ह्याच्याजवळ रात्रंदिवस राहोत आणि प्रतिदिनी जरूर पडेल तसा तो आपल्या सेवकांना व आपल्या इस्राएल लोकांना न्याय देवो.
६०. ह्यावरून ह्या भूतलावरील सर्व राष्ट्रे समजतील की परमेश्वर हाच देव आहे; अन्य कोणी नव्हे.
६१. तर तुमचे मन आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे असे पूर्णपणे लागलेले असो की आजच्यासारखे त्याच्या नियमांप्रमाणे तुम्ही चालावे व त्याच्या आज्ञा पाळाव्यात.”
६२. मग राजाने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरासमोर यज्ञबली अर्पण केले.
६३. शलमोनाने शांत्यर्पणासाठी परमेश्वरापुढे अर्पण केलेले बळी बावीस हजार बैल आणि एक लाख वीस हजार मेंढरे होती. अशा रीतीने राजाने व सर्व इस्राएलांनी परमेश्वराच्या मंदिराचे प्रतिष्ठापन केले.
६४. त्या दिवशी राजाने परमेश्वराच्या मंदिराच्या पुढल्या अंगणामध्ये एक स्थान पवित्र करून होमबली, अन्नबली आणि शांत्यर्पणाची चरबी ही तेथेच अर्पण केली, कारण परमेश्वरासमोर असलेल्या पितळेच्या वेदीवर त्यांचा समावेश होईना.
६५. शलमोनाने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएल लोकांनी त्या वेळी महोत्सव केला, हमाथाच्या घाटापासून मिसर देशाच्या नाल्यापर्यंत सर्व इस्राएल लोकांचा मोठा जमाव एक सप्तक व आणखी एक सप्तक म्हणजे एकंदर चौदा दिवस आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर उत्सव करीत राहिला.
६६. आठव्या दिवशी त्याने लोकांची रवानगी केली; ते सर्व राजाचे अभीष्ट चिंतून आपापल्या डेर्‍यांस गेले; आपला सेवक दावीद व आपले लोक इस्राएल ह्यांचे जे कल्याण परमेश्वराने केले त्यामुळे त्यांना आनंद वाटला व त्यांची मने हर्षभरित झाली.
२८. तू प्रबळ व्हावे असे तुझ्या देवाने आज्ञापिले आहे; हे देवा, तू आमच्यासाठी जे केले आहेस ते दृढ कर.
२९. यरुशलेमातील तुझ्या मंदिरासाठी राजे तुला भेटी आणतील.
३०. लव्हाळ्यामध्ये राहणारे वनपशू, बैलांचा कळप आणि त्यांचे वत्स ह्यांना धमकाव; रुप्याचा लोभ धरणार्‍या लोकांना पायाखाली तुडव. युद्धप्रिय लोकांची त्याने दाणादाण केली आहे.
३१. मिसर देशातून सरदार येतील; कूश आपले हात देवाकडे पसरण्याची त्वरा करील.
३२. अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा; प्रभूची स्तोत्रे गा. (सेला)
३३. पुरातन आकाशांच्या आकाशावर आरूढ होऊन जो स्वारी करतो, त्याची स्तोत्रे गा; पाहा, तो आपला शब्द, सामर्थ्याचा शब्द, उच्चारतो.
३४. देवाच्या बलाचे वर्णन करा; इस्राएलावर त्याचे ऐश्वर्य आणि गगनमंडळात त्याचे बळ आहे.
३५. तुझ्या पवित्रस्थानातून कार्य करणारा देव भयप्रद आहे, इस्राएलाचा देव आपल्या लोकांना बल व सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो.
१६. मूर्खाला बुद्धी नसता ज्ञानाची खरेदी करण्यासाठी तो हाती द्रव्य का घेतो?
१७. मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.
१. बेथानी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता; मरीया व तिची बहीण मार्था ह्या त्याच गावच्या होत्या.
२. ज्या मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले तिचा हा, आजारी पडलेला लाजर, भाऊ होता.
३. म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की, “प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे.”
४. ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा ह्यासाठी आहे.”
५. मार्था, तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीती होती.
६. म्हणून, तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला.
७. त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण पुन्हा यहूदीयात जाऊ या.”
८. शिष्य त्याला म्हणाले, “गुरूजी, यहूदी नुकतेच तुम्हांला दगडमार करायला पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय?”
९. येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो.
१०. परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठायी उजेड नसतो.”
११. हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो.”
१२. ह्यावरून शिष्य त्याला म्हणाले, “प्रभूजी, त्याला झोप लागली असेल तर तो बरा होईल.”
१३. येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता; परंतु तो झोपेतून मिळणार्‍या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले.
१४. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, “लाजर मेला आहे;
१५. आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही विश्वास ठेवावा; तरी आपण त्याच्याकडे जाऊ.”
१६. तेव्हा दिदुम१ म्हटलेला थोमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, “आपणही ह्याच्याबरोबर मरायला जाऊ.”
१७. येशू आला तेव्हा त्याला कळले की, त्याला कबरेत ठेवून चार दिवस झाले आहेत.
१८. बेथानी यरुशलेमेजवळ, म्हणजे तेथून पाऊण कोसावर होती.
१९. तेथे यहूद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरीया ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते.
२०. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली; पण मरीया घरातच बसून राहिली.
२१. मार्था येशूला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता;
२२. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.”
२३. येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”
२४. मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.”
२५. येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल;
२६. आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय?”
२७. ती त्याला म्हणाली, “होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे.”
२८. असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरीया हिला गुप्तपणे बोलावून म्हणाली, “गुरूजी आले आहेत व ते तुला बोलावत आहेत.”
२९. हे ऐकताच ती त्वरेने उठून त्याच्याकडे गेली.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide