बायबल एकाच वर्षात

१. ज्ञानी पुरुषासमान कोण आहे? कोणत्याही गोष्टीचा उलगडा करण्याचे कोणाला समजते? ज्ञान मनुष्याचे मुख तेजस्वी करते; तेणेकरून त्याच्या मुखाचा उद्धटपणा पालटतो.
२. मी म्हणतो की राजाची आज्ञा पाळ; तू देवाची शपथ घेतली आहेस म्हणून ती पाळ.
३. त्याला सोडून जाण्याची घाई करू नकोस; दुष्ट मसलतीत शिरू नकोस; कारण त्याला आवडेल ते तो करतो,
४. राजाचा शब्द तर प्रबळ असतो; “तू हे काय करतोस,” असे त्याला कोण म्हणेल?
५. जो आज्ञा पाळतो तो अनिष्ट पाहणार नाही; नेमलेला काळ व न्यायसमय हे ज्ञान्याच्या मनाला अवगत होतील.
६. प्रत्येक गोष्टीला नेमलेला काळ व न्यायसमय असतो, कारण मनुष्याची भयंकर दुर्दशा होते.
७. पुढे काय होणार हे त्याला ठाऊक नसते; कसे काय होणार हे त्याला कोण सांगेल?
८. प्राणावर कोणा मनुष्याची अशी सत्ता नसते की तो त्याला जाऊ देणार नाही; मरणदिवस कोणाच्या स्वाधीन नाही; हा संग्राम कोणाला सुटणार नाही. दुष्कर्म आपल्या मालकाचा बचाव करीत नाही.
९. हे सर्व मी पाहिले आहे; भूतलावर चालू असलेल्या सर्व कृत्यांकडे मी आपले चित्त लावले आहे; एक मनुष्य दुसर्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.
१०. त्या वेळी माझ्या नजरेस असे आले की दुष्टांना मूठमाती मिळून ते विराम पावतात; नीतीने वागणार्‍यांना पवित्रस्थान सोडून जावे लागते, आणि नगरातील लोक त्यांना विसरून जातात; हेही व्यर्थ.
११. दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्रांचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते.
१२. पापी शंभरदा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खातरी आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्याला भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल;
१३. पण दुष्टाचे कल्याण होणार नाही, व त्याचे छायारूप आयुष्य दीर्घ असणार नाही; कारण तो देवाला भिऊन वागत नाही.
१४. पृथ्वीवर आणखी एक व्यर्थ गोष्ट घडते: असे काही नीतिमान लोक असतात की दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती ह्यांची होते; आणि असे काही दुर्जन असतात की नीतिमानांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती ह्यांची होते; हेही व्यर्थ! असे मी म्हटले.
१५. मग मी हास्यविनोदाची प्रशंसा करून म्हणालो, ह्या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी ह्यांपेक्षा इष्ट त्याला काही नाही; देवाने त्याला ह्या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यात श्रम करीत असता एवढेच त्याच्याबरोबर राहणार.
१६. मग ज्ञानाची ओळख करून घेण्याकडे व पृथ्वीवर चालू असलेला उद्योग पाहण्याकडे मी आपले चित्त लावले; कारण अहोरात्र ज्यांचा डोळ्यास डोळा लागत नाही असेही लोक असतात.
१७. मग मी देवाच्या सर्व कार्याकडे लक्ष दिले, तेव्हा असे दिसून आले की भूतलावर जे काही कार्य चालले आहे ते मनुष्याला कळत नाही; शिवाय मनुष्याने परिश्रम करून त्याचा शोध केला तरी त्याचा थांग लागत नाही; ज्ञानी पुरुष म्हणेल की मी ते शोधून काढीन; तर त्यालाही त्याचा थांग लागायचा नाही.
१. ह्या सगळ्यांचे मनन मी केले आणि हे स्पष्टपणे समजण्याचा प्रयत्न केला; ते हे की नीतिमान व ज्ञानी आणि त्यांची कृत्ये ही सर्व देवाच्या स्वाधीन आहेत; आपण प्रेम करणार की वैर करणार हे मनुष्याला कळत नाही; हे सर्वकाही त्याला पुढे प्राप्त होणार असते.
२. जे काही घडते ते सर्वांना सारखेच घडते; नीतिमान व दुष्ट, सात्त्विक, शुद्ध व अशुद्ध, यज्ञ करणारा व यज्ञ न करणारा ह्या सर्वांची एकच गती होते; सात्त्विकाची व पाप्याची, शपथ वाहणार्‍याची, तशीच शपथ वाहण्यास भिणार्‍याची सारखीच दशा होते.
३. भूतलावर जे काही घडते त्या सर्वांत हे एक अनिष्ट आहे की सर्वांची सारखीच गती होते; मानवपुत्रांच्या मनात दुष्टता भरलेली असते, त्यांचे मन जन्मभर भ्रांतिमय असते, मग ते मेलेल्यांना जाऊन मिळतात.
४. जो जीवसृष्टीशी मिळून असतो त्याला आशा असते, कारण मृत सिंहापेक्षा जिवंत श्वान बरा.
५. आपल्याला मरायचे आहे हे जिवंतांना निदान कळत असते; पण मेलेल्यांना तर काहीच कळत नाही; त्यांना आणखी काही फलप्राप्ती होणार नसते; त्यांचे स्मरण कोणाला राहत नाही.
६. त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत; ह्या भूतलावरील व्यवहारात त्यांचा भाग कधीही असणार नाही.
७. जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे.
८. तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत; तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो.
९. देवाने ह्या भूतलावर तुझ्या व्यर्थ आयुष्याचे जे दिवस नेमले आहेत ते तुझे सर्व व्यर्थ दिवस आपल्या प्रिय स्त्रीबरोबर सुखाने घालव. आयुष्यात हा तुझा वाटा आहे; ह्या भूतलावर जे परिश्रम तू करतोस त्यांचे हे फळ तुला आहे.
१०. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जात आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान ह्यांचे नाव नाही.
११. मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले तो वेगवानांनाच शर्यतीत यश व वीरांनाच युद्धात विजयश्री मिळते असे नाही; शहाण्यांनाच अन्न व समंजसांनाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही; तर सर्व कालवश व दैववश आहेत.
१२. कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही; अपायकारक जाळ्यात सापडणार्‍या माशांप्रमाणे, पाशात अडकणार्‍या पक्ष्यांप्रमाणे, मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो; त्यात ते सापडतात.
१३. मी भूतलावर पुढील प्रकारचे ज्ञान पाहिले, ते मला फार थोर भासले; ते असे:
१४. एक लहानसे नगर होते, त्यात थोडेच लोक होते; त्यावर एका मोठ्या राजाने चढाई करून त्याला वेढा दिला व त्याच्यासमोर मोठाले मोर्चे लावले.
१५. त्यात एक गरीब पण बुद्धिमान मनुष्य होता; त्याने आपल्या बुद्धिबलाने त्या नगराचा बचाव केला; पण त्या गरीब मनुष्याचे स्मरणही कोणाला राहिले नाही.
१६. तेव्हा मी म्हणालो, बलाहून ज्ञान श्रेष्ठ खरे; तथापि गरिबाची अक्कल लोक तुच्छ मानतात आणि त्याचे शब्द ऐकत नाहीत.
१७. मूर्खांच्या राजाने केलेल्या ओरडीपेक्षा शांतपणे ऐकलेले शहाण्यांचे शब्द बरे.
१८. युद्धशस्त्रांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे; एकटा पापी बहुत हिताची नासाडी करतो.
१. गंध्याच्या तेलास, मरून पडलेल्या माश्यांमुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा ह्यांवर बसतो.
२. शहाण्याचे मन उजवीकडे पण मूर्खाचे मन डावीकडे असते.
३. मूर्ख आपल्या बुद्धीशी फारकत करून वाटेने चालला असता ज्याला-त्याला म्हणतो, तू मूर्ख आहेस.
४. तुझ्यावर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नकोस, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात.
५. भूतलावर मी एक अनिष्ट पाहिले, ते अधिपतीच्या चुकीने होते असे मला दिसले;
६. ते हे की मूर्खत्व अति प्रतिष्ठित स्थानी स्थापित होते, आणि श्रीमंतांना नीच स्थानी बसावे लागते.
७. चाकर घोड्यावर बसताना व सरदार चाकराप्रमाणे जमिनीवर पायी चालताना मी पाहिले.
८. जो खड्डा खणतो तोच त्यात पडतो; जो कुंपण तोडतो त्याला सर्प डसतो.
९. धोंडे फोडणार्‍याला त्यांपासून इजा होते; लाकडे तोडणारा त्यांमुळे धोक्यात येतो.
१०. लोखंडी हत्यार बोथटले व त्याला धार लावली नाही तर अधिक जोर लावावा लागतो. कार्यसिद्धीस ज्ञान उपयोगाचे आहे.
११. सर्पावर मंत्रप्रयोग होण्यापूर्वी तो डसला तर पुढे मांत्रिकांचा काही उपयोग नाही.
१२. शहाण्याच्या तोंडचे शब्द अनुग्रहपर असतात; पण मूर्खाचे तोंड त्यालाच ग्रासते.
१३. त्याच्या तोंडच्या शब्दांच्या आरंभी मूर्खपणा व त्याच्या भाषणाच्या अंती अपायकारक वेडेपणा असतो.
१४. मूर्ख फार वाचाळपणा करतो, परंतु पुढे काय होणार हे मनुष्याला ठाऊक नसते; त्याच्यामागे काय होणार हे त्याला कोणाच्याने सांगवेल?
१५. मूर्ख श्रम करून करून थकतो पण त्याला शहराची वाटदेखील उमगत नसते.
१६. हे देशा, तुझा राजा अल्पवयी असला व तुझे सरदार प्रातःकाळी उठून खातपीत बसले तर तुझी दुर्दशा केवढी!
१७. हे देशा, तुझा राजा कुलीन घराण्यातला असला व तुझे सरदार नशेसाठी नव्हे तर बलप्राप्तीसाठी योग्य वेळी भोजन करीत असले तर तू धन्य!
१८. आळसाने घराचे छप्पर खाली येते; हाताच्या सुस्तीने घर गळते.
१९. ख्यालीखुशालीसाठी मेजवानी करतात; द्राक्षारस जिवास उल्लास देतो; पैशाने सर्वकाही साध्य होते.
२०. तू आपल्या मनातही राजाला शाप देऊ नकोस; आपल्या निजायच्या खोलीतसुद्धा श्रीमंताना शिव्याशाप देऊ नकोस; कारण अंतराळातले पाखरू तुझे शब्द घेऊन उडून जाईल; पक्षी तुझी गोष्ट प्रकट करील.
६. जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करतो;
७. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्राएलाच्या वंशजांना विदित केली.
८. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे.
९. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही.
१०. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हांला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही.
११. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्यांचे भय धरणार्‍यांवर विपुल आहे.
१२. पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.
१३. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणार्‍यांवर ममता करतो.
१४. कारण तो आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो.
१०. संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय.
११. ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यांना सोडव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर.
१२. “आम्हांला हे ठाऊक नव्हते” असे म्हणशील तर हृदये तोलून पाहणार्‍याला हे कळत नाही काय? तुझा जीव राखणार्‍याला माहीत नाही काय? तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही काय?
१९. तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य काहीतरी आहे, अथवा मूर्ती काहीतरी आहे, असे माझे म्हणणे आहे काय? नाही;
२०. तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ‘ते देवाला नव्हे तर भुतांना करतात’; आणि तुम्ही भुतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही.
२१. तुमच्याने प्रभूचा प्याला व भुतांचाही प्याला पिववत नाही; ‘प्रभूच्या मेजावरचे’ व भुतांच्याही मेजावरचे तुमच्याने खाववत नाही.
२२. आपण ‘प्रभूला ईर्ष्येस पेटवतो काय?’ आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहोत काय?
२३. “मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे” तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. “मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे” तरी सर्व गोष्टी उन्नती करतातच असे नाही.
२४. कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसर्‍याचेही पाहावे.
२५. बाजारात खाटीक जे काही विकतात ते सदसद्विवेकबुद्धीने चौकशी न करता खा;
२६. कारण “पृथ्वी व तिच्यावर जे काही भरले आहे ते परमेश्वराचे आहे.”
२७. विश्वास न ठेवणार्‍यांपैकी कोणी तुम्हांला जेवायला बोलावले, आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर जे काही तुमच्यापुढे वाढतील ते सदसद्विवेकबुद्धीने चौकशी न करता खा;
२८. परंतु कोणी तुम्हांला सांगितले की, “हा मूर्तीचा नैवेद्य आहे,” तर ज्याने हे सुचवले त्याच्याखातर व सदसद्विवेक-बुद्धीखातर खाऊ नका. [कारण पृथ्वी व तिच्यावरील परिपूर्णता प्रभूची आहे.]
२९. येथे मी जिला सदसद्विवेकबुद्धी म्हणतो ती तुझी नव्हे तर त्याची; कारण माझ्या मुक्ततेचा निर्णय दुसर्‍याच्या सदसद्विवेकबुद्धीने का व्हावा?
३०. मी आभारपूर्वक खात असेन तर ज्याविषयी मी आभार मानतो त्याविषयी माझी निंदा का व्हावी?
३१. म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.
३२. यहूदी, हेल्लेणी व देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखळवणारे होऊ नका;
३३. तर जसे मी सर्व गोष्टींत सर्वांना संतोषवतो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide