बायबल एकाच वर्षात

१. जो भग्नांड आहे अथवा ज्याचे लिंगच्छेदन झाले आहे त्याने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये.
२. जारजाने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये; दहाव्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये.
३. अम्मोनी आणि मवाबी ह्यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये; दहाव्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही कधीच परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये;
४. कारण तुम्ही मिसर देशाहून येत असताना ते अन्नपाणी घेऊन तुमच्या भेटीस आले नाहीत, एवढेच नव्हे तर त्यांनी तुला विरोध करून अराम-नहराईम१ येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला द्रव्य देऊन तुला शाप देण्यासाठी आणले.
५. तरी तुझा देव परमेश्वर हा बलामाचे ऐकायला तयार झाला नाही; उलट तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्याकरता त्या शापाचा आशीर्वादच केला, कारण तुझा देव परमेश्वर ह्याची तुझ्यावर प्रीती होती.
६. तू आपल्या हयातीत त्याचे क्षेमकुशल कधीही चिंतू नकोस.
७. अदोम्याचा तुला वीट नसावा, कारण तो तुझा बंधू होय; मिसर्‍यांचा तुला वीट नसावा, कारण तू त्याच्या देशात उपरा होतास.
८. त्यांच्या तिसर्‍या पिढीत जन्मलेल्या लोकांना परमेश्वराच्या मेळ्यास येण्याची परवानगी आहे.
९. तुझ्या शत्रूंशी लढाई करण्यासाठी बाहेर पडून तू तळ देशील तेव्हा सर्व दुष्कृत्यांपासून दूर राहा.
१०. जर कोणा पुरुषाला रात्री काही अशुद्धता आपोआप प्राप्त झाली तर त्याने छावणीबाहेर जावे, त्याने छावणीच्या आत येऊ नये;
११. पण संध्याकाळ जवळ आली म्हणजे त्याने स्नान करावे आणि सूर्यास्तानंतर छावणीच्या आत यावे.
१२. तुला बहिर्दिशेस जाण्यासाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी;
१३. आणि तुझ्या हत्यारांमध्ये एक कुदळ असावी, तू बहिर्दिशेस बसण्यापूर्वी कुदळीने खणून खड्डा करावा, नंतर आपला मळ झाकून टाकावास.
१४. कारण तुझा देव परमेश्वर तुझा बचाव करण्यासाठी आणि तुझे शत्रू तुझ्या हाती देण्यासाठी छावणीत फिरत असतो, म्हणून तू आपली छावणी पवित्र ठेवावीस, नाहीतर तुझ्यामध्ये एखादा अनुचित प्रकार पाहून तो तुझ्यापासून निघून जाईल.
१५. एखादा दास आपल्या धन्यापासून पळून जाऊन तुला शरण आला तर त्याला त्याच्या धन्याच्या स्वाधीन करू नकोस,
१६. त्याने आपल्या पसंतीनुसार निवडलेल्या ठिकाणी तुझ्या एखाद्या गावात तुझ्याबरोबर राहावे; त्याला जाच करू नकोस.
१७. इस्राएलकन्यांपैकी कोणीही वेश्या२ होऊ नये, आणि इस्राएलपुत्रांपैकी कोणालाही पुंमैथुनास वाहू नये.
१८. वेश्येच्या कमाईचा किंवा कुत्र्याच्या३ प्राप्तीचा पैसा कोणताही नवस फेडण्यासाठी तू आपला देव परमेश्वर ह्याच्या घरात आणू नकोस, कारण ह्या दोन्हींचाही तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे.
१९. आपल्या बांधवांशी व्याजबट्ट्याचा व्यवहार करू नकोस, पैशावर व्याज, अन्नधान्यावर वाढ किंवा इतर कोणत्याही पदार्थावर वाढीदिढी करू नकोस.
२०. वाटल्यास परदेशीयाशी वाढीदिढीचा व्यवहार कर, पण आपल्या बांधवाशी करू नकोस, म्हणजे जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे ज्या ज्या कामाला तू हात घालशील त्यात तुझा देव परमेश्वर तुला आशीर्वाद देईल.
२१. तू आपला देव परमेश्वर ह्याला नवस करशील तेव्हा तो फेडण्यास विलंब लावू नकोस, कारण तुझा देव परमेश्वर तुला त्याचा अवश्य जाब विचारील; विलंब लावल्यास तुला पाप लागेल.
२२. तथापि तू नवस न करण्याचे ठरवलेस तर तुला पाप लागणार नाही.
२३. ज्या अर्थी तू आपल्या मुखाने वचन देऊन आपला देव परमेश्वर ह्याला स्वखुशीने नवस केला आहेस त्या अर्थी तुझ्या मुखातून निघालेले वचन काळजीपूर्वक पाळ.
२४. आपल्या शेजार्‍याच्या द्राक्षमळ्यात गेलास तर मनमुराद द्राक्षे खा, मात्र आपल्या भांड्यात काही घेऊ नकोस.
२५. आपल्या शेजार्‍याच्या उभ्या पिकात तू गेलास तर वाटल्यास कणसे खुडून हातावर चोळ, पण आपल्या शेजार्‍याच्या उभ्या पिकास विळा लावू नकोस.
१. एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर त्याला तिची वागणूक अनुचित वाटल्यामुळे ती त्याला आवडेनाशी झाली, तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला घराबाहेर काढावे.
२. त्याच्या घरून बाहेर निघाल्यावर तिने जाऊन पाहिजे तर दुसरा नवरा करावा;
३. पण त्या पुरुषाची तिच्यावर इतराजी होऊन त्यानेही सूटपत्र लिहून तिच्या हाती दिले व तिला घराबाहेर काढले, किंवा तिच्याशी लग्न केलेला हा दुसरा नवरा मेला,
४. तर तिला घालवून देणार्‍या पहिल्या नवर्‍याने ती भ्रष्ट झाल्यामुळे तिला पुन्हा बायको करून घेऊ नये, कारण परमेश्वराला ह्या गोष्टीचा वीट आहे. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्या देशाला पापदोष लागण्यास कारण होऊ नकोस.
५. एखाद्या पुरुषाचे नुकतेच लग्न झाले असल्यास त्याने सैन्याबरोबर मोहिमेवर जाऊ नये, अथवा काहीही कामगिरी त्याच्यावर टाकण्यात येऊ नये; त्याने वर्षभर घरीच राहावे आणि आपल्या बायकोला रंजवावे.
६. जाते किंवा जात्याची वरची तळी कोणी गहाण ठेवून घेऊ नये; असे करणे म्हणजे मनुष्याचे जीवितच गहाण ठेवून घेणे होय.
७. आपल्या एखाद्या इस्राएल बांधवाला कोणी चोरले आणि तो त्याला दासाप्रमाणे वागवताना किंवा विकताना आढळला, तर त्या चोराला जिवे मारावे; अशा प्रकारे तू आपल्यामधून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.
८. महारोगाच्या व्याधीसंबंधाने सांभाळा; लेवीय याजक तुम्हांला जे शिकवतील ते अगदी काळजीपूर्वक पाळा; मी त्यांना आज्ञा केली आहे त्याप्रमाणे काळजीपूर्वक पाळा.
९. तुम्ही मिसर देशातून निघाल्यावर तुमचा देव परमेश्वर ह्याने वाटेत मिर्यामेचे काय केले ह्याचे स्मरण ठेवा.
१०. आपल्या शेजार्‍याला तू कोणत्याही प्रकारचे कर्ज दिलेस तर त्याच्याबद्दल तारण आणण्यासाठी त्याच्या घरात शिरू नकोस.
११. तू बाहेर उभे राहावेस आणि ज्याला तू कर्ज दिले असेल त्याने त्याच्याबद्दलचे तारण तुझ्याकडे बाहेर आणावे.
१२. तो मनुष्य कंगाल असला तर त्याचे तारणादाखल घेतलेले वस्त्र अंगावर घेऊन झोपू नकोस,
१३. सूर्य मावळत आहे तोच त्याचे तारण त्याला अवश्य परत कर म्हणजे तो आपले वस्त्र अंगावर घेऊन निजेल आणि तुझे अभीष्ट चिंतील; आणि तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुझे नीतिमत्त्व ठरेल.
१४. तुझ्या बांधवांपैकी अथवा देशातील तुझ्या गावात राहणार्‍या उपर्‍यांपैकी एखादा मजूर दीन व कंगाल असला तर त्याच्यावर जुलूम करू नकोस,
१५. त्याला ज्या दिवसाची मजुरी त्याच दिवशी दे, कारण तो गरीब असल्यामुळे त्याचे सारे लक्ष मजुरीकडे लागलेले असते. ती सूर्यास्तापलीकडे ठेवू नकोस. ठेवलीस तर तो तुझ्याविरुद्ध परमेश्वराकडे गार्‍हाणे करील आणि तुला पाप लागेल.
१६. मुलांसाठी बापांना जिवे मारू नये अथवा बापांसाठी मुलांना जिवे मारू नये; जो गुन्हा करील त्यालाच त्याच्या गुन्ह्याबद्दल जिवे मारावे.
१७. उपर्‍याच्या अथवा अनाथाच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नकोस; विधवेचे वस्त्र गहाण ठेवून घेऊ नकोस,
१८. तू मिसर देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला तेथून सोडवले ह्याची आठवण ठेव; म्हणूनच असे वागण्याची मी तुला आज्ञा देत आहे.
१९. तू आपल्या शेतातील पीक कापशील तेव्हा जर शेतात एखादी पेंढी चुकून राहिली तर ती आणायला परत जाऊ नकोस; उपरे, अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी ती राहू दे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामात तुला आशीर्वाद देईल.
२०. तू आपला जैतुनवृक्ष झोडशील तेव्हा एकदा झोडलेली फांदी पुन्हा झोडू नकोस; ती उपरे, अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी असू दे.
२१. आपल्या द्राक्षमळ्यातली द्राक्षे खुडशील तेव्हा राहिलेली पुन्हा तोडू नकोस; ती उपरे, अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी असू दे.
२२. तू मिसर देशात दास होतास ह्याची आठवण ठेव; म्हणूनच असे वागण्याची मी तुला आज्ञा करीत आहे.
१. मुख्य गवई यदूथून ह्याच्यासाठी दाविदाचे स्तोत्र. मी म्हणालो की, “मी आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून आपल्या चालचलणुकीस जपेन; माझ्यासमोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन.”
२. मौन धरून मी गप्प राहिलो, बरेदेखील काही बोललो नाही, तरी माझ्या दु:खाने उचल खाल्ली.
३. माझे हृदय आतल्या आत संतप्त झाले; मला ध्यास लागला असता माझ्यामध्ये अग्नी भडकला, तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो;
४. “हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे, व माझे आयुष्यमान किती आहे, हे मला समजू दे; म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल.
५. पाहा, तू माझे दिवस वीतभर केले आहेत; माझ्या आयुष्याचा काळ तुझ्यापुढे काही नाही; एखादा मनुष्य कितीही खंबीर असला तरी तो श्वासरूपच होय, हे खास. (सेला)
६. खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगाच धामधूम करतो, तो धन साठवतो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही.
१. सुज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो, पण निंदक निषेध ऐकत नाही.
२. तोंडच्या शब्दांनी मनुष्य स्वत: चांगले फळ भोगतो, पण कपटी इसमांच्या जिवाला बलात्काररूप फळ मिळते;
३. जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो; जो आपले तोंड वासतो त्याच्यावर अरिष्ट येते;
१७. एके दिवशी असे झाले की, तो शिक्षण देत असताना गालीलातील प्रत्येक गावाहून आणि यहूदीया व यरुशलेम येथून आलेले परूशी व शास्त्राध्यापक तेथे बसले होते; आणि रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते.
१८. तेव्हा पाहा, कित्येक माणसांनी कोणाएका पक्षाघाती मनुष्याला बाजेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला;
१९. परंतु दाटीमुळे त्याला आत नेण्यास वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजेसकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले.
२०. तेव्हा त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, “हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
२१. तेव्हा शास्त्री व परूशी असा वादविवाद करून म्हणाले की, “हा दुर्भाषण करणारा कोण आहे? केवळ देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?”
२२. येशूने त्यांचे विचार ओळखून त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का करत आहात?
२३. ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘उठून चाल’ ह्यांतून कोणते म्हणणे सोपे?
२४. परंतु पृथ्वीवर पापांची क्षमा करण्यास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून (तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला), मी तुला सांगतो, ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा.”
२५. तेव्हा तो लगेचच त्यांच्यासमक्ष उठून ज्यावर तो पडून होता ते उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णीत आपल्या घरी गेला.
२६. तेव्हा ते सर्व अगदी थक्क झाले; ते देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, “आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.”
२७. त्यानंतर तो बाहेर पडला, तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.”
२८. तेव्हा तो सर्वकाही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्यामागे गेला.
२९. मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली; त्या वेळी त्यांच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक ह्यांचा मोठा समुदाय जेवायला बसला होता.
३०. तेव्हा परूशी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्यांविरुद्ध कुरकुर करत त्यांना म्हणाले, “जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर तुम्ही का खातापिता?”
३१. येशूने त्यांना उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते.
३२. मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही तर पापी लोकांना पश्‍चात्तापासाठी बोलवायला आलो आहे.”
३३. तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात; तसे परूश्यांचेही शिष्य करतात; आपले शिष्य तर खातात पितात.”
३४. येशूने त्यांना म्हटले, “वर्‍हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपास करायला लावता येईल काय?
३५. तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल; त्या दिवसांत ते उपास करतील.”
३६. आणखी त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला: “कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, तसे केले तर त्याने नवे फाडले व नव्याचे ठिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल;
३७. आणि नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत कोणी घालत नाही; घातला तर नवा द्राक्षारस बुधले फाडून गळून जाईल व बुधल्यांचा नाश होईल.
३८. म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालावा, [म्हणजे दोन्हीही टिकतात.]
३९. जुना द्राक्षारस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो.”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide