बायबल एकाच वर्षात

१. शलमोनाने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा बांधायचे संपवले व ह्याप्रमाणे त्याच्या मनाला जे करावेसे वाटले ते त्याने केले.
२. तेव्हा परमेश्वराने त्याला गिबोन येथे दर्शन दिले होते त्याप्रमाणे त्याला दुसर्‍यांदा दर्शन दिले.
३. परमेश्वर त्याला म्हणाला, “तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विनवणी मी ऐकली आहे; हे जे मंदिर तू बांधले आहेस त्याला माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी ते पवित्र केले आहे; माझी दृष्टी व माझे चित्त त्यावर सतत राहील.
४. तू आपला पिता दावीद ह्याच्याप्रमाणे खर्‍या मनाने व सरळतेने माझ्या समक्ष चालशील, माझ्या सर्व आज्ञांप्रमाणे वागशील आणि माझे नियम व निर्णय पाळशील,
५. तर इस्राएलांवरील तुझे राजासन मी कायमचे स्थापीन; तुझा पिता दावीद ह्याला मी वचन दिल्याप्रमाणे इस्राएलाच्या गादीवर बसायला तुझ्या कुळातला पुरुष खुंटायचा नाही.
६. पण तुम्ही व तुमच्या संततीने माझे अनुसरण करण्याचे सोडल्यास, मी तुम्हांला लावून दिलेल्या आज्ञा व नियम न पाळल्यास आणि मला सोडून अन्य देवांची उपासना व भजनपूजन केल्यास,
७. जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यातून त्यांचा उच्छेद करीन आणि हे जे मंदिर मी आपल्या नामाकरता पवित्र केले आहे ते माझ्या नजरेआड करीन, तसेच इस्राएल लोक इतर सर्व राष्ट्रांत दृष्टान्ताचा व निंदेचा विषय होतील.
८. आणि हे मंदिर उंच स्थानी राहील तरी त्याच्या जवळून येणारेजाणारे चकित होतील व छीथू करून म्हणतील, परमेश्वराने ह्या देशाचे व ह्या मंदिराचे असे का केले?
९. तेव्हा लोक म्हणतील, ‘त्यांचा देव परमेश्वर ह्याने त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून आणले असून ते त्याला सोडून अन्य देवांच्या नादी लागले व त्यांचे भजनपूजन व उपासना करू लागले, ह्यांमुळे परमेश्वराने ही सर्व विपत्ती त्यांच्यावर आणली आहे.”’
१०. परमेश्वराचे मंदिर व राजवाडा ही दोन्ही पूर्ण करण्यासाठी वीस वर्षे लागली.
११. त्यानंतर शलमोनाने सोराचा राजा हीराम ह्याला गालील प्रांतातली वीस नगरे दिली, कारण त्याने शलमोनाला हवे होते तितके गंधसरू, देवदारू व सोने हे पुरवले होते.
१२. शलमोनाने आपल्याला दिलेली नगरे पाहण्यास हीराम सोराहून तेथे गेला; ती त्याला पसंत पडली नाहीत.
१३. तेव्हा तो म्हणाला, “हे माझ्या बंधो, कसली ही नगरे तू मला दिलीस?” त्याने त्यांना काबूल प्रांत हे नाव ठेवले; हेच नाव आजवर चालू आहे.
१४. हीरामाने राजाकडे एकशेवीस किक्कार१ सोने पाठवले.
१५. शलमोन राजाने लोक वेठीस धरून परमेश्वराचे मंदिर, आपला राजवाडा, मिल्लो, यरुशलेमेचा तट, हासोर, मगिद्दो व गेजेर ही उभारली त्याचा वृत्तान्त असा.
१६. मिसर देशाचा राजा फारो ह्याने गेजेरवर चढाई करून ते घेतले आणि आग लावून जाळून टाकले व तेथल्या कनानी रहिवाशांचा संहार केला. त्याने ते नगर आपली कन्या शलमोनाची बायको हिला आंदण म्हणून दिले.
१७. शलमोनाने गेजेराखालचे बेथ-होरोन,
१८. बालाथ व रानातले तदमोर ही बांधली;
१९. ह्याखेरीज आणखी भांडारासाठी आणि रथ व स्वार ह्यांच्यासाठी नगरे बांधली आणि तसेच यरुशलेमेत, लबानोनावर व आपल्या सर्व राज्यात आपल्या मनास आले तेही सर्व त्याने बांधले.
२०. अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्या इस्राएल नसलेल्या लोकांतले अवशिष्ट लोक,
२१. देशात राहून गेले होते; त्यांना इस्राएल लोकांना अगदी नष्ट करता आले नाही; त्यांच्या वंशजांवर शलमोनाने बिगार बसवून त्यांना दास्य करायला लावले; आजवर असेच चालत आले आहे.
२२. पण इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने दास करून ठेवले नाही; ते योद्धे, कामदार, सरदार, सेनापती आणि रथ व स्वार ह्यांवरचे अधिपती होते.
२३. शलमोनाच्या कामावर देखरेख करणारे नायक हेच होते; ते पाचशे पन्नास होते; जे लोक ह्या कामावर होते त्यांच्यावर त्यांची हुकुमत असे.
२४. मग फारोची कन्या आपणासाठी शलमोनाने बांधलेल्या मंदिरात राहण्यास दावीदपूर सोडून आली; तेव्हा त्याने मिल्लो नगर बांधले.
२५. जी वेदी शलमोनाने परमेश्वराप्रीत्यर्थ बांधली होती तिच्यावर वर्षातून तीन वेळा शलमोन होमबली व शांत्यर्पणे अर्पण करत असे; तसेच परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवर तो धूप जाळत असे. ह्या प्रकारे त्याने मंदिर समाप्त केले.
२६. मग शलमोन राजाने अदोम देशांत तांबड्या समुद्राच्या तीरी एलोथाजवळील एसयोन-गेबेर येथे गलबतांचा तांडा केला.
२७. हीरामाने आपल्या ताब्यातील दर्यावर्दी लोक शलमोनाच्या कामदारांबरोबर काम करण्यासाठी त्या गलबतांवर पाठवले.
२८. त्यांनी ओफिरास जाऊन तेथून चारशे वीस किक्कार सोने शलमोन राजाकडे आणले.
१. परमेश्वराच्या नामासंबंधाने शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी कूट प्रश्‍नांनी त्याची परीक्षा पाहायला आली.
२. ती आपल्याबरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटांवर लादून यरुशलेमेस आली. शलमोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याच्यापुढे बोलली.
३. शलमोनाने तिच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली; त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती.
४. शलमोनाचे सगळे शहाणपण, त्याने बांधलेले मंदिर,
५. त्याच्या मेजवानीतील पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकर्‍यांची खिदमत व त्यांचे पोशाख, त्याचे प्यालेबरदार व परमेश्वराच्या मंदिरात चढून जायचा त्याचा तो जिना हे सगळे पाहून शबाची राणी गांगरून गेली.
६. ती राजाला म्हणाली, “आपली करणी व ज्ञान ह्यांविषयीची जी कीर्ती मी आपल्या देशात ऐकली ती खरी आहे.
७. तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय ह्या गोष्टींचा मला विश्वास येईना; आता पाहते तर माझ्या कानी आले ते अर्धेही नव्हते. आपले शहाणपण व समृद्धी ह्यांची कीर्ती झाली आहे तिच्याहून ती अधिक आहेत.
८. आपले लोक धन्य होत; हे आपले सेवक, ज्यांना आपणासमोर सतत उभे राहून आपल्या शहाणपणाचा लाभ होत असतो ते धन्य होत.
९. ज्याने आपणावर प्रसन्न होऊन आपणाला इस्राएलाच्या गादीवर स्थापले आहे तो आपला देव परमेश्वर धन्य होय; परमेश्वर इस्राएलांवर सर्वदा प्रेम करतो म्हणून न्यायाचे व नीतीचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.”
१०. तिने राजाला एकशेवीस किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली; शबाच्या राणीने शलमोन राजाला एवढी सुगंधी द्रव्ये नजर केली की तेवढी पुन्हा कधी कोठून आली नाहीत.
११. हीरामाची जहाजे ओफीर येथून सोने आणत त्याचप्रमाणे रक्तचंदनाचे लाकूड आणि बहुमोल रत्नेही विपुल आणत.
१२. राजाने रक्तचंदनाच्या लाकडाचे परमेश्वराच्या मंदिराला व राजवाड्याला कठडे केले; त्याचप्रमाणे गाणार्‍यांसाठी त्याच्या वीणा व सारंग्या बनवल्या; असले रक्तचंदनाचे लाकूड आजवर आले नाही की दृष्टीस पडले नाही.
१३. शलमोनाने राजाला अनुरूप अशा औदार्याने जे तिला दिले त्याशिवाय आणखी तिने जे जे मागितले ते ते सगळे तिला देऊन तिची इच्छा पुरवली. मग ती आपल्या परिवारासह स्वदेशी परत गेली.
१४. प्रतिवर्षी शलमोनाकडे सोने येई ते सहाशे सहासष्ट किक्कार भरे;
१५. ह्याखेरीज आणखी सौदागर, देवघेव करणारे व्यापारी, निरनिराळ्या लोकांचे राजे व देशांचे सुभेदार ह्यांच्याकडून सोने येई ते निराळेच.
१६. शलमोन राजाने सोन्याचे पत्रे ठोकून दोनशे मोठ्या ढाली बनवल्या, एकेका ढालीस सहाशे शेकेल सोने लागले.
१७. तसेच त्याने सोन्याचे पत्रे ठोकून तीनशे लहान ढाली केल्या; प्रत्येक लहान ढालीस तीन माने (शेर) सोने लागले; राजाने ह्या ढाली लबानोन येथील वनगृहात ठेवल्या.
१८. राजाने एक मोठे हस्तीदंती सिंहासन बनवले, व ते उत्तम सोन्याने मढवले.
१९. सिंहासनाला सहा पायर्‍या होत्या; आसनाचे ओठंगण वरून गोलाकार होते; सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना हात होते व ह्या दोन हातांच्या बाजूंना दोन सिंह केले होते.
२०. त्या सहा पायर्‍यांच्या दोन्ही बाजूंना एकेक असे एकंदर बारा सिंह केले होते; दुसर्‍या कोणत्याही राज्यात ह्यासारखे केलेले सिंहासन नव्हते.
२१. शलमोन राजाची सर्व पानपात्रे सोन्याची होती; लबानोन येथील वनगृहातील सर्व पात्रे शुद्ध सोन्याची होती; चांदीचे एकही नव्हते; शलमोनाच्या वेळी चांदीला कोणी विचारत नव्हते.
२२. समुद्रावर हीरामाच्या जहाजांबरोबर राजाच्याही तार्शीश जहाजांचा एक तांडा असे, आणि तीन-तीन वर्षांनी ही तार्शीश जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणत असत.
२३. शलमोन राजा धन व शहाणपण ह्या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजांहून श्रेष्ठ होता.
२४. देवाने शलमोनाच्या ठायी शहाणपण ठेवले होते ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरचे लोक त्याच्या दर्शनाला येत.
२५. येणारा प्रत्येक जण चांदीची व सोन्याची पात्रे, उंची वस्त्रे, शस्त्रे, सुगंधी द्रव्ये, घोडे व खेचरे ह्यांचा नजराणा वर्षानुवर्ष आणत असे.
२६. शलमोनाने रथ व राऊत ह्यांचा संग्रह केला; त्याच्याजवळ चौदाशे रथ व बारा हजार राऊत झाले; त्यांतले काही रथ ठेवायच्या नगरात व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेवले.
२७. राजाने यरुशलेमेत चांदी धोंड्यांप्रमाणे व गंधसरू तळवटीतल्या उंबराच्या झाडांप्रमाणे विपुल केले.
२८. शलमोनाचे घोडे मिसर देशातून येत; राजाचे व्यापारी घोड्यांच्या एकेका तांड्याची किंमत ठरवून तांडेच्या तांडे घेत;
२९. एकेका रथाला सहाशे शेकेल चांदी व एकेका घोड्याला दीडशे शेकेल चांदी देऊन ते मिसर देशाहून आणत; हित्ती व अरामी राजांसाठीही असेच ते व्यापारी आणत.
१. मुख्य गवयासाठी; शोशन्नीम (भूकमले) ह्या चालीवर गायचे दाविदाचे स्तोत्र. हे देवा, मला वाचव; कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन भिडले आहे.
२. मी खोल दलदलीत रुतलो आहे, तेथे उभे राहण्यास आधार नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, आणि लोंढा माझ्यावरून जात आहे.
३. आरोळी मारता मारता मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; आपल्या देवाची वाट पाहता पाहता माझे डोळे शिणले आहेत.
४. विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत; अन्यायाने माझ्याशी वैर करणारे, माझा जीव घेऊ पाहणारे, बलिष्ठ आहेत; मी हरण केले नव्हते तेही मला द्यावे लागले.
१८. बुद्धिहीन मनुष्य आपल्या शेजार्‍यासमक्ष, हातावर हात मारून जामीन होतो.
१९. जो कलहप्रिय तो अपराधप्रिय असतो; जो आपले दार उंच करतो तो नाशाला आमंत्रण देतो.
३०. येशू अद्याप गावात आला नव्हता, पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच होता.
३१. जे यहूदी मरीयेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करत होते त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर, ती कबरेकडे रडायला जात आहे असे समजून ते तिच्यामागे गेले.
३२. मग येशू होता तेथे मरीया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.”
३३. येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहूद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला,
३४. आणि म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, येऊन पाहा.”
३५. येशू रडला.
३६. ह्यावरून यहूदी म्हणाले, “पाहा, ह्याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते!”
३७. परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळण्याचीही शक्ती नव्हती काय?”
३८. येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती.
३९. येशूने म्हटले, “धोंड काढा.” त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, “प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल; कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत.”
४०. येशूने तिला म्हटले, “तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
४१. ह्यावरून [मृताला ठेवले होते तेथून] त्यांनी धोंड काढली; तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, “हे बापा, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो.
४२. मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरता मी बोललो; ह्यासाठी की, तू मला पाठवले आहेस असा त्यांनी विश्वास धरावा.”
४३. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, “लाजरा, बाहेर ये.”
४४. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूने त्यांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.”
४५. मरीयेकडे आलेल्या यहूद्यांनी येशूने जे केले ते पाहिले, आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला;
४६. पण कित्येकांनी परूश्यांकडे जाऊन येशूने काय केले ते त्यांना सांगितले.
४७. ह्यावरून मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, “आपण काय करत आहोत? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करतो.
४८. आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील.”
४९. तेव्हा त्यांच्यापैकी कयफा नावाचा कोणीएक मनुष्य जो त्या वर्षी प्रमुख याजक होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच कळत नाही;
५०. प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हांला हितावह आहे, हेही तुम्ही लक्षात आणत नाही.”
५१. हे तर तो आपल्या मनचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरता मरणार आहे.
५२. आणि केवळ त्या राष्ट्राकरता असे नाही, तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांनाही जमवून एकत्र करावे ह्याकरता.
५३. ह्यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा आपसांत निश्‍चय केला.
५४. ह्यामुळे येशू तेव्हापासून यहूदी लोकांमध्ये उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगरास गेला; आणि तेथे आपल्या शिष्यांसह राहिला.
५५. तेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता; आणि पुष्कळ लोक वल्हांडणाच्या अगोदर आपणांस शुद्ध करून घ्यायला बाहेरगावांहून वर यरुशलेमेस गेले.
५६. ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे राहून एकमेकांना म्हणत होते, “तुम्हांला काय वाटते? सणास तो मुळीच येणार नाही का?”
५७. मुख्य याजकांनी व परूश्यांनी तर त्याला धरण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की, “तो कोठे आहे हे कोणाला कळल्यास त्याने खबर द्यावी.”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide