बायबल एकाच वर्षात

१. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, “तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल; कारण मी पाहिले आहे की ह्या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस.
२. सर्व शुद्ध पशूंपैकी सातसात नरमाद्या आणि अशुद्ध पशूंपैकी दोन-दोन नरमाद्या,
३. आणि आकाशातील पक्ष्यांपैकी सातसात नरमाद्या बरोबर घे; अशाने भूतलावर त्यांचे बीज राहील.
४. अजून सात दिवसांचा अवकाश आहे; मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पाऊस पाडणार, आणि मी केलेले सर्वकाही भूतलावरून नाहीसे करणार.”
५. तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले.
६. पृथ्वीवर जलप्रलय झाला त्या वेळी नोहा सहाशे वर्षांचा होता.
७. हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे, बायको व सुना ह्यांना घेऊन तारवात गेला.
८. शुद्ध-अशुद्ध पशुपक्षी व भूमीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांतून
९. नर व मादी अशी जोडीजोडीने, देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे तारवात त्याच्याकडे गेली.
१०. सात दिवसांनंतर प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले.
११. नोहाच्या वयाच्या सहाशेव्या वर्षी दुसर्‍या महिन्याच्या सतराव्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली.
१२. चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पावसाने झोड उठवली.
१३. ह्याच दिवशी नोहा, आणि त्याचे पुत्र शेम, हाम व याफेथ, आणि त्यांच्याबरोबर नोहाची बायको व त्याच्या तिघी सुना हे तारवात गेले.
१४. हे आणि प्रत्येक जातीचे वनपशू, प्रत्येक जातीचे ग्रामपशू, प्रत्येक जातीचे रांगणारे आणि प्रत्येक जातीचे उडणारे प्राणी आणि सर्व जातींचे पक्षी तारवात गेले.
१५. सर्व देहधारी प्राण्यांपैकी एकेक जोडी नोहाकडे तारवात गेली.
१६. देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एकेक नरमादी आत गेली; मग परमेश्वराने त्याला आत बंद केले.
१७. पृथ्वीवर जलप्रलय चाळीस दिवस चालला, आणि पाणी वाढल्यामुळे तारू जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिले.
१८. प्रलय होऊन पृथ्वीवर पाणी फार वाढले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत चालले.
१९. पृथ्वीवर पाण्याचा अतिशय जोर झाला व त्याने सगळ्या आकाशाखालचे सर्व उंच पर्वत बुडवले.
२०. पाणी त्यांच्यावर पंधरा हात चढले, ह्याप्रमाणे सर्व पर्वत झाकून गेले.
२१. तेव्हा पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी म्हणजे पक्षी, ग्रामपशू, वनपशू, पृथ्वीवर गजबजून राहिलेले सर्व जीवजंतू व सर्व मानव मरण पावले;
२२. ज्याच्या म्हणून नाकपुड्यात जीवनाचा श्वास होता ते कोरड्या जमिनीवरील झाडून सारे मेले.
२३. पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्वकाही म्हणजे मानव, पशू, रांगणारे प्राणी व आकाशातील पक्षी ह्या सर्वांचा नाश देवाने केला; ते पृथ्वीवरून नाहीसे झाले; नोहा व त्याच्याबरोबर तारवात होते तेवढे मात्र वाचले.
२४. दीडशे दिवसपर्यंत पाणी पृथ्वी व्यापून होते.
१. मग देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशू आणि ग्रामपशू ह्या सर्वांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला तेव्हा पाणी ओसरू लागले;
२. जलाशयाचे झरे व आकाशाची दारे बंद झाली, आणि आकाशातून पावसाची झोड थांबली,
३. पृथ्वीवरचे पाणी एकसारखे हटत गेले; दीडशे दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले.
४. सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी अरारात पर्वतावर तारू टेकले.
५. दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे ओसरत होते; दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताचे माथे दिसू लागले.
६. ह्याला चाळीस दिवस लोटल्यावर नोहाने तारवास जी खिडकी केली होती ती उघडली,
७. आणि एक कावळा बाहेर सोडला; तो पृथ्वीवरील पाणी सुकेपर्यंत इकडेतिकडे फिरत राहिला.
८. पाणी भूपृष्ठावरून आटले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने एक कबुतर बाहेर सोडले.
९. त्या कबुतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे ते त्याच्याकडे तारवात परत आले; कारण सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर अद्यापि पाणी होते; तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले.
१०. त्याने आणखी सात दिवस वाट पाहून तारवातून त्या कबुतराला पुन: बाहेर सोडले.
११. सायंकाळी ते कबुतर त्याच्याकडे आले, आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले; नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे.
१२. त्याने आणखी सात दिवस थांबून त्या कबुतराला सोडले, ते त्याच्याकडे परत आले नाही.
१३. सहाशे एकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वीवरचे पाणी सुकून गेले तेव्हा नोहाने तारवाचे छप्पर काढून पाहिले, तेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग वाळला आहे असे त्याला दिसले.
१४. दुसर्‍या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी जमीन खडखडीत वाळली.
१५. मग देव नोहाला म्हणाला,
१६. “तू आपली बायको, पुत्र व सुना ह्यांना घेऊन तारवातून बाहेर नीघ.
१७. पक्षी, पशू व भूमीवर रांगणारे सर्व ह्यांपैकी जे प्राणी तुझ्याबरोबर आहेत त्या सर्वांना बाहेर आण, म्हणजे पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल, ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील.”
१८. तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना ह्यांना घेऊन बाहेर निघाला.
१९. प्रत्येक पशू, प्रत्येक रांगणारा प्राणी, प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जातवारीने तारवातून बाहेर निघाले.
२०. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली; आणि त्याने सर्व शुद्ध पशू व सर्व शुद्ध पक्षी ह्यांतले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले.
२१. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, “मानवामुळे मी इत:पर भूमीला कधीही शाप देणार नाही; कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात; तर मी आताच्याप्रमाणे पुन्हा अखिल जिवांचा कधीही संहार करणार नाही.
२२. पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हायची राहणार नाहीत.”
१. दावीद आपला पुत्र अबशालोम ह्याच्यापुढून पळाला त्या प्रसंगीचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत! माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत
२. ह्याला देवाच्या ठायी तारण नाही, असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत. (सेला)३
३. तरी हे परमेश्वरा, तू माझ्याभोवती कवच आहेस; तू माझा गौरव, माझे डोके वर करणारा आहेस.
४. मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो, आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो. (सेला)
२०. ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, चवाठ्यांवर आपली वाणी उच्चारते;
२१. गजबजलेल्या रस्त्यांच्या नाक्यांवर, वेशींच्या दारात, घोषणा करते, नगरात आपले हे शब्द उच्चारते:
२२. “अहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हांला कोठवर आवडणार? निंदा करणारे निंदेत कोठवर आनंद पावणार, आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोठवर करणार?
१. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले.
२. मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली.
३. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.”
४. परंतु त्याने उत्तर दिले की, “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.”
५. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले;
६. आणि त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील,’ आणि ‘तुझा पाय धोंड्यांवर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.”’
७. येशूने त्याला म्हटले, “आणखी असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस.”’
८. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखवले,
९. आणि त्याला म्हटले, “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्वकाही तुला देईन.”
१०. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.”’
११. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पाहा, देवदूतांनी येऊन त्याची सेवा केली.
१२. नंतर योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालीलात निघून गेला;
१३. आणि नासरेथ सोडून जबुलून व नफताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनार्‍यावरील कफर्णहूमास जाऊन राहिला;
१४. हे अशासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की,
१५. “जबुलून प्रांत व नफताली प्रांत, समुद्रकिनार्‍यावरचा, यार्देनेच्या पलीकडचा, परराष्ट्रीयांचा गालील -
१६. अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.”
१७. तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की, “पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
१८. नंतर गालील समुद्राजवळून येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात पाग टाकताना पाहिले; कारण ते मासे धरणारे होते.
१९. त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.”
२०. लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले.
२१. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपला बाप जब्दी ह्याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले, आणि त्याने त्यांना बोलावले.
२२. मग लगेच ते तारू व आपला बाप ह्यांना मागे सोडून त्याला अनुसरले.
२३. नंतर येशू यहूदी लोकांच्या सभास्थानांत सुवार्तेची घोषणा करत व राज्याची सुवार्ता गाजवत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करत गालीलभर फिरला.
२४. आणि त्याची कीर्ती सूरिया देशभर पसरली; तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा ह्यांनी पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले, आणि त्याने त्यांना बरे केले.
२५. मग गालील, दकापलीस, यरुशलेम, यहूदीया व यार्देनेच्या पलीकडचा प्रदेश ह्यांतून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागे चालले.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide