१. पाहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही; ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.
२. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव ह्यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत; तुमच्या पातकांमुळे तो तुम्हांला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही.
३. कारण तुमचे हात रक्ताने, तुमची बोटे अधर्माने विटाळली आहेत; तुमची वाणी असत्य आहे, तुमची जिव्हा दुष्टतेचे शब्द पुटपुटते.
४. न्यायाला अनुसरून दावा करणारा कोणी नाही, आणि सत्यास स्मरून खटला चालवणारा कोणी नाही; लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवतात, कपटाने बोलतात; ते उपद्रवरूप गर्भ धारण करतात आणि अनर्थाला जन्म देतात.
५. ते नागाची अंडी उबवतात, कातिणीचे जाळे विणतात; त्यांची अंडी खाणारा मरणारच; त्यांतले एखादे चिरडले तर त्यातून फुरसे निघते.
६. त्यांची जाळी पांघरण्याच्या उपयोगी नाहीत, ह्या आपल्या विणकामाने त्यांना स्वत:स झाकता येत नाही; त्यांची कामे केवळ उपद्रवजनक होत; त्यांच्या हातून बलात्काराची कामे होतात.
७. त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात; निर्दोष रक्तपात करण्यास त्वरा करतात; त्यांच्या कल्पना अधर्माच्या असतात; त्यांच्या मार्गात नाश व विध्वंस असतात.
८. शांतीचा मार्ग त्यांना ठाऊक नाही; त्यांच्या मार्गात न्याय नाही; ते आपणांसाठी वाकडे मार्ग करतात; त्या मार्गांनी चालणार्या कोणालाही शांती ठाऊक नाही.
९. म्हणून न्याय आमच्यापासून दूर राहतो, दोषमुक्तता आम्हांला प्राप्त होत नाही; आम्ही प्रकाशाची अपेक्षा करतो तर अंधकार; उजेडाची आशा करतो पण आम्ही काळोखात चालू लागतो.
१०. आम्ही आंधळ्यांसारखे भिंत चाचपतो, नेत्रहीनांप्रमाणे चाचपतो; संधिप्रकाशात अडखळावे तसे मध्यान्हसमयी अडखळतो, धष्टपुष्टांमध्ये आम्ही मृतवत आहोत.
११. आम्ही सगळे अस्वलांसारखे गुरगुरतो, पारव्यांसारखे घुमत राहतो; आम्ही न्यायाची अपेक्षा करतो तर त्याचा पत्ता नाही; तारणाची आशा धरतो तर ते आमच्यापासून दूर राहते;
१२. कारण आमचे अपराध तुझ्यासमोर बहुत आहेत; आमची पातके आमच्याविरुद्ध साक्ष देतात; आमचे अपराध आम्ही जाणून आहोत, आमची दुष्कृत्ये आम्हांला ठाऊक आहेत.
१३. नीतिनियमांचे उल्लंघन, परमेश्वराचा अव्हेर, आमच्या देवास अनुसरण्यास माघार घेणे, छलसूचक व असत्य भाषण करणे, लबाडी मनात योजून ती बोलून दाखवणे, ही ती आहेत.
१४. न्यायाला मागे ढकलले आहे. नीतिमत्ता लांब उभी राहिली आहे; कारण चव्हाठ्यांवर सत्य अडखळून पडले आहे, तेथे सरळतेचा प्रवेश होत नाही.
१५. सत्याचा अगदी अभाव झाला आहे; दुष्कर्मापासून दूर राहणारा बळी पडतो. परमेश्वराने हे पाहिले व न्याय नाही म्हणून त्याची इतराजी झाली.
१६. कोणीच कर्ता पुरुष नाही हे त्याला दिसून आले, कोणी मध्यस्थ नाही म्हणून तो विस्मित झाला; तेव्हा त्याच्याच बाहूने त्याला साहाय्य केले, त्याच्या न्याय्यत्वाने त्याला आधार दिला.
१७. त्याने उरस्त्राणाप्रमाणे न्यायत्व धारण केले व आपल्या मस्तकी तारणरूप शिरस्त्राण घातले; सूडरूपी पेहराव तो ल्याला. आवेशरूप झग्याने आपले अंग त्याने झाकले.
१८. ज्याच्या-त्याच्या कर्माप्रमाणे तो प्रतिफळ देईल, म्हणजे आपल्या शत्रूंना संताप आणील, आपल्या वैर्यांना शासन करील, द्वीपांचे उसने फेडील.
१९. ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील; कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्याविरुद्ध झेंडा उभारील.
२०. “तो सीयोनेकडे आणि याकोबापैकी जे अधर्मापासून परावृत्त झाले त्यांच्याकडे उद्धारकर्ता म्हणून येईल,” असे परमेश्वर म्हणतो.
२१. परमेश्वर म्हणतो, “माझा तर त्यांच्याशी हाच करार: तुझ्यावर असलेला माझा आत्मा, तुझ्या मुखात घातलेली माझी वचने तुझ्या मुखातून, तुझ्या संतानांच्या मुखांतून व तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखांतून आतापासून पुढे सर्वकाळ निघून जाणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.”
१. ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे.
२. पाहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे; पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे.
३. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील.
४. तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा; ते सर्व एकत्र होत आहेत, तुझ्याकडे येत आहेत; तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत.
५. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल.
६. उंटांच्या झुंडी, मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील, परमेश्वराचा आनंदाने गुणानुवाद करतील.
७. केदारचे सर्व कळप तुझ्याजवळ एकत्र होत आहेत; नबायोथचे एडके तुझ्या कामी येतील; ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील, आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन.
८. जे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंड्यांकडे उडून जातात तसे जे उडत आहेत ते कोण?
९. खरेच, द्वीपे माझी वाट पाहत आहेत; तुझा देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी, इस्राएलाच्या पवित्र प्रभूसाठी तार्शीशची गलबते तुझ्या पुत्रांना त्यांच्या सोन्यारुप्यांसहित दुरून घेऊन प्रथम येत आहेत, कारण परमेश्वराने तुला वैभवयुक्त केले आहे.
१०. परदेशचे लोक तुझे कोट बांधत आहेत, त्यांचे राजे तुझी सेवा करत आहेत; कारण मी क्रोधाविष्ट होऊन तुला ताडन केले तरी आता मी प्रसन्न होऊन तुझ्यावर दया केली आहे.
११. राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे आणावी, त्यांचे राजे तुझ्याकडे मिरवत आणावेत म्हणून तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील, त्या अहोरात्र बंद म्हणून राहणार नाहीत.
१२. कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करणार नाही ते विलयास जाईल; अशी राष्ट्रे खातरीने उद्ध्वस्त होतील.
१३. माझे पवित्रस्थान शोभिवंत व्हावे म्हणून लबानोनाचे वैभव तुझ्याकडे येईल; अर्थात सुरू, देवदारू, भद्रदारू हे सर्व मिळून तुझ्याकडे येतील; माझे पादासन मी शोभायमान करीन.
१४. तुला पीडा करणार्यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील.
१५. तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात-येत नसत; तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन.
१६. तू राष्ट्रांचे दूध शोषून घेशील, राजांचे स्तन तू चोखशील, आणि मी परमेश्वर तुला तारणकर्ता, उद्धारकर्ता याकोबाचा समर्थ प्रभू आहे हे तू जाणशील.
१७. मी तांब्याच्या जागी सोने, लोखंडाच्या जागी रुपे आणीन; लाकडांच्या जागी तांबे व दगडांच्या जागी लोखंड आणीन; तुझ्यावर शांती सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहील, असे मी करीन.
१८. ह्यापुढे तुझ्या देशात कसलाही जुलूम अगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश ह्यांचे नावही ऐकू येणार नाही; तारण माझा कोट व कीर्ती माझी वेस आहे असे तू म्हणशील.
१९. ह्यापुढे दिवसा प्रकाश देण्यास तुला सूर्याची, रात्री प्रकाश देण्यास तुला चंद्राची गरज लागणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल, तुझा देव तुझे तेज होईल.
२०. तुझ्या सूर्याचा ह्यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल; तुझे शोकाचे दिवस संपले आहेत,
२१. तुझे सर्व लोक नीतिमान होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील; माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लावलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील,
२२. जो सर्वांत लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.”
१. हे परमेश्वरा, आमचे नको, आमचे नको, तर आपल्या नावाचा गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस.
२. “ह्यांचा देव कोठे आहे;” असे राष्ट्रांनी का म्हणावे?
३. आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो.
४. त्यांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत; त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत.
५. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही;
६. त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; त्यांना नाक आहे पण वास येत नाही;
७. त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही; पाय आहेत पण चालता येत नाही; त्यांच्या कंठांतून शब्द निघत नाही.
८. त्या बनवणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.
२३. वाणी कळवळ्याची पण मन दुष्ट असणे हे, रुप्याचा मुलामा दिलेल्या मडक्यासारखे होय.
१७. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या.
१८. द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा;
१९. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंत:करणात प्रभूला गायनवादन करा;
२०. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करत जा.