बायबल एकाच वर्षात

१. मी त्याच्या क्रोधरूप दंडाचे दु:ख भोगलेला मनुष्य आहे.
२. त्याने मला घेऊन जाऊन, उजेडात नव्हे, तर अंधारात चालायला लावले.
३. खरोखर तो दिवसभर माझ्याविरुद्ध आपला हात राहून राहून चालवतो.
४. त्याने माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहे; त्याने माझी हाडे मोडली आहेत.
५. त्याने विष व दु:ख ह्यांचा कोट माझ्याभोवती रचला आहे.
६. जे मागेच मरून गेले त्यांच्याप्रमाणे मला तो अंधकारमय स्थळी बसवतो.
७. त्याने माझ्याभोवती कुंपण केले म्हणून माझ्याने बाहेर पडवत नाही; त्याने माझी बेडी भारी केली.
८. मी धावा करतो व गार्‍हाणे करतो, तेव्हा तो माझ्या विनवणीस प्रतिबंध करतो.
९. त्याने माझ्या मार्गाभोवती चिर्‍यांची भिंत बांधली आहे; त्याने माझ्या वाटा वाकड्या केल्या आहेत.
१०. टपणार्‍या अस्वलासारखा, गुप्त जागी असलेल्या सिंहासारखा, तो मला झाला आहे.
११. त्याने मला वाटेवरून लोटून देऊन माझे फाडून तुकडे केले आहेत; त्याने मला उदास केले आहे.
१२. त्याने आपले धनुष्य वाकवले आहे, त्याने मला बाणाचे निशाण केले आहे.
१३. त्याने आपले बाण माझ्या अंतर्यामात शिरवले आहेत.
१४. मी आपल्या सर्व लोकांत दिवसभर उपहासाचा व निंदाव्यंजक पोवाड्यांचा विषय झालो आहे.
१५. त्याने मला क्लेशाने व्यापले आहे, तो मला कडू दवणा पाजतो.
१६. त्याने मला आपल्या दातांनी खडे फोडायला लावले आहे; त्याने मला राखेने माखून काढले आहे.
१७. तू माझ्या जिवाला शांतीपासून दूर ठेवले आहेस; समृद्धीला मी पारखा झालो आहे.
१८. तेव्हा मी म्हणालो, “माझी जीवनशक्‍ती, परमेश्वराची मला वाटत असलेली आशा, गेली आहे.”
१९. माझी विपत्ती व माझे भ्रमण, कडू दवणा व विष ह्यांचे स्मरण कर.
२०. माझा जीव त्यांचे स्मरण करीत राहतो म्हणून तो माझ्या ठायी गळला आहे.
२१. हे मी मनात आणतो म्हणून मला आशा आहे.
२२. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही.
२३. ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे.
२४. “परमेश्वर माझा वतनभाग आहे”, असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन.
२५. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना, जो जीव त्याला शरण जातो त्याला, परमेश्वर प्रसन्न होतो.
२६. परमेश्वरापासून येणार्‍या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे.
२७. मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे.
२८. त्याने एकान्ती बसावे व स्वस्थ असावे, कारण त्याने त्याच्यावर हे ओझे ठेवले आहे.
२९. त्याने आपले तोंड मातीत खुपसावे, कदाचित अद्यापि आशा असेल.
३०. मारत्या इसमाकडे त्याने आपला गाल करावा; त्याने उपहास सोसावा.
३१. कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही;
३२. तो जरी दु:ख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करतो.
३३. तो कोणास मुद्दाम पीडा करीत नाही, मानवपुत्रांना दु:ख देत नाही.
३४. पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना पायांखाली तुडवणे,
३५. परात्पराच्या समक्ष मनुष्याचे हक्क बुडवणे,
३६. कोणाचा दावा बिघडवणे, असली कृत्ये प्रभू पाहत नाही काय?
३७. प्रभूने आज्ञा केली नसल्यास कोण बोलला आणि त्याप्रमाणे घडून आले?
३८. अनिष्ट व इष्ट ही परात्पराच्या मुखातून येत नाहीत काय?
३९. आपल्या पातकांबद्दल शिक्षा होते म्हणून जिवंत मनुष्याने का कुरकुर करावी?
४०. चला, आपण आपले मार्ग शोधू व तपासू, आणि परमेश्वराकडे परत जाऊ.
४१. आपण आपले हात वर स्वर्गांतील देवाकडे करून आपली अंत:करणे त्याच्याकडे उन्नत करू.
४२. “आम्ही अपराध केला व फितुरी केली; त्याची तू क्षमा केली नाहीस.
४३. तू क्रोधव्याप्त होऊन आमचा छळ केलास तू वधलेस, दया केली नाहीस.
४४. तू आपणा स्वत:स अभ्राने आच्छादलेस, प्रार्थनेचा त्यामधून प्रवेश होत नाही.
४५. तू आम्हांला राष्ट्रांमध्ये हेंदर व केरकचरा केले आहेस.
४६. आमच्या सर्व शत्रूंनी आमच्यावर आपले तोंड वासले आहे.
४७. भय व गर्ता, विध्वंस व नाश ही आम्हांला प्राप्त झाली आहेत.
४८. माझ्या लोकांच्या कन्येचा विनाश झाल्यामुळे माझे डोळे अश्रुप्रवाह ढाळत आहेत.
४९. माझे डोळे वाहत आहेत, थांबत नाहीत, कधी खळत नाहीत;
५०. परमेश्वर आकाशातून अवलोकन करीपर्यंत ते खळायचे नाहीत.
५१. माझ्या नगरात सर्व कन्यांमुळे माझे डोळे माझ्या जिवास दुःख देत आहेत.
५२. निष्कारण बनलेल्या माझ्या वैर्‍यांनी पक्ष्याचा करावा तसा माझा पाठलाग केला आहे.
५३. गर्तेत ढकलून त्यांनी माझ्या जिवाचा अंत केला आहे, माझ्यावर दगड लोटला आहे.
५४. माझ्या डोक्यावरून पाण्याचे लोट गेले; मी म्हणालो, ‘माझा अंत होत आहे.’
५५. हे परमेश्वरा, अतिशय खोल गर्तेतून मी तुझ्या नामाचा धावा केला.
५६. तू माझी वाणी ऐकलीस; माझ्या उसाशाला; माझ्या आरोळीला, आपला कान बंद करू नकोस.
५७. मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास; तू म्हणालास भिऊ नकोस.
५८. हे प्रभू, तू माझ्या जिवाच्या पक्षाने लढलास; तू माझ्या जिवास उद्धरलेस.
५९. हे परमेश्वरा, माझा अन्याय झाला तो तू पाहिला आहेस; तू माझा न्याय कर.
६०. त्यांनी उगवलेला सर्व सूड, त्यांच्या माझ्याविषयीच्या सर्व योजना, तू पाहिल्या आहेत.
६१. हे परमेश्वरा, माझ्याविरुद्ध त्यांनी केलेली निंदा व त्यांच्या सर्व योजना तू ऐकल्या आहेत.
६२. माझ्यावर उठणार्‍यांच्या तोंडचे शब्द व दिवसभर चाललेला त्यांचा माझ्याविषयीचा कट तू ऐकला आहेस.
६३. तू त्यांचे उठणेबसणे पाहा; मी त्यांचे उपहासगीत झालो आहे.
६४. हे परमेश्वरा, त्यांच्या हातच्या कर्माप्रमाणे तू त्यांना प्रतिफळ देशील.
६५. हृदयाची कठोरता हा आपला शाप तू त्यांना देशील.
६६. तू क्रोधाने त्यांचा पाठलाग करशील, व परमेश्वराच्या आकाशाखालून तू त्यांचा विध्वंस करशील.”
१. सोने कसे निस्तेज झाले आहे! अति शुद्ध सोने कसे बदलले आहे! पवित्रस्थानाचे पाषाण हरएक रस्त्याच्या चवाठ्यावर विखरले आहेत.
२. शुद्ध सुवर्णतुल्य सीयोनेचे प्रिय पुत्र मातीच्या पात्रांच्या, कुंभारांच्या हातच्या कामाच्या योग्यतेचे मानण्यात येतात!
३. कोल्हीदेखील आपले स्तन आपल्या पिलांना पाजते; पण माझ्या लोकांची कन्या रानातील शहामृगाप्रमाणे क्रूर झाली आहे!
४. तान्ह्या मुलाची जीभ तृषेमुळे त्याच्या टाळूस चिकटते; लहान मुले भाकर मागतात, पण त्यांना ती मोडून देण्यास कोणी नाही.
५. जे पूर्वी पक्‍वान्ने खात ते रस्त्यात दुर्बल होऊन पडले आहेत; किरमिजी पोशाखात जे वाढले ते उकिरड्यांना आलिंगन देत आहेत.
६. सदोमेवर कोणी हात टाकला नसून एका क्षणात तिचा नि:पात झाला; तिच्या पापापेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म अधिक झाले आहे.
७. तिचे सरदार१ बर्फाहून स्वच्छ होते, दूधाहून पांढरे होते; ते पोवळ्याहून कांतीने लाल होते; त्यांचे तेज नीलमण्यासारखे होते;
८. त्यांचा चेहरा काळोखाहून काळा झाला आहे; त्यांना आळ्यांतून कोणी ओळखत नाही; त्यांची त्वचा त्यांच्या हाडांना चिकटली आहे; ती शुष्क झाली आहे, काष्ठासारखी झाली आहे.
९. क्षुधेने मारलेल्यांपेक्षा तलवारीने मारलेले पुरवले; कारण शेताचा उपज नसल्यामुळे ते व्याकूळ होऊन क्षय पावतात.
१०. कोमलहृदयी स्त्रियांच्या हातांनी आपली अर्भके शिजवली; ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशसमयी त्यांचे खाद्य झाली.
११. परमेश्वराने आपला क्रोध पूर्ण प्रकट केला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे त्याने सीयोनेत अग्नी पेटवला आहे, त्या अग्नीने तिचे पाये भस्म केले आहेत.
१२. विरोधी व शत्रू यरुशलेमेच्या वेशीत शिरतील, ह्या गोष्टीवर पृथ्वीवरचे राजे, जगातले सर्व रहिवासी ह्यांनी विश्वास ठेवला नाही.
१३. तिच्या संदेष्ट्यांच्या पातकांमुळे व तिच्या याजकांच्या दुष्कर्मांमुळे हे झाले; त्यांनी तिच्या वस्तीत नीतिमानांचा रक्तपात केला आहे.
१४. ते अंधाप्रमाणे रस्त्यांनी भटकतात; ते रक्ताने माखले आहेत, म्हणून लोकांना त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करवत नाही.
१५. “दूर व्हा! अमंगळ लोकहो, दूर व्हा! दूर व्हा! शिवू नका!” असे त्यांनी त्यांना ओरडून म्हटले; ते पळून जाऊन भटकत राहिले तेव्हा राष्ट्रांतले लोक म्हणाले, “त्यांना आतापासून येथे वस्ती करायची नाही.”
१६. परमेश्वराच्या मुखाने त्यांना विखरले आहे; तो आता त्यांच्याकडे पाहत नाही; ते याजकाचा मान राखत नाहीत, वडिलांचा सन्मान करीत नाहीत.
१७. आमचे डोळे निरर्थक साहाय्याची वाट पाहून शिणले आहेत; आम्ही वाट पाहत असता, साहाय्य करायला असमर्थ अशा राष्ट्राची वाट पाहिली.
१८. ते आमच्या पावलांच्या मागोमाग असतात म्हणून आम्हांला आमच्या आळ्यांत फिरवत नाही; आमचा अंत जवळ आला आहे, आमचे दिवस भरले आहेत; आमचा अंत आलाच आहे.
१९. आमचा छळ करणारे आकाशातील गरुडांपेक्षा चपल होते; त्यांनी डोंगरावर आमची पाठ पुरवली, रानात आमच्यासाठी दबा धरला.
२०. परमेश्वराचे अभिषिक्त जे आम्ही त्या आमच्या नाकपुड्यांचा श्वास, त्यांच्या गर्तेत अडकला; त्यांच्यासंबंधाने आम्हांला वाटले होते की त्याच्या छायेखाली आम्ही राष्ट्रांमध्ये जीवित कंठू.
२१. ऊस देशात राहणार्‍या अदोमाच्या कन्ये, आनंद व हर्ष करून घे; पेला तुझ्याकडेही येईल; तू मस्त होऊन आपणास नग्न करशील.
२२. हे सीयोनकन्ये, तुझ्या दुष्टाईचे शासन आटोपले आहे; तो तुला आणखी पकडून नेणार नाही; हे अदोमकन्ये, तो तुझ्या दुष्टाईचा समाचार घेईल. तो तुझी पातके उघडकीस आणील.
१. हे परमेश्वरा, आमच्यावर काय गुजरले ह्याचे स्मरण कर; आमच्या अप्रतिष्ठेकडे पाहा.
२. आमचे वतन परक्यांकडे गेले आहे; आमची घरे परदेशीयांच्या हाती गेली आहेत.
३. आम्ही पोरके, पितृहीन आहोत; आमच्या माता जशा काय विधवा आहेत.
४. आमचेच पाणी आम्ही पैका देऊन पितो; आमचेच लाकूड आम्हांला मोल देऊन मिळते.
५. आमचा छळ करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत; आम्ही शिणलो आहोत, आम्हांला विश्रांती नाही.
६. आमच्या पोटाला भाकर मिळण्यासाठी, आम्ही मिसरी लोकांकडे, अश्शूरी लोकांकडे हात पसरतो.
७. आमच्या पूर्वजांनी पाप केले, ते नाहीसे झाले आहेत. आम्ही त्यांच्या दुष्कर्माचे फळ भोगतो,
८. दास आमच्यावर सत्ता करतात; त्यांच्या हातातून आम्हांला सोडवणारा कोणी नाही.
९. रानात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत धरून आपले अन्न मिळवतो.
१०. क्षुधेच्या तापामुळे आमची त्वचा भट्टीसारखी तप्त आहे.
११. त्यांनी सीयोनेतील स्त्रिया, यहूदाच्या नगरातील कुमारी, भ्रष्ट केल्या आहेत.
१२. त्यांच्या हातांनी सरदार लटकवण्यात आले आहेत; प्रत्यक्ष वडील माणसांचा मान ठेवण्यात आला नाही.
१३. तरुण जन जाती वाहून नेतात, पोरे लाकडाच्या ओझ्याखाली दबतात,
१४. वेशीत वडील जन दिसत नाहीत, तरुण आपल्या गायनवादनास अंतरले आहेत.
१५. आमच्या मनाचा हर्ष नाहीसा झाला आहे; आमचे नृत्य जाऊन शोक आला आहे.
१६. आमच्या मस्तकीचा मुकुट पडला आहे; आम्ही पातक केले म्हणून हायहाय करीत आहोत.
१७. ह्यामुळे आमचे हृदय खचले आहे; ह्या गोष्टीमुळे आमचे डोळे मंद झाले आहेत;
१८. सीयोन पर्वत उजाड झाल्यामुळे त्यांतून कोल्हे फिरत असतात.
१९. हे परमेश्वरा, तू सर्वकाळ सिंहासनारूढ असतोस, तुझे सिंहासन पिढ्यानपिढ्या आहे.
२०. तू आम्हांला सर्वकाळ का विसरतोस? तू आम्हांला दीर्घकाळ का सोडून देतोस?
२१. हे परमेश्वरा, तू आम्हांला आपणांकडे परत घे म्हणजे आम्ही वळू; पूर्वीचे दिवस आम्हांला पुन्हा आण.
२२. तू आम्हांला सर्वस्वी टाकून दिले आहेस. तू आमच्यावर फार क्रोधायमान झाला आहेस.
१४५. मी अगदी मनापासून तुझा धावा करतो; हे परमेश्वरा, माझे ऐक; मी तुझे नियम पाळीन.
१४६. मी तुझा धावा करतो; तू मला तार, म्हणजे मी तुझे निर्बंध पाळीन.
१४७. उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारतो; मी तुझ्या वचनांची आशा धरतो.
१४८. तुझ्या वचनाचे चिंतन करायला रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात.
१४९. तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे.
१५०. दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत; ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत.
१५१. हे परमेश्वरा, तू जवळ आहेस; तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत.
१५२. तुझ्या निर्बंधांवरून मला पूर्वीपासून ठाऊक आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापले आहेत.
११. धनवान आपल्या मते शहाणा असतो, पण समंजस गरीब त्याचा भेद बाहेर काढतो.
१. आमचा प्रिय सहकारी फिलेमोन ह्याला: तुला, आमची बहीण अफ्फिया हिला, आमचा सहसैनिक अर्खिप्प ह्याला, व तुझ्या घरात जमणार्‍या मंडळीला;
२. ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून:
३. आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.
४. प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनांवर असलेली तुझी प्रीती व तुझा भरवसा ह्यांच्याविषयी ऐकून मी आपल्या प्रार्थनांत सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या देवाची उपकारस्तुती करतो;
५.
६. आणि असे मागतो की, तुमच्यामध्ये [असलेल्या ख्रिस्त येशूमध्ये] जे काही चांगले आहे त्याचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण सफळ व्हावे.
७. तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व माझे सांत्वन झाले; कारण, हे बंधो, तुझ्याकडून पवित्र जनांच्या जिवाला विश्रांती मिळाली आहे.
८. ह्याकरता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्तद्वारा पूर्ण धैर्य आहे,
९. तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल, आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान,
१०. मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो;
११. (तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे.)
१२. त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले आहे; [त्याचा स्वीकार कर.]
१३. सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते;
१४. तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही; ह्यासाठी की, तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा.
१५. कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की, त्याने युगानुयुग१ तुझे व्हावे;
१६. त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधू, असे व्हावे; मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या व प्रभूच्या ठायी ह्याहून कितीतरी अधिक तो प्रिय असावा.
१७. म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर.
१८. त्याने तुझे काही नुकसान केले असले किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड.
१९. हा माझा पौलाचा स्वदस्तुरचा लेख आहे; ते मी फेडीन; शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही.
२०. हे बंधो, प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर; माझ्या जिवाला ख्रिस्ताच्या ठायी विश्रांती दे.
२१. तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे, आणि मला ठाऊक आहे की, मी जे म्हणतो, त्यापेक्षा तू अधिकही करशील.
२२. त्यातल्या त्यात माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव, कारण तुमच्या प्रार्थनांच्या द्वारे माझे तुमच्याकडे येणे होईल१ अशी मला आशा आहे.
२३. ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदिवान एपफ्रास,
२४. आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला सलाम सांगतात.
२५. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide