१. दारयावेश मेदी ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी त्याची मजबुती करण्यास व त्याला शक्ती देण्यास मी उभा राहिलो.
२. आता मी तुला खरे काय ते दाखवून देतो. पाहा, पारस देशात तीन राजे उत्पन्न होतील; चौथा त्या सर्वांहून धनवान होईल; तो आपल्या धनाच्या योगाने बलाढ्य झाला म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या१ राज्याविरुद्ध उठवील.
३. आणखी एक प्रबळ राजा उत्पन्न होईल, तो आपली सत्ता फार गाजवील आणि आपल्या इच्छेस येईल तसे करील.
४. तो उदयास आला न आला तोच त्याचे राज्य मोडून चार दिशांना त्याचे विभाग होतील; तरी त्याच्या संततीच्या वाट्यास काहीएक येणार नाही, व त्या राज्याचा विस्तार पूर्वीप्रमाणे राहणार नाही; कारण त्याच्या राज्याचे उच्चाटन करून ते त्याच्या संततीस वगळून इतरांना देण्यात येईल.
५. दक्षिणेचा राजा बलवान होईल आणि त्याचा एक सरदार त्याच्याहूनही बलाढ्य होऊन त्याला राज्य प्राप्त होईल; त्याचे राज्य मोठे होईल.
६. नेमलेल्या वर्षांची मुदत भरल्यावर त्यांचा आपसात मिलाफ होईल; दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे करारमदार करण्यास जाईल; तथापि तिचे बाहुबल कायम राहणार नाही आणि तो व त्याचे बाहुबलही टिकणार नाही; तर त्या स्त्रीला ज्यांनी आणले, ज्याने तिला जन्म दिला व ज्याने त्या काळात तिला बल पुरवले त्यांच्यासह तिला इतरांच्या स्वाधीन करण्यात येईल.
७. तरी तिच्या कुळातला एक अंकुर त्याच्या पदावर विराजमान होईल; तो सैन्यासहवर्तमान उत्तरेच्या राजाच्या गडात प्रवेश करील आणि त्यांच्याबरोबर संग्राम करून यशस्वी होईल.
८. तो त्यांची दैवते, ओतीव मूर्ती, आणि त्यांची सोन्यारुप्याची सुंदर भांडी लुटून मिसर देशात नेईल; तो उत्तरेच्या राजावर चढाई न करता काही वर्षे राहील.
९. तो दक्षिणेच्या राजाच्या मुलखात जाईल आणि तेथून स्वदेशी परतेल.
१०. तरी त्याचे पुत्र लढाई करतील व मोठे लष्कर जमा करतील; ते येऊन तो देश पादाक्रांत करून पार जातील; ते परत येऊन लढाई चालवून त्याच्या गडापर्यंत जाऊन थडकतील.
११. तेव्हा दक्षिणेच्या राजाचे पित्त खवळून तो बाहेर पडून उत्तरेच्या राजाबरोबर युद्ध करील; तो पुष्कळ लोकसमूह घेऊन निघेल, पण तो समूह त्याच्या हाती लागेल.
१२. लष्कर जसजसे पुढे चाल करील तसतसे त्याचे मन उन्मत्त होईल; तो लाखो लोकांना चीत करील तरी तो यशस्वी होणार नाही.
१३. तेव्हा उत्तरेचा राजा पुन्हा येईल, तो आपल्याबरोबर पूर्वीपेक्षा मोठे लष्कर घेऊन येईल; तो काही वर्षांचा काळ संपल्यावर मोठे सैन्य व बहुत धन घेऊन येईल.
१४. त्या काळात दक्षिणेच्या राजाविरुद्ध पुष्कळ लोक उठतील; दृष्टान्त प्रत्ययास आणावा म्हणून तुझ्या लोकांपैकी आडदांड लोक उठतील, पण ते पडतील.
१५. अशा प्रकारे उत्तरेचा राजा येईल, तो मोर्चे लावून तटबंदीचे नगर घेईल; तेव्हा दक्षिणेचे बाहुबल टिकणार नाही; त्याच्या मोठमोठ्या वीरांचे काही चालणार नाही; त्यांच्यात सामना करण्याचे त्राण उरणार नाही.
१६. त्याच्यावर चढाई करणारा आपल्या इच्छेस येईल तसे करील व त्याच्यासमोर कोणी टिकाव धरणार नाही; तो आपल्या हाती प्रत्यक्ष नाश घेऊन त्या वैभवी देशात उभा राहील.
१७. तो आपल्या सार्या राज्याच्या बलासह येईल; तरी तो त्याच्याबरोबर करारमदार करील; तो त्यांना स्त्रियांची कन्या भ्रष्ट करण्यास देईल; ती त्याच्या पक्षाला टिकून राहणार नाही, ती त्याची होणार नाही.
१८. नंतर तो आपला मोर्चा द्वीपाकडे फिरवील, व त्यांतली अनेक हस्तगत करील; पण त्याने लावलेला हा काळिमा एक सरदार नाहीसा करील; एवढेच नव्हे तर तो उलट त्यालाच काळिमा लावील.
१९. मग तो आपल्या देशातील दुर्गांकडे आपला मोर्चा फिरवील; पण तो ठोकर खाऊन पडेल व त्याचा पत्ता लागणार नाही.
२०. पुढे त्याच्या जागी एक जण उभा राहील, तो त्या वैभवी देशात कर वसूल करणार्यास पाठवील; पण थोड्याच दिवसांत त्याचा नाश होईल; तरी तो क्रोधाने किंवा युद्धाने होणार नाही.
२१. मग त्याच्या जागी, त्यांनी राजपदाचा मान न दिलेला असा एक हलका मनुष्य उदयास येईल; पण तो लोक निर्धास्त असता येईल व आर्जवी भाषणे करून राज्य मिळवील.
२२. त्या लोकांचे बळ त्याच्यापुढून पुरासारखे ओसरून जाऊन त्याचा नाश होईल; करार केलेल्या सरदाराचाही नाश होईल.
२३. त्याच्याबरोबर करार केल्यावर तो कपटाने वागेल; तो चढाई करून येईल व थोड्याशा लोकांच्या मदतीने बलाढ्य होईल.
२४. लोक निर्धास्त असता तो प्रांतातल्या सुपीक स्थलांवर चालून येईल आणि त्याच्या वडिलांनी व त्या वडिलांच्या वडिलांनीही केले नाही ते तो करील; तो लुटीचे धन लोकांना वाटून देईल; काही काळपर्यंत मजबूत किल्ले घेण्याची तो मसलत करील.
२५. मोठी फौज घेऊन दक्षिणेच्या राजावर चालून जाण्याचा हिय्या व बल तो उत्तेजित करील; दक्षिणेचा राजा फार मोठी व पराक्रमी फौज घेऊन त्याच्याबरोबर युद्ध करील, पण त्याचा निभाव लागणार नाही, कारण लोक त्याच्याविरुद्ध मसलती करतील.
२६. त्याचे अन्न खाणारे त्याचा नाश करतील; त्याची सेना पुरासारखी लोटेल, पण पुष्कळ मरून पडतील.
२७. दोन्ही राजांची मने दुष्कृत्ये करण्याकडे वळतील; ते एका मेजावर बसून परस्परांबरोबर खोटे बोलतील; पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही; कारण शेवट व्हायचा तो नेमलेल्या वेळीच होणार.
२८. मग तो मोठी लूट घेऊन स्वदेशी परत जाईल; त्याचे मन पवित्र कराराविरुद्ध होईल आणि तो आपला मनोरथ पूर्ण करून स्वदेशी परत जाईल.
२९. नेमलेल्या वेळी तो पुन्हा दक्षिणेस जाईल; तरी पूर्वीप्रमाणे आता त्याचे चालणार नाही.
३०. कारण कित्तिमाची जहाजे त्याच्यावर चाल करून येतील, म्हणून तो खिन्न होऊन मागे फिरेल आणि पवित्र करारावर रुष्ट होऊन आपल्या मनास वाटेल तसे करील; तो परत जाईल व पवित्र करार सोडणार्यांबरोबर स्नेह करू पाहील.
३१. त्याच्या पक्षाचे सैनिक उठावणी करतील; ते पवित्रस्थान, तो दुर्ग, ते भ्रष्ट करतील, नित्याचे बलिहवन ते बंद करतील आणि विध्वंसमूलक अमंगलाची ते स्थापना करतील.
३२. जे करारासंबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करील; पण जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्ये करतील.
३३. लोकांतले जे सुज्ञ पुरुष ते पुष्कळांना बोध करतील; परंतु ते बरेच दिवस तलवार, अग्नी, बंदिवास व लुटालूट ह्यांनी संकटात पडतील.
३४. ते असे संकटात पडतील तेव्हा त्यांना थोडीबहुत मदत होईल; पण पुष्कळ लोक त्यांच्याबरोबर गोड बोलून त्यांना मिळतील.
३५. सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील, ते अशासाठी की, त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे; कारण नेमलेला अंतसमय प्राप्त होण्यास अद्यापि अवधी आहे.
३६. तो राजा मनास येईल तसे वर्तेल; तो उन्मत्त होईल; सर्व दैवतांहून तो स्वतःला श्रेष्ठ समजेल आणि देवाधिदेवाविरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल; कोपाची पूर्णता होईपर्यंत त्याची चलती राहील; जे नेमले आहे ते घडेलच.
३७. तो आपल्या पूर्वजांच्या दैवतांची, स्त्रियांच्या प्रेमाची किंवा कोणाही दैवताची पर्वा करणार नाही; कारण तो स्वतःला सर्वांहून श्रेष्ठ समजेल,
३८. आपल्या स्थानी राहून तो दुर्गदैवतास पूज्य मानील; जे दैवत त्याच्या पूर्वजांना माहीत नव्हते त्याची तो सोने, रुपे, जवाहीर व मनोरम वस्तू ह्यांनी पूजा करील.
३९. एका परकीय दैवताच्या साहाय्याने तो मोठे मजबूत गड लढेल; जे कोणी त्याला मानतील त्यांना तो वैभवास चढवील; त्यांना पुष्कळ लोकांवर सत्ता देईल व मोल घेऊन जमीन वाटून देईल.
४०. अंतसमयी दक्षिणेचा राजा त्याला टक्कर देईल; उत्तरेचा राजा रथ, स्वार व पुष्कळ तारवे घेऊन वावटळीसारखा त्याच्यावर येईल; तो अनेक देशात शिरेल व त्यांना पादाक्रांत करून पार निघून जाईल.
४१. तो वैभवी देशातही शिरेल; पुष्कळ देश पादाक्रांत होतील, पण अदोम, मवाब व अम्मोन येथील निवडक लोक हे त्याच्या हातातून सुटतील.
४२. अशा प्रकारे त्या देशांवर तो आपला हात चालवील; मिसर देशही त्याच्या हातून सुटणार नाही.
४३. तो मिसर देशातील सोन्यारुप्याचे निधी व सर्व मोलवान वस्तू कबजात घेईल; लुबी व कूशी हेही त्याच्यामागून चालतील.
४४. पण पूर्वेकडल्या व उत्तरेकडल्या बातम्यांनी तो चिंताक्रांत होईल; तेव्हा मोठ्या संतापाने पुष्कळांचा नाश व उच्छेद करण्यास तो निघून जाईल.
४५. समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वतांच्या दरम्यान तो आपले दरबारी तंबू ठोकील; पण त्याचा अंत येईल, कोणी त्याला साहाय्य करणार नाही.”
१. “त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मीखाएल तो उठेल; कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल; तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्या वेळी मुक्त होतील.
२. भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील.
३. जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील; पुष्कळ लोकांना नीतिमत्तेकडे वळवणारे लोक युगानुयुग तार्यांप्रमाणे चमकतील.
४. हे दानिएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव; पुष्कळ लोक इकडून तिकडे फिरतील व ज्ञानवृद्धी होईल.
५. मग मी दानिएलाने पाहिले तेव्हा दुसरे दोन पुरुष, एक नदीच्या ह्या तीरास व दुसरा त्या तीरास असे उभे होते.
६. तेव्हा तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष त्या नदीच्या पाण्यावर होता, त्याला त्यांतल्या एकाने विचारले, “ह्या अद्भुत गोष्टींची समाप्ती होण्यास किती अवधी आहे?”
७. तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून, जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटल्याचे मी ऐकले, “एक समय, दोन समय व अर्धा समय एवढा अवधी आहे; पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल तेव्हा ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”
८. मी हे ऐकले, पण समजलो नाही; तेव्हा मी म्हणालो, “हे माझ्या स्वामी, ह्या गोष्टींचा परिणाम काय?”
९. तो म्हणाला, “हे दानिएला, तू आपला स्वस्थ राहा; कारण अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत.
१०. पुष्कळ लोक आपणांस शुद्ध व शुभ्र करतील; ते स्वच्छ होतील; पण दुर्जन दुर्वर्तन करतील; दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही; पण जे सुज्ञ आहेत त्यांना तो प्राप्त होईल.
११. नित्याचे बलिहवन बंद होईल व विध्वंसमूलक अमंगलाची स्थापना होईल, तेव्हापासून एक हजार दोनशे नव्वद दिवस लोटतील.
१२. जो धीर धरून तेराशे पस्तीस दिवसांची अखेर पाहील तो धन्य.
१३. तथापि अंतापर्यंत तू जाऊन स्वस्थ राहा; म्हणजे तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील.
१. दाविदाचे स्तोत्र. मी अगदी मनापासून तुझे उपकारस्मरण करीन; देवांच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन.
२. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन, तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकारस्मरण करीन; कारण तू आपल्या संपूर्ण नावांहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस.
३. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकलास; तू मला हिम्मत दिलीस तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.
१६. दुर्जन बढती पावले म्हणजे गुन्हे वाढतात, नीतिमानांना त्यांचे पतन पाहायला सापडते.
१. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे,
२. आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.
३. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणांस कळून येते की, आपण त्याला ओळखतो.
४. “मी त्याला ओळखतो” असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठायी सत्य नाही.
५. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्या ठायी आहोत.
६. मी त्याच्या ठायी राहतो, असे म्हणणार्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे.
७. प्रियजनहो, मी तुम्हांला नवी आज्ञा लिहीत नाही; परंतु जी आज्ञा तुम्हांला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच जुनी आज्ञा लिहितो; जे वचन तुम्ही ऐकले ते ती जुनी आज्ञा होय.
८. तरी एक प्रकारे मी तुम्हांला नवी आज्ञा लिहितो. ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे; कारण अंधार नाहीसा होत आहे, व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे.
९. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे.
१०. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो, आणि त्याच्या ठायी अडखळण नसते;
११. पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो; तो कोठे चालला आहे हे त्याचे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत.
१२. मुलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झाली आहे.
१३. बापांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता.
१४. बापांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहात. तुमच्या ठायी देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे.
१५. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही.
१६. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत;
१७. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.
१८. मुलांनो, ही शेवटली घटका आहे, आणि ख्रिस्तविरोधक येणार असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत; ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटली घटका आहे.
१९. आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले.
२०. जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे.
२१. तुम्हांला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हांला लिहिले आहे असे नाही; तुम्हांला ते कळते म्हणून आणि कोणतीही लबाडी सत्यापासून नाही, म्हणून लिहिले आहे.
२२. येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे.
२३. जो कोणी पुत्राला नाकारतो त्याला पिता लाभला नाही; जो पुत्राला स्वीकारतो त्याला पिता लाभला आहे.
२४. तुमच्याविषयी म्हणायचे तर, जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते तुमच्यामध्ये राहो. जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते जर तुमच्यामध्ये राहिले तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल.
२५. हे जे अभिवचन त्याने स्वत: आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय.
२६. तुम्हांला बहकवणार्या लोकांविषयी हे मी तुम्हांला लिहिले आहे.
२७. तुमच्याविषयी म्हणायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुमच्यामध्ये राहतो, तेव्हा तुम्हांला कोणी शिकवण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक — तो सत्य आहे, खोटा नाही — तुम्हांला सर्व गोष्टींविषयी शिकवतो त्याप्रमाणे व त्याने तुम्हांला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा.
२८. तर आता मुलांनो, त्याच्यामध्ये राहा, ह्यासाठी की, तो प्रकट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे, आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याच्यापासून लाजेने माघार घ्यावी लागू नये.
२९. तो न्यायसंपन्न आहे हे जर तुम्हांला माहीत आहे तर जो कोणी नीतीने चालतो तो त्याच्यापासून जन्मलेला आहे हेही तुम्हांला माहीत झाले आहे.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide