बायबल एकाच वर्षात

१. यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया, आणि इस्राएली राजा योवाशाचा पुत्र यराबाम ह्यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे:
२. परमेश्वर होशेयाबरोबर प्रथम बोलला तेव्हा तो त्याला म्हणाला, “जा, एक जारिणी बायको करून घे व जारकर्माची मुले आपली अशी करून घे; कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जारकर्म हा देश करीत आहे.”
३. मग त्याने जाऊन दिब्लाइमाची कन्या गोमर ही बायको करून घेतली; ती त्याच्यापासून गर्भवती होऊन तिला पुत्र झाला.
४. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, “ह्याचे नाव इज्रेल ठेव; कारण थोडा काळ लोटल्यावर मी इज्रेल येथील रक्तपाताचा सूड येहूच्या राजघराण्यावर उगवीन व इस्राएल घराण्याच्या राज्याचा अंत करीन.
५. त्या दिवशी असे होईल की इज्रेल खोर्‍यात इस्राएलाच्या धनुष्याचा मी भंग करीन.”
६. ह्यानंतर ती पुन्हा गर्भवती होऊन तिला कन्या झाली. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “हिचे नाव लो-रुहामा (दया न पावलेली) ठेव; कारण इस्राएल घराण्याला क्षमा करण्याइतकी दया मी त्यांच्यावर पुन्हा करणार नाही.
७. यहूदाच्या घराण्यावर मी दया करीन; त्यांचा देव परमेश्वर ह्याच्या हातून त्यांचा उद्धार करीन; धनुष्य, तलवार, लढाई, घोडे अथवा स्वार ह्यांच्या द्वारे हा उद्धार करणार नाही.”
८. लो-रुहामेचे दूध तोडल्यावर गोमर गर्भवती होऊन तिला पुत्र झाला.
९. तेव्हा परमेश्वर म्हणाला, “ह्याचे नाव लो-अम्मी (माझे लोक नव्हत) ठेव; कारण तुम्ही माझे लोक नव्हत व मी तुमचा नव्हे.”
१०. तथापि इस्राएलाची संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अपरिमित व अगण्य होईल आणि असे घडून येईल की, ‘तुम्ही माझे लोक नव्हत’ असे जेथे त्यांना म्हणत, तेथे ‘तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात,’ असे त्यांना म्हणतील.
११. यहूदाची संतती व इस्राएलाची संतती एकत्र होऊन आपणांवर एक प्रमुख नेमतील व देशातून निघून येतील; कारण इज्रेलाचा दिवस थोर होईल.
१. आपल्या बंधूंना ‘अम्मी’ (माझे लोक), आपल्या भगिनींना ‘रुहामा’ (दया पावलेल्या) म्हणा.
२. “तुम्ही आपल्या आईची चांगली कानउघाडणी करा, तिचे कान चांगले उघडा; कारण ती माझी पत्नी नव्हे व मी तिचा पती नव्हे; ती आपले शिंदळचाळे आपल्या मुखावरून, व्यभिचाराचे प्रकार आपल्या स्तनांवरून दूर करो;
३. नाहीतर मी तिला वस्त्ररहित करून ती जन्माच्या दिवशी होती तशी तिला नग्न ठेवीन, तिला वैराणासारखी करीन, तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन, तिला तहानेने ठार मारीन.
४. तिच्या मुलाबाळांवरही मी दया करणार नाही, कारण ती मुले जारकर्माची आहेत.
५. त्यांच्या आईने जारकर्म केले आहे, त्यांचे गर्भधारण करणारीने निर्लज्जपणाचे प्रकार केले आहेत. ती म्हणाली, ‘मला अन्न, पाणी, लोकर, ताग, तेल व पेरे पुरवणार्‍या माझ्या वल्लभांमागे मी लागेन.’
६. ह्यास्तव पाहा, मी तुझ्या मार्गावर काटेरी कुंपण घालीन; तिला वाट सापडणार नाही अशी आडभिंत तिच्यापुढे घालीन.
७. ती आपल्या वल्लभांमागे धावेल, पण ते तिला आटोपणार नाहीत; ती त्यांचा शोध करील, पण ते तिला सापडणार नाहीत; तेव्हा ती म्हणेल, ‘मी आपल्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण तेव्हाची माझी स्थिती आताच्यापेक्षा बरी होती.’
८. तिला धान्य, द्राक्षारस व तेल पुरवणारा व जे सोने, रुपे त्यांनी बआलमूर्तीसाठी वेचले त्याची रेलचेल करून देणारा तो मीच, हे तिला माहीत नाही.
९. म्हणून पिकाच्या वेळी माझे धान्य व हंगामाच्या वेळी माझा द्राक्षारस मी अटकावून ठेवीन व तिची नग्नता झाकण्यासाठी तिला दिलेली माझी लोकर व माझा ताग हिरावून घेईन.
१०. आता तिच्या वल्लभांसमक्ष तिची लाज उघडी करीन व माझ्या हातून कोणी तिला सोडवणार नाही.
११. तिचे सर्व उत्सव, तिच्या यात्रा, तिची चंद्रदर्शने, तिचे शब्बाथ व तिचे सर्व नेमलेले सण मी बंद करीन.
१२. ज्या आपल्या द्राक्षालतांविषयी व अंजिराच्या झाडांविषयी ती म्हणत असे की, ‘ही माझ्या वल्लभांनी दिलेली माझी वेतने आहेत.’ ती मी उद्ध्वस्त करीन; मी त्यांचे रान बनवीन, आणि ती वनपशू खाऊन टाकतील.
१३. बआलमूर्तींच्या दिवसांत ती त्यांच्यापुढे धूप जाळत असे, ती नथ व अलंकार ह्यांनी नटून आपल्या वल्लभांच्या मागे जात असे; ती मला विसरली, त्या दिवसांचे प्रतिफळ मी तिला देईन, असे परमेश्वर म्हणतो.
१४. ह्यास्तव मी तिला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन.
१५. तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन; आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर१ खिंड देईन; ती आपल्या तारुण्याच्या दिवसांतल्याप्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणे, माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल.
१६. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तू मला ‘इशी’ (माझा पती) म्हणशील, ह्यापुढे कधी मला ‘बआली’ (माझा धनी) म्हणणार नाहीस.
१७. कारण मी तिच्या मुखातून बआलमूर्तींची नावे काढून टाकीन; ह्यापुढे तिला त्यांच्या नावांची आठवण उरणार नाही.
१८. त्या दिवशी इस्राएलांकरता मी वनपशू, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव ह्यांबरोबर करार करीन; देशातून धनुष्य, तलवार व युद्ध मोडून टाकीन व ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन.
१९. मी तुला सर्वकाळासाठी आपली वाग्दत्त असे करीन, नीतीने व न्यायाने, व ममतेने व दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन.
२०. मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन व तू परमेश्वराला ओळखशील.
२१. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी ऐकेन, मी आकाशाचे ऐकेन, आणि आकाश पृथ्वीचे ऐकेल;
२२. पृथ्वी, धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे ऐकेल व ती इज्रेलाचे२ ऐकतील.
४. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकारस्मरण करतील; कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत.
५. ते परमेश्वराच्या मार्गांविषयी गातील; कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे.
६. परमेश्वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो; पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.
१७. तू आपल्या मुलाला शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जिवाला हर्ष देईल.
१. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा; आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही.
२. प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल.
३. जो कोणी त्याच्यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा तो शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करतो.
४. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो; कारण पाप स्वैराचार आहे.
५. तुम्हांला माहीत आहे की, आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही.
६. जो कोणी त्याच्या ठायी राहतो तो पाप करत नाही; जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही.
७. मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये; जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे.
८. पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.
९. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही; कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते; त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे.
१०. ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही.
११. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की, आपण एकमेकांवर प्रीती करावी.
१२. काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती.
१३. बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्‍चर्य मानू नका.
१४. आपण बंधुजनांवर प्रीती करतो ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो.
१५. जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे; आणि कोणाही नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हांला माहीत आहे.
१६. ख्रिस्ताने आपल्याकरता स्वतःचा प्राण अर्पण केला ह्यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे; तेव्हा आपणही आपल्या बंधूकरता स्वतःचा प्राण अर्पण केला पाहिजे.
१७. मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वत:ला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीती कशी राहणार?
१८. मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी.
१९. आपण सत्याचे आहोत हे ह्यावरून आपल्याला कळून येईल; आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वत:ला दोषी ठरवते, त्याविषयी आपण स्वत:च्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ; कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्वकाही कळते.
२०.
२१. प्रियजनहो, आपले मन आपल्याला दोषी ठरवत नसेल, तर देवासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे.
२२. आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करतो.
२३. त्याची आज्ञा ही आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा; आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी.
२४. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठायी राहतो व तो त्या माणसाच्या ठायी राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्या ठायी राहतो.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide