१. वरील गोष्टीनंतर असे झाले की इज्रेलकर नाबोथ ह्याचा द्राक्षमळा इज्रेल येथे शोमरोनचा राजा अहाब ह्याच्या राजवाड्याजवळ होता.
२. अहाब नाबोथास म्हणाला, “तुझा द्राक्षमळा माझ्या वाड्यानजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन; त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षमळा देतो किंवा तुझी इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो.”
३. नाबोथ अहाबाला म्हणाला, “माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो.”
४. “मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही,” असे इज्रेलकर नाबोथ म्हणाला, म्हणून अहाब उदास व खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछान्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना.
५. तेव्हा त्याची स्त्री ईजबेल ही त्याच्याकडे येऊन विचारू लागली, “आपण अन्न सेवन करीत नाही, इतके आपले मन का खिन्न झाले आहे?”
६. तो तिला म्हणाला, “इज्रेलकर नाबोथ ह्याला मी म्हणालो की, ‘पैसे घेऊन मला तुझा द्राक्षमळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षमळा देतो’; ह्यावर तो म्हणाला, ‘मी आपला द्राक्षमळा तुला देणार नाही.”’
७. त्याची बायको ईजबेल त्याला म्हणाली, “सांप्रत इस्राएलावर तुमची राजसत्ता आहे ना! चला, उठा, अन्न सेवन करा, तुमचे मन आनंदित करा; इज्रेलकर नाबोथाचा द्राक्षमळा मी तुम्हांला मिळवून देते.”
८. मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली व त्यांवर त्याची मुद्रा केली; आणि नाबोथ राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडील जन व सरदार ह्यांच्याकडे ती रवाना केली.
९. तिने पत्रात ह्याप्रमाणे लिहिले, “उपवासाचा जाहीरनामा काढा व नाबोथाला लोकांसमोर उच्च स्थानी बसवा;
१०. आणि दोन अधम माणसे त्याच्यासमोर बसवा; ‘त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला’ अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी; मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा.”
११. ईजबेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणार्या वडील जनांनी व सरदारांनी केले.
१२. त्यांनी उपवासाचा जाहीरनामा काढला, आणि नाबोथाला लोकांसमोर उच्च स्थानी बसवले.
१३. दोन अधम पुरुष येऊन त्याच्यासमोर बसले; त्या अधम पुरुषांनी लोकांसमक्ष नाबोथाविरुद्ध साक्ष दिली; ते म्हणाले, “नाबोथाने देवाचा व राजाचा धिक्कार केला आहे.” ह्यानंतर त्यांनी त्याला नगराबाहेर नेऊन तो मरेपर्यंत दगडमार केला.
१४. त्यांनी ईजबेलीस सांगून पाठवले की, “नाबोथाला दगडमार केला व तो मेला.”
१५. नाबोथाला दगडमार होऊन तो मेला हे ईजबेलीने ऐकले तेव्हा ती अहाबाला म्हणाली, “उठा, जो द्राक्षमळा इज्रेलकर नाबोथ पैसे घेऊन तुम्हांला देण्यास कबूल नव्हता तो ताब्यात घ्या. नाबोथ आता जिवंत नाही, मेला आहे.”
१६. इज्रेलकर नाबोथ मरण पावला हे अहाबाने ऐकले तेव्हा तो त्याच्या द्राक्षमळ्याचा ताबा घ्यायला जाण्यासाठी उठला.
१७. इकडे एलीया तिश्बी ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की,
१८. “ऊठ, शोमरोननिवासी इस्राएलाचा राजा अहाब ह्याच्या भेटीस जा; तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात आहे; त्याचा ताबा घेण्यासाठी तो तेथे गेला आहे.
१९. तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहेस काय? तू त्याला सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटून खाल्ले त्याच ठिकाणी कुत्री तुझेही रक्त चाटून खातील.”
२०. अहाब एलीयाला म्हणाला, “माझ्या वैर्या, तू मला गाठलेस काय?” तो म्हणाला, “होय, मी तुला गाठले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावे म्हणून तू स्वतःला विकून टाकले आहेस.
२१. पाहा, मी तुझ्यावर असे अरिष्ट आणीन की तुझा अगदी धुव्वा उडेल, आणि अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्राएल लोकांच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन;
२२. तू मला संताप आणला आणि इस्राएल लोकांना पाप करायला लावलेस, ह्यास्तव मी तुझ्या घराण्याचे नबाटाचा पुत्र यराबाम व अहीयाचा पुत्र बाशा ह्यांच्या घराण्यांप्रमाणे करीन.”
२३. ईजबेलीविषयीही परमेश्वर असे म्हणतो, “इज्रेलाच्या तटाजवळ ईजबेलीस कुत्री खातील.
२४. अहाबाचा जो कोणी नगरात मरेल त्याला कुत्री खातील व जो कोणी रानावनात मरेल त्याला आकाशातले पक्षी खातील.”
२५. (अहाबासारखा दुसरा कोणी झाला नाही; त्याची बायको ईजबेल हिने त्याला उत्तेजन दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यासाठी स्वतःला विकून टाकले होते;
२६. परमेश्वराने इस्राएलापुढून देशातून घालवून दिलेल्या अमोरी लोकांप्रमाणे त्याने मूर्तींच्या नादी लागून पुष्कळ अमंगळ कर्मे केली.)
२७. एलीयाचे हे शब्द ऐकून अहाबाने आपली वस्त्रे फाडली व अंगास गोणपाट गुंडाळून उपवास केला; तो गोणपाटावर निजू लागला व मंद गतीने चालू लागला.
२८. ह्यानंतर एलीया तिश्बी ह्याला परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की,
२९. “अहाब माझ्यापुढे कसा दीन झाला आहे हे तू पाहतोस ना? तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणीन.”
१. अरामी लोक व इस्राएल लोक ह्यांच्यामध्ये तीन वर्षे लढाई झाली नाही.
२. तिसर्या वर्षी यहूदाचा राजा यहोशाफाट इस्राएलाच्या राजाकडे आला.
३. तेव्हा इस्राएलाचा राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “रामोथ-गिलाद आपलेच आहे हे तुम्हांला ठाऊक आहे काय? तर आपण स्वस्थ का राहावे? ते अरामाच्या राजापासून हिसकावून का घेऊ नये?”
४. तो यहोशाफाटास म्हणाला, “रामोथ-गिलाद येथे लढायला आपण माझ्याबरोबर याल काय?” त्याला यहोशाफाटाने उत्तर दिले, “मी आणि आपण एकच; माझे लोक ते आपलेच व माझे घोडे ते आपलेच.”
५. यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजाला म्हटले, “आज परमेश्वराचा आदेश विचारून घे.”
६. इस्राएलाच्या राजाने सुमारे चारशे संदेष्टे जमवून त्यांना विचारले, “मी रामोथ-गिलादावर चढाई करून जाऊ का नको?” त्यांनी उत्तर दिले, “चढाई करून जा; प्रभू ते महाराजांच्या हाती देईल.”
७. तेव्हा यहोशाफाटाने विचारले, “ह्याच्याखेरीज दुसरा कोणीतरी परमेश्वराचा संदेष्टा नाही काय? त्याला आम्ही प्रश्न विचारू.”
८. इस्राएलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल असा आणखी एक मनुष्य आहे, पण मला त्याचा तिरस्कार वाटतो; कारण मला अनुकूल असा संदेश तो कधीही देत नाही, प्रतिकूल तेवढाच देतो; तो इम्लाचा पुत्र मीखाया होय.” यहोशाफाट म्हणाला, “महाराजांनी असे बोलू नये.”
९. तेव्हा इस्राएलाच्या राजाने एका कारभार्यास बोलावून सांगितले, “लवकर जाऊन इम्लाचा पुत्र मीखाया ह्याला घेऊन ये.”
१०. इस्राएलाचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट हे आपापली राजवस्त्रे धारण करून शोमरोनाच्या वेशीजवळ एका उघड्या जागेत आपापल्या सिंहासनावर विराजमान झाले होते, आणि सर्व संदेष्टे त्यांच्यापुढे भाषण करीत होते.
११. तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया ह्याने लोखंडाची शिंगे करून आणली होती; तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ह्या शिंगांनी तू अरामी लोकांना हुंदडून त्यांचा नाश करशील.”
१२. सर्व संदेष्टे त्याच्याप्रमाणेच भाषण करू लागून म्हणाले, “रामोथ-गिलादावर चढाई करून जा, यशस्वी हो; कारण परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.”
१३. जो जासूद मीखायाला बोलवायला गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्ट्यांचे एकमत होऊन ते राजासंबंधाने शुभवचन बोलत आहेत, तर त्यांच्याप्रमाणेच तूही शुभसंदेश कथन करावास.”
१४. मीखाया म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वर जे काही मला सांगेल तेच मी बोलेन.”
१५. तो राजाकडे आला तेव्हा राजाने त्याला विचारले, “हे मीखाया, आम्ही रामोथ-गिलादावर युद्ध करायला जावे की न जावे?” त्याने त्याला म्हटले, “जा, यशस्वी हो, परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.”
१६. राजा त्याला म्हणाला, “परमेश्वराच्या नावाने मला खरे तेच सांग, असे मी तुला कितीदा शपथ घालून सांगावे?”
१७. मग तो म्हणाला, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळावाचून असलेल्या मेंढरांसारखे डोंगरावरून विखरले आहेत असे मला दिसले; तेव्हा परमेश्वर म्हणाला, ह्यांना कोणी धनी नाही, तर हे आपापल्या घरी सुखरूप परत जावोत.”
१८. इस्राएलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, “हा माझ्यासंबंधाने अनुकूल संदेश सांगणार नाही तर प्रतिकूल सांगेल असे मी आपल्याला सांगितले नाही काय?”
१९. मीखाया म्हणाला, “तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक: परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले.
२०. परमेश्वर म्हणाला, ‘अहाबाला असा कोण मोह घालील की तो रामोथ-गिलादावर चाल करून तेथे पतन पावेल?’ तेव्हा कोणी असे, कोणी तसे म्हटले.
२१. त्या वेळी एक आत्मा जवळ येऊन परमेश्वरासमोर उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोह घालतो.’
२२. परमेश्वराने विचारले, ‘कसा?’ तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा होईन.’ परमेश्वर म्हणाला, ‘तू त्याला मोह घालशील; जा, तुझ्याकडून हे होईल; तसेच कर.’
२३. तर पाहा, परमेश्वराने तुझ्या ह्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा संचरवला आहे; तुझे अनिष्ट होणार असे परमेश्वर बोलला आहे.”
२४. तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया मीखायाजवळ गेला, आणि त्याच्या तोंडात मारून त्याने त्याला विचारले, “परमेश्वराचा आत्मा मला सोडून तुझ्याशी बोलायला कोठून गेला?”
२५. मीखाया त्याला म्हणाला, “तू लपण्यासाठी घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल.”
२६. मग इस्राएलाचा राजा म्हणाला, “नगराचा सुभेदार आमोन व राजपुत्र योवाश ह्यांच्याकडे मीखायाला माघारी घेऊन जा;
२७. आणि त्यांना सांगा, राजा म्हणतो, ह्या मनुष्याला बंदीत टाका, व मी सुखरूप परत येईपर्यंत त्याला शिक्षेचे अन्न व शिक्षेचे पाणी द्या.”
२८. मीखाया म्हणाला, “तू सुखरूप परत आलास तर समजावे की परमेश्वर माझ्या द्वारे बोललाच नाही.” तो म्हणाला, “लोकहो, तुम्ही सर्व हे ऐका.”
२९. नंतर इस्राएलाचा राजा व यहूदाचा राजा यहोशाफाट ह्यांनी रामोथ-गिलादावर चढाई केली.
३०. इस्राएलाच्या राजाने यहोशाफाटाला सांगितले, “मी वेष बदलून लढाईला जाणार; पण आपण आपली स्वतःची वस्त्रे घाला.” ह्याप्रमाणे इस्राएलाचा राजा वेष बदलून लढाईला गेला.
३१. अरामाच्या राजाने आपल्या बत्तीस रथांच्या सरदारांना आज्ञा केली होती की, ‘लहानथोरांपैकी कोणाशीही लढू नका, इस्राएलाच्या राजाशी मात्र लढा.’
३२. त्या रथाच्या सरदारांनी यहोशाफाटाला पाहिले तेव्हा ते म्हणाले, “हाच इस्राएलाचा राजा आहे.” म्हणून त्यांनी त्याच्याशी लढण्यासाठी मोर्चा फिरवला; तेव्हा यहोशाफाटाने आरोळी ठोकली.
३३. रथाच्या सरदारांनी हा इस्राएलाचा राजा नाही असे पाहिले तेव्हा त्याचा पाठलाग करायचे सोडून ते परतले.
३४. मग कोणीएकाने सहजगत्या एक बाण सोडला, तो जाऊन इस्राएली राजाच्या चिलखताच्या सांध्यात रुतला. तेव्हा तो आपल्या सारथ्याला म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, रथ फिरवून मला सैन्याच्या बाहेर घेऊन जा.”
३५. त्या दिवशी घनघोर युद्ध झाले; अराम्यांच्या मारापुढे राजा आपल्या रथाला टेकून उभा होता; तो संध्याकाळी मरण पावला; त्याच्या घायाचे रक्त वाहून रथाच्या तळाशी साचले.
३६. सूर्यास्ताच्या समयी सर्व सैन्यात असा पुकारा झाला की, “प्रत्येकाने आपापल्या नगराची व आपापल्या देशाची वाट धरावी.”
३७. राजा मरण पावल्यावर त्याला शोमरोनाला नेले; शोमरोन येथे त्यांनी त्याला मूठमाती दिली.
३८. राजाचा रथ शोमरोनाच्या तळ्यानजीक धुतला तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे कुत्र्यांनी येऊन त्याचे रक्त चाटून खाल्ले; ती वेश्यांची स्नान करण्याची जागा होती.
३९. अहाबाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने जे काही केले ते, त्याने बांधलेले हस्तिदंती गृह, त्याने वसवलेली सर्व नगरे ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
४०. अहाब आपल्या पितरांजवळ जाऊन निजला, आणि त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला.
४१. इस्राएलाचा राजा अहाब ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी आसाचा पुत्र यहोशाफाट यहूदावर राज्य करू लागला.
४२. यहोशाफाट राज्य करू लागला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजूबा; ती शिल्हीची कन्या.
४३. त्याची सगळी चालचलणूक त्याचा पिता आसा ह्याच्याप्रमाणे होती; ती त्याने सोडली नाही; परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले; तथापि त्याने उच्च स्थाने काढून टाकली नाहीत; लोक अजून त्या उच्च स्थानांवर यज्ञ करीत व धूप जाळीत.
४४. यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजाशी तह केला.
४५. यहोशाफाटाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने दाखवलेला पराक्रम, त्याने केलेली युद्धे, ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
४६. त्याचा पिता आसा ह्याच्या वेळी जे पुरुषगामी राहून गेले होते त्यांना त्याने देशातून घालवून दिले.
४७. त्या काळी अदोमात कोणी राजा नव्हता; एक मुतालीक (कारभारी) राज्य चालवत होता.
४८. सोने आणण्यासाठी ओफीर येथे जाता यावे म्हणून यहोशाफाटाने तार्शीशी गलबते बांधली; ती एसयोन-गेबेर येथे फुटली, त्यामुळे ती गेली नाहीत.
४९. तेव्हा अहाबाचा पुत्र अहज्या यहोशाफाटाला म्हणाला, “माझे सेवक आपल्या सेवकांबरोबर जहाजातून जाऊ द्या;” पण यहोशफाटाने नकार दिला.
५०. यहोशाफाट आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला त्याच्या पूर्वजांमध्ये, मूळ पुरुष दावीद ह्याच्या नगरामध्ये मूठमाती दिली; आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोराम राजा झाला.
५१. यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याच्या कारकिर्दीच्या सतराव्या वर्षी अहाबाचा पुत्र अहज्या शोमरोन येथे इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने इस्राएलावर दोन वर्षे राज्य केले.
५२. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, त्याच्या आईबापांच्या आणि इस्राएल लोकांच्या हातून पाप करवणारा नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या मार्गाने तो चालला.
५३. आपल्या बापाप्रमाणे त्याने बआलाच्या मूर्तींचे भजनपूजन करून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला संतप्त केले.
१. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे; मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस.
२. तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर; माझ्याकडे आपला कान लाव व माझे तारण कर;
३. मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो; माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस. कारण तू तर माझा गड व माझा दुर्ग आहेस.
४. हे माझ्या देवा, दुर्जनाच्या हातातून मला मुक्त कर, अन्यायी व निर्दय ह्यांच्या तावडीतून मला मुक्त कर.
५. कारण, हे प्रभू, परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस; माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस.
६. जन्मापासून तूच माझा आधार आहेस; मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस; मी तुझी स्तुती निरंतर करीन.
७. पुष्कळ लोकांना मी आश्चर्याचा विषय झालो आहे; तरी तू माझा खंबीर आश्रय आहेस.
८. माझ्या मुखात तुझे स्तुतिस्तोत्र सदा राहो; त्यातून दिवसभर गौरवपर शब्द निघोत.
३. जेथे दुष्ट तेथे तिरस्कार, आणि जेथे अधमता तेथे निंदा.
४. मनुष्याच्या तोंडचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत, ते वाहता ओढा व ज्ञानाचा झरा असे आहेत.
५. दुर्जनाचा पक्ष धरून नीतिमानाचा न्याय विपरीत करणे उचित नाही.
१. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे.
२. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो; आणि फळ देणार्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो.
३. जे वचन मी तुम्हांला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात.
४. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हांलाही देता येणार नाही.
५. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही.
६. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात.
७. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल.
८. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.
९. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे; तुम्ही माझ्या प्रीतीत राहा.
१०. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.
११. माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
१२. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे.
१३. आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.
१४. मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात.
१५. मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही; कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
१६. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे; ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांला द्यावे.
१७. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हांला ह्या आज्ञा करतो.
१८. जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हांला माहीत आहे.
१९. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हांला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते.
२०. ‘दास धन्यापेक्षा मोठा नाही’ हे जे वचन मी तुम्हांला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील, त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील;
२१. परंतु ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हांला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाहीत.
२२. मी आलो नसतो व त्यांच्याबरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते; परंतु आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही.
२३. जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो.
२४. जी कृत्ये दुसर्या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांनी मला व माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे.
२५. तथापि ‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.
२६. परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुमच्याकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल;
२७. आणि तुम्हीही साक्ष द्याल, कारण तुम्ही माझ्याबरोबर आरंभापासून आहात.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide