१. अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट ह्यांना घेऊन मिसर देश सोडून नेगेबकडे गेला.
२. तो कळप, रुपे व सोने ह्यांनी संपन्न होता.
३. मग मजला करत करत तो नेगेबपासून बेथेलपर्यंत गेला; बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता त्या ठिकाणी तो आला.
४. त्याने प्रथम वेदी बांधली होती त्या ठिकाणी तो आला; तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली.
५. अब्रामाबरोबर लोट जात होता त्याचीही मेंढरे, गुरेढोरे व पाले होती.
६. त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना; कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यांना एकत्र राहता येईना.
७. शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली; त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी ह्यांची वस्ती होती.
८. अब्राम लोटाला म्हणाला, “हे पाहा, माझ्यातुझ्यामध्ये, आणि माझे गुराखी व तुझे गुराखी ह्यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत.
९. सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर माझ्यापासून वेगळा हो, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”
१०. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले; परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांचा नाश केला त्यापूर्वी सोअराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता.
११. ही यार्देनची सर्व तळवट लोटाने स्वतःसाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला; ते ह्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले.
१२. अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरांत राहिला, आणि मुक्काम करत करत त्याने आपला डेरा सदोमापर्यंत दिला.
१३. सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते.
१४. लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टी लावून पाहा.
१५. कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन.
१६. मी तुझी संतती पृथ्वीच्या रज:कणांसारखी करीन; कोणाला पृथ्वीच्या रज:कणांची गणना करता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल.
१७. ऊठ, ह्या देशाची लांबीरुंदी फिरून पाहा, कारण तो मी तुला देणार आहे.”
१८. मग अब्राम मुक्काम करत करत हेब्रोनाजवळ मम्रेच्या एलोन राईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला; तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली.
१. शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा कदार्लागोमर आणि गोयिमाचा राजा तिदाल ह्यांच्या दिवसांत असे झाले की,
२. त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोईमाचा राजा शमेबर आणि बेला म्हणजे सोअर ह्याचा राजा ह्यांच्याशी युद्ध केले.
३. हे सर्व एकजूट करून सिद्दीम खोर्यात गेले; हे खोरे म्हणजेच क्षारसमुद्र.
४. ते कदार्लागोमर ह्यांचे बारा वर्षे अंकित होते, पण तेराव्या वर्षी ते त्याच्यावर उठले.
५. चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या पक्षाचे राजे ह्यांनी येऊन अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाई लोकांना, हाम येथे जूजी लोकांना, किर्याथाईमच्या मैदानात एमी लोकांना
६. आणि होरी लोकांना त्यांच्या सेईर डोंगरात मार देऊन एल्-पारानाच्या जवळ रान होते तेथपर्यंत पिटाळून लावले.
७. मग मागे परतून एन्-मिशपात म्हणजे कादेश येथे ते आले. त्यांनी अमालेकी लोकांचा सगळा देश जिंकला व हससोन-तामार येथे राहणार्या अमोरी लोकांनाही मार दिला.
८. इकडे सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोईमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअर ह्याचा राजा हे त्यांच्याशी युद्ध करायला निघाले आणि सिद्दीम खोर्यात त्यांनी आपल्या सैन्याची रचना केली.
९. एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयिमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक ह्यांच्याशी ते लढले; चार राजांनी पाच राजांशी सामना केला.
१०. सिद्दीम खोर्यात डांबराच्या खाणी पुष्कळ होत्या; सदोम व गमोरा ह्यांचे राजे पळत असता तेथे पडले व बाकीचे डोंगरात पळाले.
११. तेव्हा सदोम व गमोरा येथील मालमत्ता व सगळी अन्नसामग्री शत्रू लुटून घेऊन गेले.
१२. अब्रामाचा पुतण्या लोट हा सदोम येथे राहत होता; त्याला त्यांनी धरून नेले आणि त्याची मालमत्ताही नेली.
१३. तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्राम इब्री ह्याला हे वर्तमान सांगितले, त्या वेळी तो अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ अमोरी मम्रे ह्याच्या एलोन राईत राहत होता; हे अब्रामाच्या जुटीतले होते.
१४. आपल्या भाऊबंदांना पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले तीनशे अठरा दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला.
१५. त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्यांच्यावर रात्रीची चाल केली आणि त्यांना मार देऊन दिमिष्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला.
१६. त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली; त्याप्रमाणेच आपला भाऊबंद लोट, त्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारी आणले.
१७. कदार्लागोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे ह्यांना मारून तो माघारी येत असता त्याला भेटायला सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरा गेला.
१८. आणि शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन त्याला सामोरा आला; हा परात्पर देवाचा याजक होता.
१९. त्याने त्याला असा आशीर्वाद दिला: “आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देवो;
२०. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य!” तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा दहावा भाग दिला.
२१. मग सदोमाचा राजा अब्रामाला म्हणाला, “माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा.”
२२. पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी ह्याच्यासमोर मी बाहू उभारून सांगतो की,
२३. तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वहाणेचा बंद मी घेणार नाही; मी अब्रामास संपन्न केले असे म्हणायला तुम्हांला कारण न मिळो;
२४. ह्या तरुण माणसांनी अन्न खाल्ले तेवढे पुरे; माझ्याबरोबर आलेले आनेर, अष्कोल व मम्रे ह्यांना वाटा मिळाला म्हणजे पुरे; त्यांना आपला वाटा घेऊ द्या.”
४. त्याची भीती बाळगा, पाप करू नका; अंथरुणात पडल्यापडल्या आपल्या मनाशी विचार करा; स्तब्ध राहा. (सेला)
६. “आमचे कल्याण कोण करील?” असे म्हणणारे पुष्कळ आहेत; हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आमच्यावर पाड.
७. धान्याची व द्राक्षारसाची समृद्धी झाली म्हणजे लोकांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या मनात उत्पन्न केला आहेस.
८. मी स्वस्थपणे पडून लगेच झोपी जातो, कारण हे परमेश्वरा, तूच मला एकान्तात निर्भय ठेवतोस.
१. माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील,
२. आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील,
३. जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील,
४. जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करशील, व गुप्त निधींप्रमाणे त्याला उमगून काढशील,
५. तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.
१. माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्ये त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा; केलीत तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांला प्रतिफळ नाही.
२. ह्यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणांपुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.
३. तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये;
४. अशा हेतूने की, तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता उघडपणे तुला तुझे फळ देईल.
५. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका; कारण लोकांनी आपणांस पाहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.
६. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा ‘आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन’ आपल्या गुप्तवासी पित्याची ‘प्रार्थना कर’ म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल.
७. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका; आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते.
८. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे.
९. ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.
१०. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
११. आमची रोजची भाकर आज आम्हांला दे;
१२. आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हांला सोड;
१३. आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस; तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेन.’]
१४. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांलाही क्षमा करील;
१५. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.
१६. तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.
१७. तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोंड धू;
१८. अशा हेतूने की, तू उपास करत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide