बायबल एकाच वर्षात ऑक्टोबर १०यिर्मया ५:१-३११. यरुशलेमेच्या गल्ल्यांतून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खातरी करून घ्या; तिच्या चौकांत शोध करा की कोणी न्यायाने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय? सापडल्यास मी त्याला क्षमा करीन.२. “परमेश्वराच्या जीविताची शपथ,” असे ते म्हणतात, तरी ती शपथ खोटी आहे.३. हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? तू त्यांना ताडन करतोस तरी ते दु:खित होत नाहीत; तू त्यांना क्षीण करतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत, ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करतात, ते वळत नाहीत.४. तेव्हा मी म्हटले, “हे तुच्छ आहेत, हे मूर्ख आहेत; परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाचे नियम त्यांना ठाऊक नाहीत.५. ह्याकरता मी महाजनांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाचे नियम ठाऊक आहेत.” पण त्यांनी तर जोखड साफ मोडले आहे व बंधने तोडून टाकली आहेत.६. ह्यास्तव रानातला सिंह त्यांना फाडील, वनातला लांडगा त्यांना फस्त करील, चित्ता त्यांच्या नगरांजवळ दबा धरून तेथून बाहेर पडणार्या प्रत्येकाचे फाडून तुकडे करील; कारण त्यांचे अपराध व त्यांची मागे घसरणी ही बहुत आहेत.७. “मी तुला क्षमा कशी करू? तुझ्या पुत्रांनी मला सोडले आहे व जे देव नाहीत त्यांची त्यांनी शपथ वाहिली आहे; मी त्यांना पोटभर चारले तेव्हा त्यांनी जारकर्म केले व वेश्यांच्या घरात गर्दी केली.८. खाऊन मस्त झालेल्या घोड्यांप्रमाणे ते चोहोकडे फिरतात; त्यांतला प्रत्येक आपल्या शेजार्याच्या बायकोला पाहून खिंकाळतो.९. परमेश्वर म्हणतो, ह्याबद्दल मी नाही का समाचार घेणार? माझा आत्मा ह्या असल्या राष्ट्रांचे पारिपत्य नाही का करणार?१०. तिच्या द्राक्षवेलांच्या रांगांत शिरा व नासधूस करा; तरी पूर्ण नासधूस करू नका. तिच्या फांद्या तोडून टाका. त्या परमेश्वराच्या नाहीत.११. कारण इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ही माझ्याशी बेइमानपणे वागली आहेत असे परमेश्वर म्हणतो.१२. ते परमेश्वराला अवमानून म्हणतात, ‘तो नाहीच; आमच्यावर अरिष्ट म्हणून येणार नाही, आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही.१३. संदेष्टे वायुरूप होतील, त्यांच्याकडे संदेश नाही; त्यांची अशी गती होईल.”’१४. ह्यामुळे परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “तुम्ही असे बोलता म्हणून पाहा, मी आपले शब्द तुझ्या मुखात अग्नी असे आणि हे लोक सरपण असे करीन आणि तो त्यांना खाऊन टाकील.१५. परमेश्वर म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुमच्यावर दुरून एक राष्ट्र आणतो; ते बळकट व प्राचीन राष्ट्र आहे; तुला त्यांची भाषा माहीत नाही, तुला त्यांचे बोलणे समजणार नाही.१६. त्यांचा भाता उघडी कबर आहे; ते सर्व पराक्रमी वीर आहेत.१७. ते तुझे पीक, तुझ्या मुलाबाळांचे अन्न खाऊन टाकतील; ते तुझी शेरडेमेंढरे, तुझी गुरेढोरे, खाऊन टाकतील; तुझ्या द्राक्षलता व अंजिरांची झाडे फस्त करतील; ज्या तटबंदीच्या नगरांवर तुझी भिस्त आहे त्यांना ते तलवारीने उद्ध्वस्त करतील.”१८. “तरी त्या दिवसांतही मी तुमचा पुरा अंत करणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.१९. जर तुम्ही म्हणाल की, ‘परमेश्वर आमचा देव त्याने आमचे असे का केले?’ तर तू त्यांना सांग की, ‘तुम्ही मला सोडून आपल्या देशात अन्य दैवतांची सेवा केली तशी जो देश तुमचा नाही त्यात तुम्ही परक्यांची सेवा कराल.”’२०. याकोबघराण्यामध्ये हे पुकारा आणि यहूदामध्ये जाहीर करून म्हणा की,२१. “मूर्ख, बुद्धिहीन लोकहो, हे आता ऐका; तुम्हांला डोळे असून दिसत नाही. तुम्हांला कान असून ऐकू येत नाही.२२. परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे भय धरणार नाही काय? माझ्यापुढे थरथर कापणार नाही काय? मी तर समुद्राला वाळू ही सीमा नेमली आहे; ही सर्वकाळची मर्यादा त्याच्याने उल्लंघवत नाही; त्याच्या लाटा उचंबळतात तरी त्यांचे काही चालत नाही; त्या गर्जना करतात तरी त्यांना ती उल्लंघवत नाही.२३. तरी ह्या लोकांचे हृदय हट्टी व फितुरी आहे; ते फितून निघून गेले आहेत.२४. ‘जो परमेश्वर आमचा देव आम्हांला पाऊस देतो, योग्य समयी आगोटीच्या व वळवाच्या पावसाचा वर्षाव करतो, जो कापणीची नेमलेली सप्तके आमच्यासाठी राखून ठेवतो त्याचे भय आम्ही धरू,’ असे ते आपल्या मनात म्हणत नाहीत.२५. तुमच्या दुष्कर्मांनी ही फिरवली आहेत, तुमच्या पातकांनी तुमचे हित रोखून धरले आहे.२६. कारण माझ्या लोकांमध्ये दुष्ट जन आढळतात, ते फासेपारध्याप्रमाणे दबा धरतात; ते सापळा मांडून माणसांना धरतात.२७. पिंजरा पक्ष्यांनी भरलेला असतो तशी त्यांची घरे कपटाच्या प्राप्तीने भरलेली असतात; म्हणून ते थोर व श्रीमंत झाले आहेत.२८. ते धष्टपुष्ट व तेजस्वी झाले आहेत, ते दुष्कर्माची कमाल करतात; आपली चलती व्हावी म्हणून ते पोरक्यांचा न्याय करीत नाहीत, कंगालांस न्याय देत नाहीत.२९. परमेश्वर म्हणतो ह्या गोष्टींबद्दल मी त्यांचा समाचार नाही का घेणार? माझा आत्मा ह्या असल्या राष्ट्रांचे पारिपत्य नाही का करणार?”३०. चकित करणारे अघोर कृत्य देशात घडले आहे.३१. संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?यिर्मया ६:१-३०१. बन्यामीनवंशजहो, यरुशलेमेतून रक्षणार्थ पळून जा, तकोवात रणशिंग फुंका, बेथ-हक्करेमावर ध्वज उभारा; कारण उत्तरेकडून अरिष्ट व मोठा नाश डोकावत आहे.२. सुंदर व सुकुमार अशा त्या सीयोनकन्येचा मी उच्छेद करीन.३. मेंढपाळ आपले कळप घेऊन तिच्याकडे येतील, तिच्या आसपास आपले तंबू ठोकतील, त्यांच्यातला प्रत्येक आपापल्या स्थानी चरेल.४. “तिच्याशी लढण्याची तयारी करा; उठा, आपण दुपारी चढाई करू. हाय हाय! दिवस कलला आहे, संध्याकाळची छाया वाढत आहे.”५. “उठा, आपण रात्री चढाई करून तिच्या वाड्यांचा नाश करू.”६. कारण सेनाधीश परमेश्वर म्हणाला आहे की: “झाडे तोडून यरुशलेमेसमोर मोर्चा रचा. पारिपत्य करायचे ते ह्याच नगराचे; त्याच्यात जुलूमच जुलूम माजला आहे.७. झर्यांतून जसे नित्य नवे पाणी येते तशी त्यात नित्य नवी दुष्टता घडते; त्याच्या ठायी बलात्कार व लुटालूट ह्यांचा गोंगाट ऐकू येतो; नित्य माझ्यासमोर रोग आणि जखमा आहेत.८. यरुशलेमे, शुद्धीवर ये, नाहीतर तुझ्यावरचा माझा जीव उडेल, मी तुला ओसाड व निर्जन भूमी करीन.”९. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “द्राक्षलतांचा सरवा काढतात तसा अवशिष्ट इस्राएलाचा सरवा साफ काढून नेतील; द्राक्षे खुडणार्यांप्रमाणे तू आपला हात डाहळ्यांना घाल.”१०. मी हे कोणाला सांगून पटवू म्हणजे ते ऐकतील? पाहा, त्यांचा कान बेसुनत आहे, त्यांना ऐकू येत नाही; पाहा, परमेश्वराचे वचन त्यांना निंदास्पद झाले आहे, त्यात त्यांना काही संतोष वाटत नाही.११. ह्याकरता मी परमेश्वराच्या संतापाने भरलो आहे; तो दाबून ठेवता ठेवता मी थकलो आहे; “रस्त्यातल्या पोरांवर, तरुणांच्या जमावावर तो सोड; नवरा व बायको, वृद्ध व पुर्या वयाचे ह्या सर्वांना तो गाठील.१२. त्यांची घरे, शेते व स्त्रिया ही सर्व दुसर्यांच्या हाती जातील; मी आपला हात देशाच्या रहिवाशांवर उगारीन,” असे परमेश्वर म्हणतो.१३. “कारण लहानथोर सर्व स्वहिताला हपापलेले आहेत; संदेष्ट्यापासून याजकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करतात.१४. शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करतात.१५. त्यांनी अमंगल कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना लाज मुळीच वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील,” असे परमेश्वर म्हणतो.१६. परमेश्वर म्हणतो, “चवाठ्यावर उभे राहून पाहा आणि पुरातन मार्गांपैकी कोणता म्हणून विचारा; सन्मार्गाने चाला; अशाने तुमच्या जिवास विश्रांती मिळेल;” पण ते म्हणाले, ‘आम्ही चालणार नाही.’१७. मी तुमच्यावर पहारेकरी ठेवून तुम्हांला म्हटले, ‘रणशिंगाचा शब्द ऐका;’ पण ते म्हणाले, ‘आम्ही ऐकत नाही.’१८. ह्याकरता राष्ट्रांनो, तुम्ही ऐका; जमलेले लोकहो, त्यांचे काय होते ते समजून घ्या.१९. अगे पृथ्वी, ऐक; पाहा, मी ह्या लोकांच्या कल्पनांचे फळ, अर्थात विपत्ती, त्यांच्यावर आणीन; कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे.२०. शबाहून ऊद व दूर देशाहून अगरू माझ्याकडे आणण्याचे काय प्रयोजन? तुमच्या होमबलींनी मला संतोष नाही, तुमचे यज्ञबली मला पसंत नाहीत.२१. ह्याकरता परमेश्वर म्हणतो, पाहा, मी ह्या लोकांच्या वाटेत अडथळे ठेवीन, बाप व लेक दोघेही त्यांवर ठोकर खाऊन पडतील; शेजारी आणि त्याचा मित्र हे नाश पावतील.”’२२. परमेश्वर असे म्हणतो की: “पाहा, उत्तर देशाहून एक राष्ट्र येत आहे; पृथ्वीच्या दिगंतापासून एक मोठे राष्ट्र उठत आहे.२३. ते लोक धनुष्ये व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही, ते सागराप्रमाणे गर्जना करतात; ते घोड्यांवर स्वार झाले आहेत; हे सीयोनकन्ये, ते युद्धास सिद्ध होऊन तुझ्याविरुद्ध एकजुटीने येत आहेत.”२४. आम्ही त्यांचा लौकिक ऐकला आहे, आमचे हात गळून गेले आहेत; आम्हांला क्लेश झाला आहे. प्रसवणार्या स्त्रीप्रमाणे वेणा लागल्या आहेत.२५. मैदानात जाऊ नकोस, कारण शत्रूची तलवार व भीती चोहोकडे आहे.२६. माझ्या लोकांच्या कन्ये, कंबरेला गोणपाट गुंडाळ, राखेत लोळ; एकुलत्या एका मुलाविषयीच्या शोकाप्रमाणे शोक व आक्रंदन कर; कारण लुटारू आमच्यावर एकाएकी येईल.२७. “तू त्याचा मार्ग जाणावा व पारखावा म्हणून मी तुला माझ्या लोकांत पारख करणारा१ व दुर्ग असे ठेवले आहे.२८. ते सर्व फितुर्यांतले फितुरी आहेत, ते चोहोकडे चहाड्या करीत फिरतात; ते पितळ व लोखंड आहेत, त्या सर्वांची वर्तणूक बिघडली आहे.२९. भाता फुंक फुंक फुंकला आहे, शिसे जळून खाक झाले आहे; ते गाळून गाळून थकले आहेत, तरी दुष्टांची छाननी काही झाली नाही.३०. त्यांना टाकाऊ रुपे म्हणतील, कारण परमेश्वराने त्यांना टाकले आहे.”स्तोत्र ११७:१-२१. अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा,१ अहो सर्व लोकांनो, त्याचे स्तवन करा.२. कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेशाचे स्तवन करा!२नीतिसूत्रे २७:३-४३. दगड जड असतो व वाळू वजनाने भारी असते, पण मूर्खाचा राग ह्या दोहोंहून भारी असतो.४. क्रोधाची निष्ठुरता व कोपाचा तडाखा ही पुरवली पण प्रेमसंशयापुढे कोण टिकेल?कलस्सियन १:१-२९१. कलस्सै येथील पवित्र जनांना म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणार्या बंधूंना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल व बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून:२. देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.३. ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती, ह्यांविषयी ऐकून, आम्ही तुमच्यासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याची उपकारस्तुती करतो.४. ५. ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्य वचनात पूर्वी ऐकले.६. ही सुवार्ता तुमच्याकडे येऊन पोहचली आहे; तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व खरेपणाने तिची माहिती करून घेतली, त्या दिवसापासून जशी तुमच्यामध्ये तशीच सर्व जगातही ही सुवार्ता फळ देत व वृद्धिंगत होत चालली आहे.७. एपफ्रास, आमच्या सोबतीचा प्रिय दास, तुमच्याकरता ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकलात.८. आत्म्याच्या योगे उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हांला कळवले.९. ह्यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्या द्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे;१०. अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्या-करता२ त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी.११. सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हांला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे;१२. आणि ज्याने तुम्हांला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले त्या पित्याची तुम्ही उपकारस्तुती करावी.१३. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले.१४. त्या पुत्राच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.१५. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे;१६. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले; सर्वकाही त्याच्या द्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे;१७. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्वकाही अस्तित्वात आहे.१८. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे; तो आदी, मृतांतून प्रथम जन्मलेला आहे; अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे.१९. कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी,२०. आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्या द्वारे जे सर्वकाही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्या द्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले.२१. जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता,२२. त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, ह्यासाठी की त्याने तुम्हांला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे.२३. जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले व अढळ राहता, आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पौल सेवक झालो आहे, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाहीत तर हे होईल.२४. तुमच्यासाठी जी माझी दुःखे त्यांमध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने, त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढत आहे;२५. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो.२६. जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे ते हे वचन होय.२७. ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे.२८. आम्ही त्याची घोषणा करतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो व प्रत्येक माणसाला शिकवतो; अशासाठी की, प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठायी पूर्ण असे उभे करावे.२९. ह्याकरता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे. Marathi Bible 2015 Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र Copyright © 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide