बायबल एकाच वर्षात
ऑक्टोबर ५

१. प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे; कारण दीनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे; भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंधमोचन विदित करावे;
२. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा; सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे;
३. सीयोनेतील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे; खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे; ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे म्हणून त्याने मला पाठवले आहे.
४. ते पुरातन काळची मोडतोड बांधून काढतील, आपल्या वाडवडिलांच्या वेळची खिंडारे भरून काढतील; उजाड नगरे व पूर्वीच्या पिढ्यांची ओसाड स्थळे पुन्हा वसवतील.
५. परके उभे राहून तुमचे कळप चारतील. परदेशी तुमचे नांगरे व द्राक्षांचे मळे लावणारे होतील.
६. तुम्हांला तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल, लोक तुम्हांला आमच्या देवाचे सेवक म्हणतील; राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल, त्यांचे वैभव तुम्हांला प्राप्त झाल्याचा अभिमान वाहाल.
७. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हांला दुप्पट मिळेल; आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतनभागानेच ते आनंद पावतील; असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील; त्यांना सार्वकालिक आनंद प्राप्त होईल.
८. “कारण मला, परमेश्वराला न्याय प्रिय आहे, अन्यायाच्या लुटीचा मला वीट आहे; मी त्यांना खातरीने प्रतिफळ देईन; त्यांच्याशी सार्वकालिक करार करीन.
९. अन्य राष्ट्रांत त्यांचा वंश, देशोदेशीच्या लोकांत त्यांची संतती प्रख्यात होईल; परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती ही असे त्यांना पाहणारे कबूल करतील.”
१०. मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासतो; कारण जसा नवरा शेलापागोटे लेऊन स्वत:ला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकारांनी स्वत:ला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत; मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.
११. कारण भूमी जशी आपले अंकुर उगवते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवेसे करतो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांदेखत नीतिमत्ता व कीर्ती अंकुरित करील.
१. सीयोनेची नीतिमत्ता उदयप्रभेप्रमाणे फाकेपर्यंत तिच्याकरिता मी मौन धरणार नाही, यरुशलेमेचे तारण पेटलेल्या मशालींप्रमाणे दिसेपर्यंत तिच्याकरिता मला चैन पडणार नाही.
२. राष्ट्रे तुझी नीतिमत्ता पाहतील, सर्व राजे तुझे वैभव पाहतील; परमेश्वराच्या मुखाने ठेवलेल्या नव्या नावाने तुला हाक मारतील.
३. तू परमेश्वराच्या हाती शोभायमान मुकुट, आपल्या देवाच्या हाती राजकिरीट होशील.
४. ह्यापुढे तुला सोडलेली म्हणणार नाहीत, ह्यापुढे तुझ्या भूमीला वैराण म्हणणार नाहीत; तर तुला हेफसीबा (ती माझा आनंद) व तुझ्या भूमीला बऊल (विवाहित) म्हणतील; कारण तू परमेश्वराला आनंद देणारी आहेस, तुझी भूमी सधवा होईल.
५. कारण तरुण जसा कुमारीशी विवाह करतो, तशी तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील, नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल.
६. हे यरुशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमले आहेत; ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत; अहो परमेश्वराला स्मरण देणार्‍यांनो, तुम्ही स्वस्थ राहू नका;
७. आणि तो यरुशलेम सुस्थित करून ते पृथ्वीला प्रशंसाविषय करीपर्यंत त्याला चैन पडू देऊ नका.
८. परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची, बलवान भुजेची शपथ वाहिली आहे की, “ह्यापुढे तुझे धान्य तुझ्या शत्रूंना मी खातरीने खाऊ देणार नाही; तू ज्यासाठी श्रम केलेस तो तुझा द्राक्षारस परके प्राशन करणार नाहीत;
९. तर ज्यांनी ते धान्य कोठारात साठवले तेच ते खातील व परमेश्वराचे स्तवन करतील; ज्यांनी तो द्राक्षारस साठवला तेच माझ्या पवित्र मंदिराच्या अंगणात तो पितील.”
१०. बाहेर पडा, वेशीतून बाहेर पडा; लोकांचा मार्ग नीट करा; राजमार्गाला भर घाला, घाला भर; धोंडे काढून टाका; अन्य राष्ट्रांसाठी ध्वजा उभारा.
११. पाहा, परमेश्वराने दिगंतापर्यंत हे वर्तमान गाजवले आहे की, “सीयोनेच्या कन्येला म्हणा, ‘पाहा, तुझे तारण येत आहे; पाहा, वेतन त्याच्याजवळ आहे व पारिपत्य त्याच्यासमोर आहे.”’
१२. पवित्र लोक, परमेश्वराने उद्धरलेले लोक, असे त्यांना म्हणतील व तू निगा केलेली व न टाकलेली नगरी आहेस असे म्हणतील.
९. हे इस्राएला, परमेश्वरावर भाव ठेव; तोच त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे.
१०. हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर भाव ठेव; तोच त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे.
११. अहो परमेश्वराचे भय धरणार्‍यांनो, परमेश्वरावर भाव ठेवा, तोच त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे.
१२. परमेश्वराने आमची आठवण केली आहे; तो आशीर्वाद देईल, इस्राएलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल, अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल.
१३. परमेश्वराचे भय धरणार्‍या लहानथोरांना तो आशीर्वाद देईल.
२४. द्वेष्टा आपल्या वाणीने खोटा बहाणा करतो, पण अंतर्यामी कपट बाळगतो;
२५. तो गोडगोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस, कारण त्याच्या हृदयात सात विषे आहेत;
२६. त्याचा द्वेष धूर्ततेने झाकला आहे, तरी समाजापुढे त्याची दुष्टता उघडकीस येईल.
१. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे.
२. “आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख, ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे.” (अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे).
३.
४. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.
५. दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत सरळ अंतःकरणाने आपल्या देहदशेतील धन्यांचे आज्ञापालन करत जा;
६. माणसांना खूश करणार्‍या लोकांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणार्‍या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा.
७. ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा;
८. कारण तुम्हांला माहीत आहे की, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो, तेच तो प्रभूकडून भरून पावेल.
९. धन्यांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा; व धमकावण्याचे सोडून द्या, कारण तुम्हांला हे ठाऊक आहे की, तुमचा व त्यांचा धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
१०. शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा.
११. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.
१२. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्‍यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.
१३. ह्या कारणास्तव तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्वकाही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या.
१४. तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा;
१५. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा,
१६. आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा.
१७. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या.
१८. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा.
१९. माझ्यासाठीही विनवणी करा की, ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे तिचे रहस्य उघडपणे कळवण्या-साठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावेत, ह्यासाठी की, जसे बोलायला हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे.
२०.
२१. माझे कसे काय चालले आहे हे तुम्हांलाही समजावे म्हणून प्रिय बंधू व प्रभूमध्ये विश्वासू सेवक जो तुखिक तो तुम्हांला सर्वकाही कळवील.
२२. आमची खुशाली तुम्हांला कळावी व त्याने तुमच्या अंत:करणाचे समाधान करावे ह्याकरताच मी त्याला तुमच्याकडे पाठवले आहे.
२३. देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून बंधूंना शांती व विश्वासाबरोबर प्रीती लाभो.
२४. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अक्षय प्रीती करणारे आहेत त्या सर्वांबरोबर कृपा असो.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र Copyright © 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide