बायबल एकाच वर्षात ऑक्टोबर ७यशया ६५:१-२५१. “जे मला विचारत नसत त्यांना मी दर्शन दिले; माझा धावा करत नसत त्यांना मी प्राप्त झालो. ज्यांना माझे नाम प्राप्त झालेले नव्हते त्यांना मी म्हणालो, ‘पाहा मी आहे, हा मी आहे.’२. जो चांगला नाही अशा मार्गाने स्वच्छंदपणे चालणार्या फितुरी लोकांपुढे मी आपले हात नित्य केले;३. माझ्यासमक्ष बागांत यज्ञ करून व विटांवर धूप जाळून मला क्षोभ आणणारे असे हे लोक आहेत.४. ते कबरांमध्ये राहतात, गुप्त स्थानी रात्र काढतात; डुकराचे मांस खातात, अमंगळ पदार्थांचा रस त्यांच्या पात्रांत असतो;५. ते म्हणतात, ‘हां! जवळ येऊ नकोस; तुझ्यापेक्षा मी पवित्र आहे.’ ते माझ्या नाकात धुरासारखे, सतत पेटलेल्या अग्नीसारखे आहेत.६. पाहा, माझ्यासमोर हा लेख आहे; मी पारिपत्य करीपर्यंत उगा राहणार नाही, प्रतिफळ त्यांच्या पदरी मोजून घालीन;७. तुमच्या दुष्कर्मांचे आणि तुमच्या वाडवडिलांनी पर्वतावर धूप जाळला व टेकड्यांवर माझा अपमान केला त्या दुष्कर्मांचे फळ मी त्यांना देईन,” असे परमेश्वर म्हणतो; “मी आधी त्यांच्या कर्मांचे फळ त्यांच्या पदरी मोजून घालीन.”८. परमेश्वर असे म्हणतो, “द्राक्षांच्या घोसात नवा द्राक्षारस दृष्टीस पडला असता ‘त्यात लाभ आहे म्हणून ह्याचा नाश करू नका’ असे लोक म्हणतात; त्याप्रमाणे मी आपल्या सेवकांस्तव करीन; मी अवघ्यांचा नाश करणार नाही.९. मी याकोबातून संतान, यहूदातून माझ्या पर्वतांचा वारस उत्पन्न करीन; माझे निवडलेले त्याचे वतन पावतील, माझे सेवक तेथे वस्ती करतील.१०. माझा धावा करणार्या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल, अखोराचे खोरे गुरांचा गोठा होईल.११. पण तुम्ही परमेश्वराला सोडले; जे तुम्ही माझ्या पवित्र पर्वताची पर्वा करत नाही, गादासाठी (भाग्यदेवतेसाठी) मेजवानी तयार करता, मनीसाठी (कर्मदेवतेसाठी) मिश्रित पेयांचे प्याले भरून ठेवता,१२. त्या तुम्हांला तलवार नेमली आहे; तुम्ही सगळे वधासाठी खाली वाकाल; कारण मी हाक मारली तरी तुम्ही उत्तर दिले नाही; मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही; माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले.”१३. ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल; माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल; पाहा, माझे सेवक आनंद करतील पण तुम्ही फजीत व्हाल;१४. पाहा, माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करतील, पण तुम्ही खिन्न चित्ताने ओरडाल, भग्नहृदयी होऊन आकांत कराल.१५. तुम्ही आपले नाव मागे ठेवाल त्याचा उपयोग माझे निवडलेले लोक शाप देण्याकडे करून म्हणतील की प्रभू परमेश्वर तुला जिवे मारील; तो आपल्या सेवकांना दुसरे नाव ठेवील;१६. म्हणून देशातला जो आपणास धन्य म्हणवील तो सत्य देवाच्या नामाने आपणास तसा म्हणवील; देशातला जो शपथ वाहील तो ती सत्य देवाच्या नामाची वाहील; कारण पूर्वीच्या कष्टांचा विसर पडला आहे व ते माझ्या दृष्टिआड झाले आहेत.१७. “पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.१८. परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा; पाहा, मी यरुशलेम उल्लासमय, तिचे लोक आनंदमय करतो.१९. मी यरुशलेमेविषयी उल्लास पावेन, माझ्या लोकांविषयी आनंद पावेन, तिच्यात शोकाचा व आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही.२०. ह्यापुढे थोडे दिवस वाचणारे अर्भक तिच्यात जन्मास येणार नाही. जो पुर्या आयुष्याचा होणार नाही असा म्हातारा तिच्यात असणार नाही; तेथील जो कोणी तरुणपणी मरेल तो शंभर वर्षांचा होऊन मरेल.२१. ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील.२२. ते घरे बांधतील आणि त्यांत दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील, असे व्हायचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील.२३. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत, कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे व त्यांची मुले त्यांच्याजवळ राहतील.२४. त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन, ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन, असे होईल.२५. तेव्हा लांडगा व कोकरू एकत्र चरतील, सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल; सर्पाचे खाणे धूळ होईल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत. नासधूस करणार नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.यशया ६६:१-२४१. परमेश्वर म्हणतो, “आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार?”२. परमेश्वर म्हणतो, “ह्या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनलेल्या आहेत; म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत; पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडे मी पाहतो.३. जो बैल कापतो तो मनुष्यवध करणारा होय; जो मेंढ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान मोडणारा होय; जो अन्नार्पण करतो तो डुकराचे रक्त अर्पण करणारा होय; जो धूप दाखवतो तो मूर्तीचा धन्यवाद करणारा होय; ज्या अर्थी त्यांनी आपलेच मार्ग पसंत केले आहेत व अमंगळ पदार्थांनी त्यांचा जीव संतुष्ट होतो,४. त्या अर्थी मी त्यांच्यासाठी दुर्दशा पसंत करीन, ज्याची त्यांना भीती वाटते ते त्यांच्यावर आणीन; कारण मी हाक मारली तेव्हा कोणी उत्तर दिले नाही, मी बोललो तेव्हा त्यांनी माझे ऐकले नाही, तर माझ्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले, मला जे नापसंत ते त्यांनी पसंत केले.”५. परमेश्वराचे वचन ऐकून कंपायमान होणार्यांनो, त्याचे वचन ऐका: “तुमचा द्वेष करणारे तुमचे जे बंधू माझ्या नामाचे निमित्त करून तुम्हांला हाकून देतात व म्हणतात की, ‘परमेश्वराचा गौरव होवो म्हणजे तुमचा हर्ष आम्हांला पाहण्यास मिळेल,’ ते फजीत होतील.६. नगरातून कोलाहल ऐकू येतो; मंदिरातून शब्द ऐकू येतो; आपल्या शत्रूंचे पारिपत्य करणार्या परमेश्वराचा शब्द ऐकू येतो;७. वेणा येण्यापूर्वीच ती प्रसूत झाली, वेदना होण्यापूर्वीच तिला पुत्र झाला.८. अशी गोष्ट कोणी कधी ऐकली काय? अशी गोष्ट कोणी पाहिली काय? देश एका दिवसात जन्म पावतो काय? राष्ट्र एका क्षणात जन्मास येते काय? परंतु सीयोनेने वेणा दिल्या, ती आपली मुले प्रसवली.९. मुले जन्माच्या लागास आणून त्यांना मी प्रसवणार नाही काय? असे परमेश्वर म्हणतो. जो मी जन्मास आणतो तो मी गर्भाशय बंद करीन काय? असे तुझा देव म्हणतो.१०. यरुशलेमेबरोबर आनंद करा, तिच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिच्यामुळे उल्लासा; तिच्यासाठी शोक करणारे तुम्ही सर्व तिच्याबरोबर अत्यंत हर्षित व्हा;११. म्हणजे तुम्ही तिचे स्तन चोखून तृप्त व्हाल, सांत्वन पावाल व तिचे विपुल वैभव भोगून संतुष्ट व्हाल.”१२. कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, नदीप्रमाणे शांती व पाण्याच्या पुराप्रमाणे राष्ट्रांचे वैभव मी तिच्याकडे वाहवतो; तुम्ही स्तनपान कराल, तुम्हांला कडेवर वागवतील, मांडीवर खेळवतील.१३. जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करीन; यरुशलेमेत तुमचे सांत्वन करीन.१४. ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल, कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडे तरतरीत होतील; परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठायी प्रकट होईल आणि त्याचा क्रोध शत्रूंवर होईल.१५. कारण पाहा, आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रकट करावा, आपल्या धमकीबरोबर ज्वाला निघाव्यात म्हणून परमेश्वर अग्नीतून येईल, त्याचे रथ वावटळीसमान असतील.१६. कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील, सर्व मनुष्यजातीचा आपल्या तलवारीने न्याय करील; परमेश्वराने वधलेल्यांची संख्या मोठी असेल.१७. बागेच्या मध्यभागी असलेल्या मूर्तीच्या मागे लागावे म्हणून जे आपणांस पवित्र व शुद्ध करतात व डुकराचे मांस, अमंगळ पदार्थ व उंदीर खातात ते सगळे एकदम विलयास जातील, असे परमेश्वर म्हणतो.१८. मी त्यांची कृत्ये व त्यांचे विचार जाणतो; सर्व राष्ट्रांनी व भिन्नभिन्न भाषा बोलणार्यांनी माझे वैभव पाहावे म्हणून मी त्यांना एकत्र करावे अशी वेळ आली आहे.१९. मी त्यांना एक चिन्ह दाखवीन; त्याच्यातून जे वाचतील त्यांना मी तार्शीश, पूल व लूद अशा धनुर्धारी राष्ट्रांकडे पाठवीन; ज्यांनी माझे नाम ऐकले नाही, माझा महिमा पाहिला नाही, अशा तुबाल व यावान ह्या दूरच्या द्वीपांत मी त्यांना पाठवीन; ते अन्य राष्ट्रांत माझा महिमा प्रकट करतील.२०. परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या मंदिरात जसे इस्राएल लोक परमेश्वरास शुद्ध पात्रांतून अन्नार्पण आणतात तसे सर्व राष्ट्रांमधून तुमच्या बांधवांना अर्पण म्हणून घोड्यांवर, रथांत, पालख्यांत, खेचरांवर व सांडणींवर बसून यरुशलेमेस माझ्या पवित्र पर्वतावर आणतील.२१. त्यांच्यातून काही जण याजक व लेवी व्हावेत म्हणून मी घेईन, असे परमेश्वर म्हणतो.२२. कारण मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीन; ती जशी माझ्यासमोर टिकून राहतील तसा तुमचा वंश व तुमचे नाव टिकून राहील असे परमेश्वर म्हणतो.२३. असे होईल की, एका चंद्रदर्शनापासून दुसर्या चंद्रदर्शनापर्यंत, एका शब्बाथापासून दुसर्या शब्बाथापर्यंत सर्व मनुष्यजाती माझ्यापुढे भजनपूजन करण्यास येईल, असे परमेश्वर म्हणतो.२४. ज्या माणसांनी माझ्याविरुद्ध बंड केले त्यांची प्रेते ते बाहेर जाऊन पाहतील; कारण त्यांना लागलेली कीड कधी मरायची नाही; त्यांना लागलेला अग्नी कधी विझायचा नाही; सर्व मानवजातीस त्यांची किळस येईल.”स्तोत्र ११६:१-४१. मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो.२. त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे, म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन.३. मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले,४. तेव्हा मी परमेश्वराच्या नावाचा धावा करून म्हणालो, “हे परमेश्वरा, तुला मी विनवतो की माझा जीव मुक्त कर.”नीतिसूत्रे २६:२८-२८२८. लबाड जिव्हा आपण घायाळ केलेल्यांचा द्वेष करते, खुशामत करणारे तोंड नाशाला कारण होते.फिलिपीन्स २:१-३०१. ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत,२. तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा.३. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना.४. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेही पाहा.५. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो;६. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,७. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.८. आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.९. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले;१०. ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा,११. आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.१२. म्हणून माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कापत आपले तारण साधून घ्या;१३. कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे.१४. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा;१५. ह्यासाठी की, ह्या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता;१६. असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल.१७. तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वत: अर्पण केला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;१८. आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.१९. तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्याला मी तुमच्याकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे.२०. तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही.२१. कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात;२२. पण त्याचे शील तुम्हांला माहीत आहे की, जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे.२३. म्हणून माझे काय होणार आहे हे समजताच त्याला रवाना करता येईल अशी मला आशा आहे.२४. तरी प्रभूमध्ये मला भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर येईन.२५. तथापि माझा बंधू, सहकारी व सहसैनिक, आणि तुमचा जासूद व माझी गरज भागवून सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठवण्याचे अगत्य वाटले;२६. कारण तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत झाला होता;२७. तो खरोखर मरणोन्मुख झाला होता; तथापि देवाने त्याच्यावर दया केली; ती केवळ त्याच्यावर नव्हे तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून, माझ्यावरही केली.२८. म्हणून मी त्याला पाठवण्याची अधिक त्वरा केली; तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा, आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले.२९. ह्यावरून प्रभूच्या ठायी त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा; आणि अशांचा मान राखा;३०. कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्तसेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला. Marathi Bible 2015 Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र Copyright © 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide