बायबल एकाच वर्षात
डिसेंबर १०

१. इस्राएल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली; मी त्याला आपला पुत्र म्हणून मिसरातून बोलावले.
२. जो जो मी बोलावी, तो तो ते माझ्यापासून दूर जात; ते बआलमूर्तींना बली अर्पण करत, कोरीव मूर्तीपुढे धूप जाळत.
३. मीच एफ्राइमाला चालायला शिकवले, मी त्यांना आपल्या कवेत वागवले आणि मी त्यांना बरे केले, पण ते त्यांना ठाऊक नाही.
४. मानवी बंधनांनी, प्रेमरज्जूंनी, मी त्यांना ओढले; बैलाच्या गळ्यातले जोते सैल करणार्‍यासारखा मी त्यांना झालो; त्यांना मी ममतेने खाऊ घातले.
५. ते मिसर देशात परत जाणार नाहीत, तर अश्शूर त्यांचा राजा होईल; कारण ते माझ्याकडे परत येण्यास मान्य झाले नाहीत.
६. त्यांच्या मसलतीमुळे तलवार त्यांच्या नगरांवर फिरेल. ती त्यांचे अडसर मोडून-तोडून खाऊन टाकील.
७. माझ्या लोकांचा माझ्यापासून मागे फिरण्याकडे कल आहे, आणि त्यांना बोलावले असता कोणी उठून दृष्टी वर करीत नाहीत.
८. हे एफ्राइमा, मी तुला कसा सोडून देईन? हे इस्राएला, मी तुला कसे बहकू देईन? मी तुला अदमासारखे करू काय? सबोइमासारखे करू काय? माझे हृदय खळबळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे.
९. मी आपल्या क्रोधसंतापाप्रमाणे करणार नाही, मी एफ्राइमाचा नाश करण्याकरता मागे फिरणार नाही; कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे; तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे; मी क्रोधावेशाने येणार नाही.
१०. ते परमेश्वरामागून जातील, तो सिंहासारखा गर्जेल, तो गर्जेल आणि त्यांचे पुत्र पश्‍चिमेकडून थरथर कापत येतील.
११. मिसर देशातून पक्षी व अश्शूर देशातून पारवे येतात तसे ते थरथर कापत येतील, व मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन, असे परमेश्वर म्हणतो.
१. एफ्राईम वायूची जोपासना करतो, पूर्वेच्या वार्‍याच्या मागे लागतो; दिवसभर तो लबाडी व नाश ह्यांची वृद्धी करतो; ते अश्शूराबरोबर करार करतात, मिसर देशात तेल नेतात.
२. परमेश्वराचा यहूदाबरोबर वाद आहे, तो याकोबाला त्याच्या आचरणाप्रमाणे शासन करील; त्याच्या कर्माप्रमाणे तो त्याला प्रतिफळ देईल.
३. गर्भाशयात असता त्याने आपल्या भावाची टाच धरली; तो आपल्या भरज्वानीत असता देवाबरोबर झगडला.
४. म्हणजे अर्थात दिव्यदूताबरोबर झगडून तो जय पावला, त्याने रडून देवाची करुणा भाकली. त्याला देवाचे बेथेलास दर्शन झाले, तेथे तो आमच्याबरोबर बोलला म
५. परमेश्वर, सेनाधीश देव परमेश्वर, हे नाम त्याचे स्मारक आहे:
६. “म्हणून तू आपल्या देवाकडे वळ; दया व न्याय ह्यांचे पालन कर; आपल्या देवाची प्रतीक्षा करून राहा.”
७. कनानाच्या१ हाती खोटा ताजवा आहे; जुलूम करणे त्याला आवडते.
८. एफ्राईम म्हणतो, “मी खरोखर धनवान झालो आहे, मी संपत्ती मिळवली आहे, पापाचा बट्टा लागेल असा अधर्म माझ्या सर्व कमाईत माझ्या हातून झाला नाही.”
९. मिसर देशापासून मी परमेश्वर तुझा देव आहे, उत्सवाच्या दिवसांप्रमाणे मी तुला पुन्हा तंबूत राहायला लावीन.
१०. मी संदेष्ट्यांबरोबर बोललो आहे; मीच दिव्यदर्शनांची रेलचेल केली आहे आणि संदेष्ट्यांच्या द्वारे मी दृष्टान्त देऊन बोध केला आहे.
११. गिलाद मूर्तिपूजक बनला आहे ना? तर तो शून्यवत होऊन जाईल; गिल्गालात त्यांनी बैल अर्पण केले; त्यांच्या वेद्या शेतांच्या तासांतील दगडांच्या राशींसारख्या आहेत.
१२. याकोब अरामाच्या रानात पळून गेला; इस्राएलाने बायकोसाठी चाकरी केली, बायकोसाठी मेंढरे राखली.
१३. एका संदेष्ट्याच्या हस्ते परमेश्वराने इस्राएलास मिसर देशातून बाहेर आणले, दुसर्‍या संदेष्ट्याच्या हस्ते त्याचे रक्षण करवले.
१४. एफ्राइमाने क्रोध अत्यंत चेतवला आहे, त्याचा रक्तपातदोष त्याच्यावर तसाच राहील, आणि प्रभू त्याने केलेल्या अप्रतिष्ठेचे उसने फेडील.
१७. हे देवा, मला तुझे संकल्प किती मोलवान वाटतात! त्यांची संख्या किती मोठी आहे!
१८. ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील; मला जाग येते तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो.
१९. हे देवा, तू दुर्जनांना ठार मारून टाक; अहो रक्तपात करणार्‍यांनो, माझ्यापासून दूर व्हा.
२०. ते तुझ्याविरुद्ध कपटाने बोलतात, तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात.
२१. तुझा द्वेष करणार्‍यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणार्‍यांचा मला वीट का येऊ नये?
२२. मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो; मी त्यांना आपले शत्रू मानतो.
२३. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण.
२४. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालव.
२२. रागीट मनुष्य तंटा उपस्थित करतो, क्रोधाविष्ट मनुष्याकडून बहुत अपराध घडतात.
१. देवपित्याने पवित्र केलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा ह्याच्याकडून:
२. दया, शांती व प्रीती ही तुम्हांला विपुल मिळोत.
३. प्रियजनहो, आपल्या समाईक तारणाविषयी तुम्हांला लिहायची मला मोठी ओढ लागली होती, तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हांला लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले.
४. कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत; ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात; आणि एकच स्वामी देव व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ते नाकारतात.
५. तुम्हांला हे सर्व ठाऊकच आहे, तरी तुम्हांला ह्याची आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा आहे; ते हे की, प्रभूने मिसर देशातून आपल्या लोकांना निभावून नेले, आणि जे विश्वासहीन झाले त्यांचा नाश केला;
६. आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरता राखून ठेवले.
७. त्याप्रमाणेच सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे ह्यांनी त्यांच्यासारखे जारकर्म करून अन्यकोटीतील अंगांशी संग केला; ती नगरे सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली अशी एकीकडे उदाहरणादाखल पुढे ठेवली आहेत.
८. तसेच हेदेखील विषयस्वप्नांत देहाला विटाळवतात, आणि प्रभुत्व तुच्छ लेखतात व थोरांची निंदा करतात.
९. आद्य देवदूत मीखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करण्यास तो धजला नाही; तर “प्रभू तुला धमकावो” एवढेच तो म्हणाला.
१०. तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत त्यांची हे निंदा करतात आणि ज्या गोष्टी बुद्धिहीन पशूंप्रमाणे ह्यांना स्वभावत: समजतात त्यांच्या योगे हे आपला नाश करून घेतात.
११. त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांतिमार्गात बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला.
१२. ते तुमच्याबरोबर खुशाल जेवतात तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनात झाकलेले खडक१ असे आहेत; ते मेंढपाळ असूनही स्वतःच चरत राहतात; ते वार्‍याने वाहून नेलेले निर्जल मेघ, हेमंत ऋतूतील फलहीन, दोनदा मेलेली, समूळ उपटलेली झाडे, असे आहेत;
१३. ते लज्जारूपी फेस दाखवणार्‍या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे, असे आहेत; त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे.
१४. आदामापासून सातवा पुरुष हनोख ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला आहे की, “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करण्यास आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यांवरून, त्या सर्वांना दोषी ठरवण्यास प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.”१
१५.
१६. ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत; तोंडाने ते फुशारकी मारतात; व लाभासाठी ते तोंडपुजेपणा करतात.
१७. परंतु प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा;
१८. ते तुम्हांला असे सांगत असत की, “शेवटल्या काळी आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील.”
१९. ती फूट पाडणारी, देहबुद्धीची, ज्यांना पवित्र आत्मा नाही अशी आहेत.
२०. प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा,
२१. सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा, आणि आपणांस देवाच्या प्रीतीमध्ये राखा.
२२. जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा,
२३. त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा; आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा. मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष्य माना.
२४. तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास जो समर्थ आहे,
२५. अशा आपल्या उद्धारक एकाच ज्ञानी देवाला, (येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या द्वारे) गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार युगारंभापूर्वी, आता व युगानुयुग आहेत. आमेन.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र Copyright © 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide