बायबल एकाच वर्षात जून १८२ राजे २५:१-३०१. त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यातील दशमीस बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपली सर्व सेना घेऊन यरुशलेमेवर चढाई करून आला; त्याने त्याच्यासमोर तळ देऊन सभोवार मेढेकोट उभारले.२. सिद्कीया राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत नगराला वेढा पडला होता.३. चवथ्या महिन्याच्या नवमीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशाच्या लोकांना काही खायला मिळेना.४. मग नगराच्या तटाला एक खिंड पाडण्यात आली; दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेजवळ होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला.५. तेव्हा खास्दी सेनेने राजाचा पाठलाग करून त्याला यरीहोच्या मैदानात गाठले व त्याच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.६. ते राजाला पकडून रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे घेऊन गेले; त्यांनी त्याची शिक्षा ठरवली.७. त्यांनी सिद्कीयाच्या पुत्रांचा त्याच्या डोळ्यांदेखत वध केला आणि सिद्कीयाचे डोळे फोडून त्याला बेड्यांनी जखडून बाबेलास नेले.८. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी पाचव्या महिन्याच्या सप्तमीस नबुजरदान यरुशलेमेला आला; हा बाबेलच्या राजाचा सेवक असून गारद्यांचा नायक होता.९. त्याने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा जाळून टाकला, तशीच यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली.१०. गारद्यांच्या सरदारांबरोबर असलेल्या खास्द्यांच्या सर्व सैन्याने यरुशलेमेभोवतालचे सर्व तट पाडून टाकले.११. शहरात राहिलेले अवशिष्ट लोक, बाबेलच्या राजाकडे फितून गेलेले लोक आणि उरलेले साधारण लोक ह्यांना गारद्यांचा नायक नबुजरदान ह्याने कैद करून नेले.१२. देशातले जे लोक अतिशय कंगाल होते त्यांना गारद्यांच्या सरदाराने द्राक्षांच्या मळ्यांची व शेतांची मशागत करण्यास मागे ठेवले.१३. परमेश्वराच्या मंदिरात असलेले पितळेचे खांब, मंदिरातला पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी ही खास्दी लोकांनी फोडूनतोडून त्यांचे पितळ बाबेलास नेले.१४. पात्रे, फावडी, चिमटे, धूपदाने आणि सेवेची सर्व पितळेची उपकरणे त्यांनी नेली.१५. अग्निपात्रे, कटोरे वगैरे जेवढी सोन्याची होती त्यांचे सोने व जी चांदीची होती त्यांची चांदी गारद्यांच्या सरदाराने नेली.१६. दोन खांब, गंगाळसागर व त्याच्या बैठकी हे सर्व शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरासाठी केले होते, ह्या सर्व उपकरणांचे पितळ अपरिमित होते.१७. एका खांबाची उंची अठरा हात असून त्यावर पितळेचा कळस होता; त्या कळसाची उंची तीन हात होती; त्या कळसाच्या सभोवार पितळेची जाळी व डाळिंबे केली होती; दुसर्या खांबालाही असेच जाळीचे काम होते.१८. गारद्यांच्या सरदाराने मुख्य याजक सराया, दुय्यम याजक सफन्या व तीन द्वारपाळ ह्यांना पकडून नेले.१९. योद्ध्यांवर नेमलेल्या एका खोजाला त्याने नगरातून पकडून नेले; राजाच्या हुजुरास असणारे पाच पुरुष त्याला शहरात आढळले त्यांनाही त्याने नेले; त्याप्रमाणेच लोकांची सैन्यात भरती करणारा सेनापतीचा चिटणीस आणि नगरात सापडलेल्या लोकांपैकी साठ माणसे ह्यांना त्याने नेले.२०. गारद्यांचा सरदार नबुजरदान ह्याने त्यांना पकडून रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले.२१. बाबेलच्या राजाने त्यांना हमाथ देशातील रिब्ला येथे मार देऊन ठार केले. ह्या प्रकारे यहूदी लोकांना त्यांच्या देशातून कैद करून नेले.२२. यहूदा देशातील जे लोक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने राहू दिले होते त्यांच्यावर त्याने गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याला सुभेदार नेमले.२३. बाबेलच्या राजाने गदल्यास सुभेदार नेमले हे सेनानायकांनी व त्याच्या लोकांनी ऐकले, तेव्हा इश्माएल बिन नथन्या, योहानान बिन कारेह, सराया बिन तान्हुमेथ, नटोफाथी आणि याजन्या बिन माकाथी व त्यांचे सर्व पुरुष मिस्पा येथे गदल्या ह्याच्याकडे आले.२४. तेव्हा गदल्या आणभाक करून त्यांना व त्यांच्या माणसांना म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्यांची भीती धरू नका; देशात राहून बाबेलच्या राजाचे अंकित व्हा, म्हणजे तुमचे बरे होईल.”२५. सातव्या महिन्यात राजवंशातला इश्माएल बिन नथन्या बिन अलीशामा ह्याने दहा माणसांसह येऊन गदल्याला ठार मारले; तसेच मिस्पा येथे त्याच्याबरोबर असलेले यहूदी व खास्दी ह्यांनाही त्याने ठार मारले.२६. तेव्हा लहानथोर सर्व लोक आणि सेनांचे नायक मिसर देशाला निघून गेले; त्यांना खास्द्यांचा धाक पडला होता.२७. यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याच्या बंदिवासाच्या सदतिसाव्या वर्षी म्हणजे ज्या वर्षी बाबेलचा राजा अबील-मरोदख राजा झाला, त्याच्या बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याला कारागृहातून काढून त्याचा सत्कार केला.२८. त्याच्याशी त्याने गोड भाषण करून बाबेलात जे राजे त्याच्या बंदीत होते त्यांच्याहून त्याला उच्च आसन दिले.२९. त्याने आपली कारागृहातील वस्त्रे बदलली व तो आमरण नित्य राजाच्या पंक्तीस जेवत असे.३०. त्याच्या निर्वाहासाठी त्याला राजाने कायमची नेमणूक करून दिली, ती त्याला आमरण नित्य मिळत होती.स्तोत्र ७५:१-१०१. मुख्य गवयासाठी अल्तश्केथ (नष्ट करू नको) ह्या चालीवर गायचे आसाफाचे संगीतस्तोत्र. हे देवा, आम्ही तुझे उपकारस्मरण करतो; तुझे उपकारस्मरण करतो; कारण तुझे नाव समीप आहे; तुझ्या अद्भुत कृत्यांचे वर्णन लोक करतात.२. नेमलेली वेळ आली म्हणजे मी यथार्थ न्याय करीन.३. पृथ्वी व तिच्यावर राहणारे सर्व भेदरून गेले. तरी तिचे स्तंभ मीच स्थापले आहेत. (सेला)४. फुशारकी मारणार्यांना मी म्हणालो, “फुशारकी मारू नका;” आणि दुर्जनांना म्हणालो, “आपल्या बळाचा तोरा मिरवू नका;५. तुम्ही आपले नाक वर करू नका; ताठ मानेने बोलू नका.”६. कारण उन्नती ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे, व अरण्याकडूनही नव्हे;७. तर न्याय करणारा देव आहे; तो एकाला खाली पाडतो व दुसर्याला वर चढवतो.८. पाहा, परमेश्वराच्या हाती प्याला आहे व त्यात द्राक्षारस फेसाळत आहे; त्यात मसाला मिसळला आहे आणि त्यातून तो ओतून देतो; पृथ्वीवरील सर्व दुर्जनांना तो खातरीने गाळासकट प्यावा लागेल.९. मी तर सदा आनंद करीन, याकोबाच्या देवाची स्तोत्रे गाईन.१०. दुर्जनांचा ध्वज मी खाली ओढीन,१ पण नीतिमानाचा ध्वज फडकत राहील.२नीतिसूत्रे १९:४-५४. संपत्ती मित्र जोडते, गरिबाला मित्र सोडतात.५. खोटी साक्ष देणार्याला शिक्षा चुकणार नाही; लबाड बोलणारा सुटणार नाही.कायदे ३:१-२६१. पेत्र व योहान हे तिसर्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते.२. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणीएक माणूस होता; त्याला मंदिरात जाणार्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत.३. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली.४. तेव्हा पेत्र व योहान ह्यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले; आणि पेत्र म्हणाला, “आमच्याकडे पाहा.”५. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले.६. मग पेत्र म्हणाला, “माझ्याजवळ सोनेरुपे काही नाही; पण जे आहे ते तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.”७. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले, तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यांत तत्काळ बळ आले.८. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला; आणि तो चालत, उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला.९. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले,१०. आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला.११. मग तो बरा झालेला पांगळा पेत्र व योहान ह्यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे शलमोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले.१२. हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, “अहो इस्राएल लोकांनो, ह्याचे आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालायला लावले आहे असे समजून आमच्याकडे निरखून का पाहता?१३. अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने आपला ‘सेवक’ येशू, ह्याचा गौरव केला आहे; त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्यासमक्ष तुम्ही त्याला नाकारले.१४. जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले, आणि ‘खुनी पुरुष आम्हांला द्या’ अशी मागणी केली.१५. आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले; पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले ह्याचे आम्ही साक्षी आहोत.१६. त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. त्याच्या द्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीरसंपत्ती प्राप्त झाली आहे.१७. बंधुजनहो, तुम्ही, तसेच तुमच्या अधिकार्यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे.१८. परंतु देवाने, आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्ट्यांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले.१९. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावेत;२०. आणि तुमच्याकरता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे.२१. सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे.२२. मोशेनेही म्हटलेच आहे, ‘प्रभू देव तुमच्यासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून उभा करील; तो जे काही तुम्हांला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टीत त्याचे ऐका.२३. आणि असे होईल की, जो कोणी त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही तो लोकांतून अगदी नष्ट केला जाईल.’२४. आणखी शमुवेलापासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसांविषयी सांगितले.२५. तुम्ही संदेष्ट्यांचे पुत्र आहात, आणि ‘तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील’ असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात.२६. देवाने आपल्या ‘सेवकाला’ उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले, ह्यासाठी की, त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा.” Marathi Bible 2015 Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र Copyright © 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide